‘श्रमधाम’ योजनेखाली वर्षाला 500 घरे बांधणार : सभापती

0
18

अत्यंत गरीब व बेघर लोकांना घरे बांधून देण्यासाठीची आपली ‘श्रमधाम’ ही योजना आता संपूर्ण गोव्यात राबवून वर्षाला सुमारे 400 ते 500 बेघरांना घरे बांधून देण्याचा निर्धार राज्याचे सभापती रमेश तवडकर यांनी केला आहे. श्रमधाम’ ह्या संकल्पनेचा सदिच्छादूत (अँम्बेसेडर) म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा काल तवडकर यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

श्रमधाम योजनेखाली बेघरांना घरे बांधून देण्यासाठी रमेश तवडकर यांना दानशूर व्यक्तींकडून आर्थिक सहाय्य, तर काहींकडून श्रमदान सेवा मिळत आहे. या संकल्पनेद्वारे तवडकर यांनी आतापर्यंत 28 घरे उभी केलेली असून, आपल्या काणकोण मतदारसंघानंतर ते आता राज्यभरात अशी घरे उभी करण्याचे स्वप्न बाळगून आहेत. आपल्या काणकोण मतदारसंघातील बेघरांना घरे बांधून दिलेल्या तवडकर यांनी आता काणकोणनंतर सांगे, केपे, सावर्डे (दक्षिण गोवा) व प्रियोळ (उत्तर गोवा) येथे आपला मोर्चा वळविला असून, राज्यभरातील बेघरांना श्रमधाम योजनेद्वारे पक्के घर बांधून देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. तवडकर यांच्या या योजनेला आर्थिक मदत करणाऱ्यांची संख्या ही जशी मोठी आहे, तशीच घरे बांधण्यासाठी प्रत्यक्षस्थळी जाऊन श्रमदान करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
आपल्या ह्या योजनेला आतापर्यंत सुमारे 1 हजार स्वयंसेवकांनी पाठिंबा देऊन त्यासाठी नोंदणी केली आहे. या लोकांच्या मदतीमुळे ही घरे उभी राहू लागली आहेत. स्वतःचे हक्काचे घर असावे ही राज्यातील गरिबातल्या गरीब माणसाची मूलभूत मागणी श्रमधाम योजनेमुळे आता पुरी होऊ लागली आहे, असे त्यांनी नमूद केले.