श्रीकांतची चौथ्या स्थानी घसरण

0
116

पुरुष एकेरीतील भारताचा अव्वल खेळाडू किदांबी श्रीकांत याने काल गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत चौथे स्थान मिळविले आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशीप स्पर्धेनंतर श्रीकांतने कोणत्याही स्पर्धेत सहभाग नोंदविलेला नाही. याच कारणास्तव त्याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. २५ वर्षीय श्रीकांत थॉमस कप स्पर्धेतही खेळणार नसल्याने त्याची घसरण पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीकांतच्या जागी थॉमस कपमध्ये खेळणार्‍या साई प्रणिथने आपले नववे स्थान कायम राखले असून साई प्रणिथ १८व्या (-१) स्थानी घसरला आहे. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियातील स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर स्वीस ओपन विजेता समीर वर्मा ‘टॉप २०’मध्ये प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहे. २३ वर्षीय समीरने चार स्थानांची उडी घेताना २१वे स्थान प्राप्त केले आहे. पुल्लेला गोपीचंदचा शिष्य असलेल्या समीरने मागील वर्षी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १८वे स्थान मिळविले होते.
पारुपल्ली कश्यपची ४१व्या स्थानी घसरण झाली आहे. सौरभ वर्मा ६५व्या तर शुभंकर डे ६७व्या स्थानी आहे. लक्ष्य सेन ( + ११) याने मोठी झेप घेत ८८वा तर अजय जयराम (-९ ) याने ९९वा क्रमांक प्राप्त केला आहे. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांनी आपले तिसरे व दहावे स्थान राखले आहे. १६ वर्षीय वैष्णवी रेड्डी जक्का हिने सात स्थानांची मोठी झेप घेताना भारताची तिसर्‍या क्रमांकाची खेळाडू होण्याचा मान मिळविला आहे. तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च ५६वे स्थान मिळविले आहे. रुत्विका शिवानी गड्डे ६३व्या तर श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली ६४व्या स्थानी आहे.

मनू अत्री-रेड्डी २२व्या क्रमांकावर
ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतपर्यंत मजल मारल्याचा फायदा पुरुष दुहेरीतील भारतीय जोडी मनू अत्री व सुमिथ रेड्डी यांना झाला आहे. त्यांनी २२व्या स्थानापर्यंत प्रगती केली आहे. पुुरुष दुहेरीतील भारताची सर्वोत्तम जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी १८व्या स्थानी आहे. अर्जुन एमआर व श्‍लोक रामचंद्रन यांनी पाच क्रमांकांनी प्रगती करत ३८व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी ही जोडी २७व्या स्थानावर आहे. गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला महिला एकेरीत तीन स्थानांचा तोटा झाला असून ती ११५व्या स्थानी आहे.