शैलीदार लेखक ः शिरीष कणेकर

0
59
  • विजय कापडी

आई आणि पुढे बाबा गेल्यावर त्या दोघांच्या आठवणी शिरीष कणेकर जन्मभर विलक्षण हळवेपणाने काढत राहिले. हा त्यांचा हळवेपणा क्षणभर नजरेआड केला तर मात्र शिरीष कणेकरांचा वेगळाच चेहरा वाचकांसमोर त्यांच्या दिलखुलास शैलीत लिहिलेलं लेखन वाचताना येतो.

गेल्या काही दिवसांपासून कलाक्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ मंडळीकडे यमधर्माची नजर वळलेली दिसते! आधी सुलोचनाबाई, नंतर रविंद्र महाजनी, सहा दिवसांपूर्वी जयंत सावरकर आणि त्यांच्या पाठोपाठ पुढच्याच दिवशी शिरीष कणेकर. गेल्या महिन्याच्या सहा तारखेला शिरीष कणेकरांनी वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केली; पण सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा त्यांचा योग चुकला. अर्थात ते या सोहळ्याला मान्यता देणार नव्हतेच, असं का कुणास ठाऊक, पण उगाचच वाटतं खरं.

शिरीष कणेकर मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण या गावचे. त्यांचे वडील मधुकरराव रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यांची बदली मुंबईला भायखळा रेल्वे हॉस्पिटलात झाली आणि तेव्हापासून शिरीष कणेकर ‘मुंबैकर’ झाले ते कायमचे. लहानपणीच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांच्या वडिलांनी आईची जागा घेऊन त्यांना काही कमी पडू दिले नाही; पण आई ती आईच! आपल्या सोबत आईचं अस्तित्व नसणं ही बाब म्हणजे शिरीष कणेकरांना आयुष्यभर छळणारी वेदनाच. आई आणि पुढे बाबा गेल्यावर त्या दोघांच्या आठवणी शिरीष कणेकर जन्मभर विलक्षण हळवेपणाने काढत राहिले. हा त्यांचा हळवेपणा क्षणभर नजरेआड केला तर मात्र शिरीष कणेकरांचा वेगळाच चेहरा वाचकांसमोर त्यांच्या दिलखुलास शैलीत लिहिलेलं लेखन वाचताना येतो.

त्यांच्या खूप खूप आवडीचे विषय दोन. हिंदी चित्रपट संगीत आणि क्रिकेट. त्यांच्या आवडीनिवडी पक्क्या. त्यात बदल संभवतच नाही. क्रिकेटमधला त्यांचा एव्हरग्रीन हिरो म्हणजे अजित वाडेकर. विजय मर्चंट यांच्यानंतर अजित वाडेकरांना डोक्यावर घेणारी व्यक्ती म्हणजे शिरीष कणेकर. चित्रपटक्षेत्रातला सर्वाधिक पसंतीचा हिरो म्हणजे दिलीपकुमार. दिलीपकुमार यांना ते अभिनयातला बादशहा मानत. बादशहाच्या वरचढ कुणी असूच शकत नाही, हे त्यामागचं कारण असू शकतं. थोडी अतिशयोक्ती करायची झाली तर असं म्हणता येईल की, दिलीपकुमारचं स्वतःवर नसेल इतकं प्रेम शिरीष कणेकरांनी त्यांच्यावर केलं. पण आपल्या लेखनात त्यांचा ‘युसुफ’ असा उगाचच जवळीक दाखवणारा उल्लेख कधीच केला नाही. त्यांच्या दिलीपकुमार प्रेमाविषयी अनेकांनी त्यांची खिल्लीही उडवली. ‘दिलीपकुमारची चमचेगिरी करण्यासाठी तुम्हाला किती पैसे त्याच्याकडून मिळायचे?’ या अलीकडे विचारल्या गेलेल्या खवचट प्रश्नाला उत्तर देताना कणेकरांनी अगदी मामुली म्हणजे शंभर-दोनशेच्या आसपास मिळालेल्या रकमांचा उल्लेख केला! त्यांनी कोणे एकेकाळी दिलीपकुमारवर लिहिलेल्या लेखांच्या मानधनाचे ते आकडे आहेत!!
त्यांच्या आवडीची दुसरी व्यक्ती म्हणजे गानसम्राज्ञी लताबाई मंगेशकर. लताबाईंवर त्यांनी जितके भरभरून लिहिले तितके दिलीपकुमारवर लिहिले नाही, यामागचं कारण तेच सांगू शकले असते कदाचित. त्यांच्या आवडीचा संगीतकार म्हणजे ओ. पी. नय्यर. चित्रपटगृहात ओपींचं गाणं सुरू झालं की खुर्चीतल्या खुर्चीत उड्या माराव्याशा वाटतात, असं त्यांनी लिहिलेलं आहे.

