– सौ. लक्ष्मी ना. जोग
श्रावण! ओला श्रावण! भिजला श्रावण! गहिरा श्रावण! हिरवा श्रावण! आणि खरंच की! सृष्टीला लागलेला पाचवा महिना म्हणजे श्रावण! पहिलटकरणीला पाचवा महिना लागला की तिच्या मुखावरून गर्भतेज निथळू लागते, तशीच या महिन्यात सृष्टीची अनेक रूपे मनमोहित करतात. चैत्र… विंझणवारा घालणारा मधुमास! वैशाख… वणवा पेटवणारा! ज्येष्ठ… मेघगर्जना करत येणारा! आषाढ… मेघमल्हार आळवीत सहस्रधारांनी धरेवर अभिषेक करणारा आणि पाचवा श्रावण! पृथ्वीला फुलाफुलांचे अलंकार बहाल करणारा! ओलेचिंब वातावरण मनही चिंबचिंब करीत असते. आजवर प्रतीक्षा होते ती श्रावणाची! निसर्गनिर्मित सगळे रंग अंगप्रत्यंगावर मिरवीत, मधूनच अवचित येणार्या हळद-पिवळ्या उन्हाला साक्षी ठेवून इंद्रधनुष्याचे सप्तरंग मनात उतरवत हा राजा येतो. येण्याच्या आधीच तो प्रत्येकाच्या मनात रुंजी घालत असतो. यंदा मंगळवार किती? नागपंचमीला काय पक्वान्न करायचे? राखी पौर्णिमा कशी साजरी करायची? गोकुळाष्टमीला काय काय करायचं? याचे बेत आखले जातात. नववधू वसुंधरेसारखा नखशिखांत हिरवा साज लेवून हिरव्या बांगड्या भरून व हातावर लालचुटुक मेंदी रेखाटून पहिली मंगळागौर पुजण्यासाठी माहेरी येतात. अवघे वातावरण चैतन्याने भरून जाते. पृथ्वी खर्या अर्थाने ‘सुजलाम्’ ‘सुफलाम्’ होते. सुवासिनी बनते. श्रावण मासाच्या आगमनाबरोबर निसर्गाचे- जणू ईश्वराचेच नवे नवे रूप आपल्याला अनुभवायला मिळते.
आजवर या श्रावणावर कितीतरी कविता कवींनी केल्या असतील. लेख लिहिले असतील. त्याचे वर्णन करून लेखणी थकली तरीही त्याचे गुणगान संपत नाही. श्रावण मासाचं यथार्थ वर्णन केलेली बालकवींची कविता मात्र अजरामर! इतकं यथासांग वर्णन करणारी कविता त्यानंतर जन्मली नसेल. तरीही या श्रावणावर अजूनही काही लिहावे असा तो नवाचा नवाच आहे. दरवर्षी येणारा… तरीही! ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता खरोखरच श्रावणात आमच्या गोगटेबाईंनी शिकवली होती. ती शिकवताना त्यांनी आम्हाला एका निसर्गरम्य ठिकाणी नेलं होतं. त्यावेळी तो भिजलेला, चकाकता, ताजातवाना निसर्ग आम्हाला न्याहाळायला मिळाला होता. तो सोमवार होता आणि तिथल्या पुरातन शिवमंदिरात शिवामूठ घालण्यासाठी नवविवाहितांची रीघ लागली होती. ‘देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात…’ हे प्रत्यक्षच बघायला मिळालं होतं. नटल्या-सजलेल्या, केसांत गजरे माळलेल्या त्या शुचिर्भूत हास्यवदन ललना..! त्यांना पाहून आम्हीही आनंदून गेलो होतो. हे लिहितानाही मला पुनःप्रत्ययाचा आनंद होतो आहे.
