आजपासून खेळविल्या जाणार्या राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत किदांबी श्रीकांत, पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल या नावाजलेल्या त्रिकुटासह एच.एस. प्रणॉय, अजय जयराम, साई प्रणिथ, समीर वर्मा, सौरभ वर्मा, पारुपल्ली कश्यप व डानियल फारिद हे पुरुष एकेरीत तर रितुपर्ण दास व गोव्याची अनुरा प्रभुदेसाई महिला एकेरीत खेळताना दिसणार आहे. २९ राज्य व २ केंद्रशासित प्रदेशातील मिळून ४०० बॅडमिंटनपटू या स्पर्धेत उतरणार आहेत. पुरुष व महिला एकेरी, पुरुष व महिला दुहेरी, मिश्र दुहेरी व सांघिक अजिंक्यपद या पाच प्रकारात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेने भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या अधिपत्याखाली मणकापूर विभागीय क्रीडा संकुलात आयोजित ही स्पर्धा ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम ६० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पुरुष व महिला एकेरीतील विजेत्यांना तसेच दुहेरीतील प्रत्येक विजयी खेळाडूल प्रत्येकी २ लाख व उपविजेत्यांना १.५ लाख रुपये मिळतील. स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे.