(पायाला भिंगरी)
– सौ. पूर्णिमा केरकर
(भाग ३)
ते दिवस चैतन्याने भारावलेले होते. देशासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी लोकांनी ठेवली होती. ‘देश हा देव’ आहे अशी भावना बाळगून ‘जिंकू किंवा मरू’ या ध्येय-ध्यासाने भारतीय लोकमानस स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी होत होते. स्वातंत्र्यप्रेमी जनतेत पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली होती. ब्रिटिश सरकारने तेजोभंग करण्यासाठी हर तर्हेचे प्रयत्न आरंभले होते. अशाच प्रयत्नांपैकी रौवलेट कायदा मंजूर केला होता. या कायद्याच्या आधारे मनमानेल तेव्हा ब्रिटिश पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करून चौकशीसाठी जेलबंद करू शकत होते. यासंदर्भात अन्यायाविरुद्ध दाद मागणे कठीण होते. या कायद्याच्या विरोधात महात्मा गांधींनी रणशिंग फुंकले होते. हा कायदा अन्यायकारक आहे, त्यामुळे शांततापूर्ण मार्गाने देशातील जनतेने या कायद्याला विरोध केला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले होते. महात्मा गांधींच्या या शब्दांनी सर्वसामान्य जनतेत वीर औक्षहिणींचे सामर्थ्य निर्माण झाले होते. देशभरातील जनतेत अन्यायाविरुद्ध निकराने प्रतिकार करण्याची भावना निर्माण झाली होती. गांधीजींच्या आवाहनानुसार पंजाबातील अमृतसर येथील जनता जालियनवाला बागेत प्रतिकार करण्यासाठी एकत्रित आली होती. रौवलेट कायदा हा काळा कायदा आहे, या कायद्याला प्राणपणाने विरोध केला पाहिजे, याच भावनेने एकत्रित आलेले लोक शांतपणाने त्या काळ्या कायद्याविरोधात आपला निषेध व्यक्त करत होते. ब्रिटिश सरकारने कोणत्याही परिस्थितीत रौवलेट कायदा लागू करण्याचेच ठरवले होते आणि त्यासाठी या कायद्याला अमृतसरमध्ये होणारा तीव्र विरोध मोडून काढण्यासाठी जनरल डायर याची नियुक्ती केली होती. सविनयपणे विरोध दर्शविणार्या लोकांना जन्माची अद्दल घडविण्याचा निर्णय घेऊनच डायर सशस्त्र पोलीस घेऊन त्या ठिकाणी आला. जालियनवाला बागेत जाणारा मार्ग त्याने रोखून धरला आणि निःशस्त्र जनतेवरती त्याने बेछूटपणे गोळीबार करण्याचा आदेश दिला. सैतान संचारल्यागत सलगपणे गोळीबार चालूच राहिला. सैरावैरा धावणार्या लोकांना क्रूरपणे मारण्यात आले. काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी चारशे लोक मृत्युमुखी पडले. शेकडो जायबंदी झाले. निःशस्त्र जनतेवरती अमानवी रीतीने गोळीबार करण्याचे क्रौर्य याच जालियनवाला बागेत घडले होते. चारशे स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या झोटिंगशाहीला विरोध दर्शवून मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील त्यांच्या अपूर्व त्यागाची स्मृती आजही तिथे अनुभवायला मिळते. मन आणि तन एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करते. ही जालियनवाला बाग प्रत्येक भारतीयाने अनुभवणे महत्त्वाचे आहे.
जालियनवाला बागेचा प्रत्येक दगड या हौतात्म्याला साक्षी होता. अमृतसरच्या प्रवासात जालियनवाला बागेतील प्रवेश हा अविस्मरणीय क्षण होता. कित्येक निष्पाप जिवांनी प्राण वाचविण्यासाठी बागेतच असलेल्या विहिरीचा आधार शोधला. तशाही स्थितीत गोळीबार झाला होता. प्राण कित्येकांचे गेले होते. या रक्तलांछित घटनेची आणि ब्रिटिशांच्या क्रौर्याची आठवण या बागेत पाऊल ठेवताक्षणीच झाली. १३ एप्रिल १९१९ या दिवसाची आठवण होऊन अंगावर सरसरून काटा उभा राहिला. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य लाभलेले आहे. या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी अशा असंख्य निर्भयी वीरांनी प्राणांची बाजी लावली होती त्याची आठवण प्रकर्षाने करून देण्यासाठी जालियनवाला बागेला भेट देणे जरुरी आहे. आठ-नऊ दशकांपूर्वी येथे घडलेली ही घटना जालियनवाला बागेत असलेल्या स्मृतिस्तंभामुळे सजीव होऊन उठते. इथल्या भिंती गोळीबाराच्या खुणा जोपासत इथे भेट देणार्या प्रत्येक भारतीयांना त्या क्षणाची आठवण करून देतात.