आपल्या पूर्वजांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण त्यांनी आपल्या संपूर्ण वर्षातील प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व देऊन माणसाच्या जगण्यात आनंद निर्माण केला आहे. सण, व्रतं, उत्सव, महोत्सव, ऋतू व त्या-त्या हवामानाला अनुसरून त्यांची रचना केली आहे. सर्व प्राणिमात्रांचं जीवनच निसर्गावर अवलंबून असतं. म्हणून वेद-उपनिषदांतसुद्धा निसर्ग स्तवनच जास्तीत जास्त केलेलं आहे. विश्वाच्या चराचरात ईश्वर भरलेला आहे हे निसर्गाच्या उपयुक्ततेवरून आपल्या लक्षात येतं. म्हणूनच त्याचे जतन, संरक्षण व पूजा आपण केली पाहिजे. फक्त निसर्गावर कविता-लेख लिहून हे होणार नाही तर त्याची प्रत्यक्ष कृती करावयास हवी. त्याचे जतन करताना पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व कळण्यासाठीच प्रत्येक महिन्याची, त्यातील सणांची महती सांगायला हवी.
पूर्वी मुलींची लग्ने लवकर होत. त्या मोठ्या होईपर्यंत सासरचे दिवस हे व्रत-वैकल्यांचेच असत. त्यांचे हे दिवस, हा काळ सात्त्विकतेत जावा, ईश्वरचिंतनाची त्यांना गोडी लागावी, बालपणीची चूल बोळकी विसरून खर्याखुर्या संसारात मन रमवताना वेडेवाकडे विचार त्यांच्या मनात येऊ नयेत अशा अनेक हेतूंनी त्यांना व्रतवैकल्यात गुंतवून ठेवले म्हणजे बरे. म्हणूनच ही व्रते करताना त्यासाठी पत्री-फुले गोळा करायची. म्हणजे बालवयातच झाडांची ओळख होते व ती जन्मभर टिकते. शिवाय पर्यावरणाचंही रक्षण होतं. ‘पत्री’ म्हणजे निरनिराळ्या फुलझाडांची ठरावीक संख्येत पाने काढून ती पूजा करताना देवतेला वाहायची. त्यासाठी मंत्रही रचलेले आहेत. कुठल्या झाडाची पत्री कुठल्या अवयवाचे रक्षण करते म्हणून ती पाने देवतेच्या ठरावीक अवयवाच्या ठिकाणी वाहायची, हे पण मंत्रात सांगितलेले असते. मंत्र काळजीपूर्वक ऐकल्यास लक्षात येते. याचाच अर्थ निसर्गातील प्रत्येक वनस्पती औषधी असते. तिच्या अवतीभवती जरा वेळ राहिल्यानेसुद्धा त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. उदा. बेल, तुळशी, अनेक फुलझाडे वगैरे सांगता येतील. सृष्टीत सातत्याने नवनवीन चमत्कार होत असतात. आविष्कार होत असतात. पत्री खुडताना मुली तेही न्याहाळू शकतात. हे सगळं लिहिण्याचं प्रयोजन म्हणजे काही लोक आमच्या व्रतवैकल्यांना नाके मुरडतात, नावे ठेवतात. मागासलेपणा समजतात. पण ते चुकीचे आहे. ते सगळे शास्त्राला धरूनच आहे. मानव कल्याणाचे आहे. कारण निसर्ग वजा केला तर मानवी जीवन व्यर्थ ठरते हे मोठे शास्त्रज्ञही मान्य करतात.
सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्यातली जास्तीत जास्त व्रते श्रावण मासात येतात. या महिन्यातील प्रत्येक दिवस व्रताचा असतो. शिवाय नागपंचमी, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी हे महत्त्वाचे सण याच महिन्यात असतात. स्त्रियांसाठी व्रतवैकल्यांबरोबरच शुक्रवारचे हळदीकुंकू, मंगळागौरीचे हळदीकुंकू, त्या जागवण्यासाठी फुगड्या-झिम्माचा व आरत्यांचा कल्लोळ असे. सप्तमीला दहीभाताचा कोकोबाला नैवेद्य. हा नैवेद्य वाहत्या पाण्यात सोडायचा असतो. नवीन लग्न झालेल्या मुली-सुनांना शिवामूठ सोमवारी व मंगळवारी मंगळागौर पुजायची लगबग असते. ही दोन्ही व्रते पतीच्या दीर्घायुष्यासाठी असल्यामुळे ती खूपच मनापासून व साग्रसंगीत, यथासांग व्हावी याची त्या काळजी घेतात. खरं म्हणजे ही सगळी निसर्गाचीच विविध रूपांची पूजा असते असे म्हटले तर ते चूक ठरू नये. पण जसजसा काळ पुढे जातो आहे तसतसे त्याचे गांभीर्य कमी होते आहे की काय अशी खंत वाटते.
