श्रमधाम योजनेतील घरांच्या उद्घाटनासाठी गडकरी येणार

0
6

>> रमेश तवडकर यांनी नवी दिल्लीत घेतली भेट

गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी काल दिल्लीत केंद्रीय महामार्ग व परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. श्रमधाम योजनेंतर्गत बांधलेल्या घरांच्या उद्घाटन समारंभाला, तसेच नव्याने बांधण्यात येणार असलेल्या घरांच्या पायाभरणीचे काम करण्यासाठी गोव्याचे येण्याचे निमंत्रण यावेळी तवडकर यांनी गडकरी यांना दिले.

या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे जुलै महिन्यात गोव्यात येणार असले, तरी त्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे रमेश तवडकर यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. जुलै महिन्यात श्रमधाम योजनेंतर्गत आणखी 50 घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती तवडकर यांनी गडकरी यांना दिली आणि पायाभरणी समारंभाला हजर राहण्याचे त्यांना निमंत्रण दिले. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
या दिल्ली दौऱ्यात तवडकर यांनी गजेंद्र सिंग शेखावत यांच्याशी गोव्यातील कला-संस्कृती यासंबंधी चर्चा केली. तसेच काणकोण येथे दरवर्षी होत असलेल्या लोकोत्सवाविषयी त्यांना माहिती दिली.