काही दशकांपूर्वी पंजाब प्रांत हा नेहमीच चर्चेत राहिला होता तो तेथील खलिस्तानी राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी होणार्या हालचालीमुळे. या भूमीने अशा अनेक चळवळी अनुभवल्या. क्रांतिकारकांची, लढवय्या वीरांची ही भूमी. खलिस्तानी राष्ट्राची निर्मिती करण्यास पंजाबात फुटीरतावादी व दहशतवादी चळवळ उभी राहिली. त्या विरोधात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार हाती घेतले. त्यात हजारो शिखांचा बळी गेला. या सार्या कटू स्मृती अमृतसरच्या कालपटलावर कोरलेल्या आहेत. अमृतसरचे झळाळते सौंदर्य लाभलेले सुवर्णमंदिर हे या प्रदेशाचे वैभव आहे. या मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवताना काही वेदनामयी क्षण आठवल्यावाचून राहिले नाहीत.
अमृतसर, पूर्व पंजाबातील नजरेत भरणारे असे कृषिप्रधान शहर. पंजाब प्रांत झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या पाच नद्यांनी परिपूर्ण असलेला प्रदेश म्हणून ‘पंजाब’ नावाने प्रचलित. अमृतसर हे बियास नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. या भूमीला जसे वीरत्वाचे, शौर्याचे प्रतीक मानले गेले आहे, तसेच येथील भक्तिसामर्थ्य तेवढेच तोलामोलाचे आहे. या शहराच्या निर्मितीविषयी आख्यायिका सांगितली गेलेली आहे. प्रभू रामचंद्राने अश्वमेध यज्ञात सोडलेल्या अश्वाला लव-कुशाने पकडले व राम-लक्ष्मणाला लढण्याचे आव्हान दिले. लव-कुश जोडीने राम-लक्ष्मण, भरत-शत्रुघ्न यांना मूर्च्छित पाडले. त्यांना परत जागृत करण्यासाठी लव-कुशानी स्वर्गातून अमृत आणले. ते या चौघा भावंडांवर शिंपडून त्यांना भानावर आणले व उरलेले अमृत जमिनीत पुरून टाकले. ज्या जागेवर म्हणे हे अमृत पुरले होते त्याच जागेवर शिखांचे चौथे गुरू रामदास यांना शिखांसाठी मंदिराची उभारणी करावी असे वाटले. त्यासाठी त्यांनी प्रथम तलाव खोदण्यास प्रारंभ केला. त्या तलावाचे नावच ठेवले गेले अमृतसरोवर. तेच अमृतसर म्हणून नावारूपास आले असे सांगितले जाते. गुरू रामदासानी ही भूमी वसवली म्हणून रामदासपूर असे या जागेला नाव पडले होते. मंदिरामुळे या जागेची ख्याती सर्वदूर पोहोचली. तीर्थक्षेत्राचा सन्मान या जागेला प्राप्त झाला. तिथले पाणी स्वच्छ, नितळ, पारदर्शी मृतासमान म्हणून ‘अमृतसर’ हे नाव जनमानसात रूढ झाले असेही मानले जाते. सुवर्णमंदिराचे सौंदर्य अनुभवणे हा वेगळेपणाचा अनुभव होता. हिंदू आणि शीख यांचे हे भक्ती-श्रद्धेचे स्थान. मंदिरात प्रवेश करताना- शिखांच्या गुरुद्वारात प्रवेश करताना- डोक्यावर शाल अथवा रुमाल गुंडाळूनच जावे लागते. उघड्या डोक्याने जाता येत नाही. अमृतसर, संतोषसर, रायसर, विवेकसर व कमलसर अशी पाच तीर्थे, त्याचप्रमाणे दुर्गा, सत्यनारायण, लक्ष्मीनारायण अशी प्रसिद्ध मंदिरेही येथे आहेत. कार्तिक मासात येथे भरणारी जत्रा ही भाविकांसाठी मोठी पर्वणीच असते.
या प्रदेशाला सौंदर्यासक्त मनाची माणसे लाभलेली आहेत. रंग-गंधाची, सशक्त कृषिजीवन जगवणारी इथली माती मनामनांत चैतन्याची, सृजनत्वाची सनद जागविणारी. इथल्या वास्तू सौंदर्याची मुक्तपणाने उधळण करणार्या. आत्माभिमान, स्वाभिमान, शौर्य तर इथल्या कणाकणांत रुजलेले. असे असतानाही इथल्या सौंदर्याला क्रौर्याचे गालबोट लागलेले दिसते. आज जरी मुक्तपणे हे सारे अनुभवण्यासाठी मन आतुरलेले असले तरीसुद्धा इतिहासाच्या आठवणींनी मनावर वेदनेचा ओरखडा उमटतोच.