माझ्या लहानपणी आमच्या विरकुल्या निसर्गसंपन्न आंबेडे गावात सगळी घरे ‘ग्रास तिथे मिरास’ या उक्तीप्रमाणे विखुरलेली होती. तरीही आम्ही मैत्रिणी जमून फुले-पत्री गोळा करायचो. कारण गावातल्या वशिरीबरोबर आम्हीही मंगळागौर पुजायचो. घरातील वडीलधार्या स्त्रिया सगळे सोवळ्याचे, पूजेचे सोपस्कार आमच्याकडून करून घ्यायच्या. सोवळ्यात कपडे वाळत घालणे, उपास वगैरे, पूजेची तयारीसुद्धा. सोळा प्रकारची पत्री, लेणी, दिवे वगैरे करून घ्यायचे. लग्नानंतर पुजायच्या असणार्या व्रताचे जणू आताच्या भाषेत सांगायचे तर ट्रेनिंगच होते ते!
श्रावण लागला की गावागावांतून कासार बांगड्यांच्या चळती आपल्या भल्या मोठ्या झोळीत घालून हिंडायचे. कारण श्रावणात बायका बांगड्या भरतात हे त्यांना माहीत होते. कासार आल्याची वर्दी आली की आम्ही मुली परकर सावरत आधीच तिथे जाऊन त्याने आणलेल्या बांगड्या न्याहाळायचो. तोपर्यंत घरातून प्रत्येकीची आजी, आई, काकू, आत्या जमा व्हायच्या. कासारासमोर पाट मांडून त्यावर बसूनच बांगड्या भरून घ्यायच्या. चांगल्या सहा-सहा मनपसंत बांगड्या दोन्ही हातात भरून झाल्यावर आजी सांगायची ‘‘कासाराला नमस्कार करा गोऽऽ!’’ त्यावेळी एक आज्ञापालन म्हणून निर्व्याज वृत्तीने आम्ही वाकायचोही. पण आता त्या संस्कारांचं महत्त्व कळतं. सगळ्याच जणी कासाराला वाकून नमस्कार करीत.
श्रावणातले सोमवार ‘नक्त’ उपवासासाठी मनावर ठसले आहेत. अजूनही बर्याच लोकांचा ‘नक्त’ उपवास असतो. ‘नक्त’ म्हणजे दिवसा थोडा फराळ खाऊन तिन्हीसांजेला उपास सोडायचा. तो सोडायच्या आधी देवपूजा व सोवळ्यातला स्वयंपाक होतो. माझ्या घरी माझा व सासु-सासर्यांचा असा उपवास असायचा. गुरे घरी परतायच्या वेळेला पूजा व नैवेद्य करून ती दोघे जेवत. संध्याकाळी पुन्हा स्नान करून मामंजी रुद्र म्हणून देवाची पूजा करीत. पंचखाद्य नैवेद्याला असे. त्यासाठी मुले पण पूजा ऐकत बसून राहत. बाहेर रिमझिम रेशीमधारा वाहत असत. त्याचवेळी गुरांच्या चाहुलीने वासरे हंबरत. त्या हंबरण्याने आसमंत नादमय होई. गाईंच्या धारा काढायच्या असायच्या. त्याचवेळी आम्ही पत्रीवगैरे काढून आलेलो असायचो. अंगणात शब्दुली पानोपान फुललेली असायची. पावसाच्या सुरुवातीला घातलेल्या दोडक्या-तवशांची अळीसुद्धा पानाफुलांनी डवरलेली दिसायची. दोडक्याची पिवळीधम्मक फुले आमची धांदल पाहून हसताहेत असं वाटायचं. गाईंच्या धारा काढून दुधाने फेसाळणारे तांब्ये घेऊन घरात येतायेताच मामंजींनी म्हटलेले रुद्राचे पवित्र मंत्र व कापूर-उदबत्त्यांचा सुगंध जणू त्या गोरसाचाच सन्मान करतायत असे वाटायचे. मन तृप्ततेने व पावित्र्याने भरून जायचे. अजूनही श्रावण महिना आला की या सगळ्याचे स्मरण होते. अजूनही मामंजींचे ते स्वर कानात पडल्याचा भास होतो.