ऑगस्ट 1972 सालच्या ‘मोहिनी’ मासिकाच्या चित्रपट विशेषांकात त्यांनी एक लेख लिहिला- ‘गाये लता.’ या दीर्घ लेखात त्यांनी लताबाईंच्या गाण्यांबद्दलच्या इतक्या बारीकसारीक गोष्टी लिहिल्या आहेत की ज्या वाचून खुद्द लताबाईंनाच आश्चर्य वाटलं असावं. त्या लेखात लताबाईंच्या गाण्यांविषयी त्यांच्या मनात उपस्थित झालेले प्रश्न मांडले आहेत आणि शेवटी लिहिलं आहे की, (हे सगळं विचारण्यासाठीच) एकदा मी लताला भेटणार आहे! कदाचित या लेखानंतरच लताबाईंनी स्वतःहून त्यांच्याशी ओळख करून घेतली असावी. इंग्रजी पत्रकारितेच्या पेशात असलेल्या शिरीष कणेकरांकडून लताबाईंनी कुणाला तरी इंग्रजीत पाठवायचा मजकूर लिहून घेतला आणि त्याबदल्यात लताबाईंनी आपल्या माहिम येथील निवासस्थानी जेवणाला यावे, अशी विनंतीवजा अट कणेकरांनी घातली असावी, जी त्यांनी मान्य केली. यानंतरच्या कधीतरी लताबाईंच्या घरी बराच वेळ गप्पा झाल्यानंतर निरोप घेताना ते म्हणाले, “छान वेळ गेला!”
यावर लताबाई मिस्कीलपणे पटकन्‌‍ उत्तरल्या, “तुमचा गेला हो!”
माझ्या माहितीप्रमाणे ‘गाये चला जा’ हे एप्रिल 1978 साली प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं पुस्तक. ‘किर्लोस्कर’ मासिकाचे संपादक मुकुंदराव शं. किर्लोस्कर यांनी प्रकाशित केलेलं. या पुस्तकात लताबाई, ओ. पी. नय्यर यांच्या जोडीला तलत मेहमूद, मुकेश, संगीतकार मदनमोहन, सी. रामचंद्र, दत्ता कोरगावकर, एस. डी. बर्मन, पं. भगतराम यांच्यावरही लेख आहेत. शिवाय विलक्षण मनस्वी संगीतकार सज्जाद हुसेन यांच्याशी बातचित करून लिहिलेला लेखही आहे. चित्रपटविषयक लेख लिहू पाहणाऱ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरावे.
सिनेसंगीत- क्रिकेट या आवडीच्या विषयांवर मराठी नियतकालिकांच्या वेळोवेळी निघणाऱ्या विशेषांकांतून लेखन करत असले तरी शिरीष कणेकर हे व्यवसायाने इंग्रजी पत्रकार. 2010 साली त्यांना या पत्रकारितेला कायमचा रामराम करण्याची एक विलक्षण क्लेशदायी घटना घडली. पण या घटनेच्या धक्क्यातून त्यांनी स्वतःला पूर्णपणे सावरले ते विविध वृत्तपत्रांतून नियमित स्तंभलेखन वा सदर-लेखन करूनच. एका परीनं त्यांची पत्रकारिता कायमची सुटली ही वाचकांच्या दृष्टीनं इष्टापत्तीच म्हणायची. महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रमुख आणि लोकप्रिय दैनिकांच्या रविवार-पुरवणीसाठी त्यांनी नियमित सदर-लेखन केले. त्यांच्या सदराच्या लोकप्रियतेचा सुपरिणाम म्हणजे एका पाठोपाठ त्यांची पुस्तके निघाली. त्यांनी लिहिलेल्या चाळीसएक पुस्तकांपैकी तीसहून अधिक पुस्तके ही स्फूटलेखनाची आहेत. त्यांची शीर्षकेच इतकी मजेशीर, म्हणजे आंबटचिंबट, गोळी मार भेजे में, मखलाशी, लगाव बत्ती, साखर फुटाणे, सूर पारंब्या… आतला मजकूर किती मजेशीर असेल?
लेखनाव्यतिरिक्त शिरीष कणेकरांनी जाहीर एकपात्री कार्यक्रमही केले. या कार्यक्रमाची सुरुवात या क्षेत्रातील नामवंत व. पु. काळे, अनंत भावे यांच्या सोबतीने झाली. कालांतराने ते स्वतःच हे कार्यक्रम करू लागले, जे रसिकांना मनोमन भावले. यानिमित्ताने त्यांनी परदेशवाऱ्याही केल्या आणि परदेशवारीनंतर अपरिहार्यपणे लिहिली जाणारी प्रवासवर्णनेही लिहिली.

शिरीष कणेकरांचे रसिक चाहते हजारो असतील, पण त्यांच्या खास मित्रमंडळीत अवघेच होते. ‘लोकप्रभा’चे लेखक अभिजित देसाई हे त्यांचे खास मित्र. व्यंगचित्रकार विकास सबनीस, नेहमीच पांढऱ्या शर्ट-पँटमध्ये दिसणारे गिरगावचे अशोक मुळे (यांना कणेकरांनी टोपण नाव दिले- खडू!). मुंबई-दादर येथील शिवाजीपार्कच्या कठड्यावर शिरीष कणेकरांची मैफल जमायची. मध्यभागी शिरीष कणेकर आणि डाव्या-उजव्या बाजूला मित्रमंडळी. येथून येता-जाताना, मधूनच हशा पिकताना, गप्पा रंगताना कित्येकांनी ऐकले-पाहिले असतील.
त्यांच्या दिलखुलास स्वभावाचा मला भावलेला विशेष म्हणजे त्यांच्यावर इतरांनी केलेल्या विनोदाचे जाहीर प्रदर्शन ः
क्रिकेट संबंधित एक कार्यक्रम वृत्तपत्रासाठी ‘कव्हर’ करण्यासाठी एके ठिकाणी ते गेले असता प्रवेशद्वारापाशी त्यांना सुनिल गावस्करनी पाहिले.
“शिरीष कणेकर ना?” गावस्करांनी हसत विचारले.
आपलं नाव गावस्करांच्या स्मरणात राहिलेलं पाहून कणेकर खूश झाले. त्यांनी विचारलं, “माझं नाव तुमच्या लक्षात राहिलं?”
गावस्कर उत्तरले, “काय आहे… माझ्यापेक्षा उंचीत कमी असणारे माझ्या लक्षात राहतात!!”

  • कणेकर गेले; पण त्यांची पुस्तकं, त्यांच्या आठवणी जोपर्यंत आपल्यापाशी आहेत, तोपर्यंत तरी ते आपल्यातच राहतील… नाही का?