शेळमेळावली येथे नागरिकांनी गवा रेडा दाखवून सुध्दा वन खात्याच्या हातून निसटला. शोध पथकांचे एक कर्मचारी विशांत गांवकर याच्यावर गव्या रेड्याने हल्ला करुन जखमी केले. त्यामुळे नागरिकांत वन खात्याविरोधात संताप व्यक्त होत असून संतप्त नागरीकांनी उप वनपाल कुलदिप शर्मा यांची गाडी रोखुन धरली. काल दिवसभर उप वनपाल कुलदिप शर्मा याच्या नेतृत्वाखाली गव्याचा शोध सुरु होता. अनेक वेळा वन अधिकार्यांच्या डोळ्यासमोरून जाउनही वन अधिकार्यांना गव्याला जेरबंद करता आले नाही. मंगळवारी सायंकाळी चार वाजता नागरिकांनी गव्या रेड्याला गावाजवळील देवळाजवळ पाहीले होते. त्याची माहिती नागरिकांनी वन अधिकार्याना दिली होती. त्या ठिकाणी वन अधिकारी येऊन त्या गव्यारेड्यावर पाळत ठेऊन होते. पण वन अधिकार्यानी रात्री उशीरा पाळत काढल्याने तो गवा तेथून निसटला. सकाळी त्या गव्याची परत शोध मोहिम घेतली पण त्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
गव्याने विशांत गांवकर यांच्यावर हल्ला केला त्यात तो जखमी झाला. विशांत शोध पथकात होता. गवा रेडा जंगलात बसला होता. ज्यावेळी शोध पथक गव्या रेड्यापाशी पोचले त्यावेळी अचानक गव्याने हल्ला केला. त्याला उपचारासाठी वाळपई हास्पिटलात नेण्यात आले.
गवा पकडला नसल्याने नागरिक आक्रमक होउन उपवनपाल कुलदिप शर्मा ह्याचे वाहन नागरिकांनी रोखुन धरले. गवा जखमी असून त्याला पकडणे गरजेचे आहे. पण तितकेच कठीण आहे. कारण गव्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्याला बेशुध्द होण्यासाठीच वीस मिनिटे लागतात. त्यामुळे तो गावाजवळ नुकसानी करु शकतो. तसेच त्याचे वजन दिड टन पेक्षा जास्त आहे. त्याला बेशुध्द हे रस्त्याजवळच करावे लागणार ज्या ठिकाणी क्रेन जाईल. कारण तेवढे वजन उचलणे शक्य नाही. त्यासाठी सर्व विचार करूनच पाउल उचलावे लागते, असे उपवनपाल कुलदिप शर्मा यांनी सांगितले.