श्रावणात जाई-जुईंना बहर येतो. प्रत्येकीच्या केसात गजरा असतोच. आमच्या अंत्रुज महालात तर प्रवचने, कीर्तने, भजने यांनी प्रत्येक मंदिर दुमदुमत असते. कुठे स्थापना, कुठे भजन सप्ताह, कुठे देवाचा वाढदिवस तर कुठे पुनर्प्रतिष्ठापना सोहळा! नाना तर्हेच्या फुलांनी व विद्युत रोशणाईने मंदिरे नटलेली असतात. श्रावणात गोव्याचे पंढरपूर होते. टाळ-मृदंगाच्या गजरात संतांचे अभंग प्रत्येकाच्या जिभेवर नाचत असतात.
श्रावण महिना चांगले श्रवण करण्याचा. पूर्वी घराघरांत सांजवेळी हरीविजय, ज्ञानेश्वरी भक्तिभावाने ऐकायला बसत. मनात ईश्वरप्रेम साठवून ठेवत. पण तेव्हा मनोरंजनाची साधनेही आली नव्हती. आता घरोघरी धार्मिक ग्रंथांची जागा टी.व्ही.ने घेतली आहे. श्रवणासारखे त्यात काहीच नसते. मग ज्यांना ग्रंथ वाचण्याची, ऐकण्याची आवड आहे ते जवळच्या मंदिरात जाणारच. तरुणवर्गाच्या आवडीची माध्यमे बदलली असली तरी गोमंतकीय तरुणवर्ग भजनांकडे ओढला जातो आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. श्रावण भजनांमुळे श्रवणीय होतो.
श्रावण महिना हासत-नाचत-रुणझुणत राजहंसाच्या डौलात येतो व गणराया येणार असल्याची वर्दी देऊन जातो. दर रविवारी आदित्य, सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर, बुधवारी बृहस्पती, गुरुवारी दत्तगुरू, शुक्रवारी लेकुरवाळी जिवती, शनिवारी पिंपळ, तुळस यांची रामपारी पूजा अशा धामधुमीत श्रावण अमावस्या केव्हा येऊन ठेपते ती कळतच नाही. पण तो संपूच नये असे वाटते. खूप हवाहवासा वाटतो. मला तरी वाटतं की अवघ्या निसर्गाचा सन्मान श्रावण मासात होतो. हरिततृणांच्या मखमाली गालिच्यांच्या पायघड्यांवरून तो येतो आणि वार्यावर डोलणार्या हिरव्यागार शेतांमधून, पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटातून, झुळझुळणार्या झर्यांमधून, खळाळत्या नद्यांमधून, नभातील इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांतून तो प्रगट होतो. सर्व जगाला आनंदित करतो.
आपल्या वर्षातील प्रत्येक महिना वैशिष्ट्याने नटलेला आहे. चैत्र वर्षारंभाचा व रामजन्माचा, वैशाख देवीच्या दौलोत्सवाचा, ज्येष्ठ वटपौर्णिमेचा, आषाढ कर्क संक्रांतीचा, श्रावण प्रत्येक दिवशी येणार्या सणांचा, भाद्रपद गणेश चतुर्थीचा, आश्विन नवरात्रोत्सव व सीमोल्लंघनाचा, कार्तिक दिवाळी सण व भाऊबिजेचा, मार्गशीर्ष श्रीदत्तजयंतीचा, पौष मकर संक्रांतीचा, माघ महाशिवरात्रीचा व फाल्गुन शिमगा धुळवडीचा! या सगळ्या बारा महिन्यांतील पाचवा श्रावणमास हा कळस ठरावा. सात्विकतेची मांदियाळी या महिन्यात होते. भगवान श्रीकृष्णांचा जन्म याच महिन्यात झाला. तसेच श्री ज्ञानेश्वर माऊलींचा जन्मही याच मासात झाला.
अप्रतिम सृष्टिसौंदर्य, सात्त्विक वातावरण, महत्त्वाचे सण आणि घरात पक्वान्नांचे भोजन असा अपूर्व योग घेऊन येणारा श्रावण पुनःपुन्हा यावा असे प्रत्येकाला वाटते, यात नवल ते काय?