पंजाब प्रांतातील अमृतसरच्या भटकंतीत आणखीन एक जागा सारखी खुणावत होती ती म्हणजे भारत-पाकिस्तानची सीमा असलेली वाघा बॉर्डर! भारत-पाकिस्तान आज जरी दोन स्वतंत्र देश असले तरी एकेकाळी ते एकाच संस्कृतीचे भागीदार होते. ‘हडप्पा’ आणि ‘मोहिंजोदाडो’ या सिंधुसंस्कृतीचा वारसा मिरविणारा पाकिस्तान हे या भूमीचे अतूट अंग होते. १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री आपल्याला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिले ते मुळी एकाच भूमीचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे करूनच. हे दोन्ही देश अस्तित्वात आल्यापासून या दोहोंतील व्यवच्छेदक लक्षणे म्हणजेच सीमारेषा. पंजाब प्रांतात या दोन्ही देशांतील ही सीमारेषा ‘वाघा’ येथे असून दोन्ही बाजूने राष्ट्रातील सैनिक डोळ्यांत तेल घालून आपापल्या राष्ट्राची अस्मिता आणि गौरव राखण्याचा प्रयत्न करत आहेत. एरव्ही भारत-पाकिस्तान या दोन देशांमध्ये जर क्रिकेटचा सामना चालू असेल तर प्रत्येक भारतीय जणू काही लढाईच्या पवित्र्यात असल्यासारखाच वागताना दिसतो. तिथे देशभक्ती उफाळून वर येते. आपला देश जिंकल्यानंतर ऊर अभिमानाने भरून येतो. एकट्याचे अपयश हे दुसर्याचे यश बनून समोर येते. परंतु वाघा बॉर्डरवर मात्र दोन्ही देशांतील ऐक्य, सौहार्द नजरेस पडते. एकमेकांना दिवसातून दोन वेळा सकाळच्या प्रहरी व संध्याकाळी सलामी देणारे सैनिक अनुभवताना मन भरून येते. अभूतपूर्व समरसतेचा एकमेकांप्रति आदरभाव व्यक्त करण्याच्या या क्षणात भागीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदायाची उपस्थिती असते. उच्च रवात लावलेली देशभक्तीपर गीते हृदयात स्वाभिमानाचे भान जागवतात. वातावरणच एकूण भारल्यागत असते. आपल्या देशासाठी आपण काय करू आणि काय नको असेच काहीसे वाटत राहते. देशाला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या प्रत्येक वीर-वीरांगनेसमोर नतमस्तक व्हावेसे वाटते. अखंड देशाचे विभाजन करून त्यात कायमस्वरूपी द्वेष-तिरस्काराची भावना निर्माण केलेल्या ब्रिटिशांच्या वागणुकीची चीड निर्माण होते. जल्लोषात- स्वाभिमानाने या क्षणांना सामोरे जात परतीचा मार्ग स्वीकारताना या भूमीविषयीची कृतज्ञता मनात दाटून आल्याशिवाय राहत नाही.
गुरू गोविंदसिंग हे शिखांचे गुरू. गुरू गोविंदसिंगानी इथल्या मनांना धर्म आणि आत्मसन्मानासाठी मृत्यूसुद्धा स्वीकारण्याची प्रेरणा दिली. जेव्हा जेव्हा या देशावर परकीयांची संकटे आली, त्या-त्या वेळी इथल्या शिखांनी आपल्या प्राणांची बाजी लावून, हौतात्म्य पत्करून देशाचा गौरव केला, देशाची अस्मिता राखून ठेवली. आपला देश हा कृषिप्रधान आहे. पंजाबसारख्या पंचनद्यांच्या प्रदेशात तर ही कृषिसंस्कृती प्रगल्भ आणि वैभवसंपन्न असलेली जाणवली. वार्यावर सळसळणारी गव्हाची शेते, रंग-गंधाची त्यातही पिवळ्या रंगाची उधळण करणारी फुलांची नक्षी तर इथले खास वेगळेपण. इथल्या कणाकणांत चैतन्य, सृजनत्व भरून राहिलेले आहे त्यामुळेच ‘बल्ले बल्ले’ची उत्स्फूर्तता सातत्याने जाणवत राहिली. इथली मलईदार लस्सी, तिची अवीट गोडी तर अविस्मरणीय अशीच! या भूमीने कित्येक वर्षे शौर्य आणि क्रौर्य अनुभवले. शौर्यातून जनमानसात तेजाचे स्फुलिंग जागवले. आपल्या भूमातेविषयीचा स्वाभिमान इथल्या मातीच्या कणाकणांतून अनुभवता येतो. भारतमातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी इथल्या असंख्य भूमिपुत्रांनी हौतात्म्य पत्करले. झुंजार क्रांतिकारी भगतसिंग हे तर क्रांतीचे प्रातिनिधिक रूप. तनामनांत सळसळता उत्साह, स्फुलिंग चेतविणार्या या भूमीविषयीची कृतज्ञता हृदयात बाळगूनच तिचा निरोप घेतला.