शॉर्ट सर्किट अन्‌‍ गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर खाक

0
3

>> गाळवाडा-प्रियोळ येथील घटना; लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज

गाळवाडा-प्रियोळ येथील संदेश च्यारी यांच्या घराला गुरुवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग पसरल्यानंतर स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. मोठा आवाज ऐकू आल्यानंतर स्थानिक लोकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडली, त्यावेळी सुदैवाने घरात कोणीही नव्हते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून, अंदाजे 15 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

संदेश च्यारी यांचे घर डोंगराळ भागात उंचावर आहे. त्यांच्या 14 वर्षीय मुलावर काही दिवसापूर्वी शस्रक्रिया करण्यात आली. त्याला अधूनमधून इस्पितळात न्यावे लागत असल्याने घरातील सर्वच जण सीमेपाईण-मंगेशी येथील आपल्या भावाच्या घरी राहत होते. गुरुवारी रात्री संदेश च्यारी यांच्या पत्नी व मुलीने गाळवाडा येथील घरी जाऊन साफसफाई केली होती. पुढील काही दिवसात घराचे रंगकाम करण्याची तयारी सुरू होती. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पत्नी व मुलगी घराला कुलूप लावून सीमेपाईण येथे गेली. यानंतर रात्री 12.30 वाजता संपूर्ण घराला आग लागली आणि खोलीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे स्थानिक लोकांनी च्यारी यांच्या घराजवळ धाव घेतली. त्यावेळी आगीने उग्र रूप धारण केल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. च्यारी यांचे घर डोंगराळ भागात असल्याने अग्निशमन दलाचे वाहन घराजवळ नेणे शक्य नव्हते; पण कर्मचाऱ्यांनी बरेच परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.

कपडे, दागिने, भांडी, पुस्तके जळाली
आगीत संपूर्ण घराचे नुकसान झाले आहे. आगीत कपडे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम मुलांची पुस्तके, भांडी व अन्य वस्तू जळून गेल्या आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम व अन्य साहित्य जळून गेले. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुलांची सर्व पुस्तकेही जळून गेली.