वास्को (न. प्र.)
शिक्षणाच्याबाबतीत ज्या संधी मिळतात त्याचा लाभ अवश्य घ्या. इच्छाशक्ती असल्यास आपणास यश कोणत्याही मार्गाने मिळू शकते. आपण जे क्षेत्रे निवडतो त्यात यश मिळविण्याचे प्रयत्न करा. अजिंक्यासारखी तयारी करा आणि केव्हाच खचून जाऊ नका, असा उपदेश सीमा शुल्क संचालनालयाचे साहाय्यक आयुक्त डॉ. राघवेंद्र पी. रायकर यांनी गौरवार्थी विद्यार्थ्यांना केला.
मडगाव येथील दैवज्ञ, ब्राह्मण सेवा संघ या संस्थेने रवींद्र भवन परिषदगृहात आयोजित केलेल्या ज्ञातीतील विद्यार्थ्यांच्या गौरव तथा बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वास्कोतील समाज कार्यकर्ते तथा माजी मुख्याध्यापक अनिल चोडणकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच दैवज्ञ ब्राह्मण समाज सेवा संघ या संघटनेचे अध्यक्ष आत्मानंद पेडणेकर, चिटणीस पंढरीनाथ चोडणकर व खजिनदार किशोर वेर्णेकर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. रायकर म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मविश्वास बाळगला पाहिजे. शिक्षण अर्धवट सोडता कामा नये. आपल्यापुढे येणार्या मानवी आव्हानाना तोंड देण्याची क्षमता अंगी बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सन्माननीय अतिथी माजी मुख्याध्यापक अनिल चोडणकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ उच्च गुणांनी उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करता सर्व क्षेत्रात सहभागी होतो तोच खरा विद्यार्थी मानला जातो. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी कितीही शिक्षण घेतले आणि जर त्याच्या अंगी संस्कारीत गुण नसल्यास तो माणूस होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणाबरोबर संस्काराचेही शिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते गेल्या दहावी परीक्षेत ७० टक्केहून अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या दैवज्ञ ब्राह्मण ज्ञातीतील विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरवचिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला. तसेच सर्व विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते सौ. ज्ञानघा ज्ञानेश्वर कोलवेकर या निवृत्त मुख्याध्यापिकेचा तसेच समाजकार्यात योगदान दिल्याबद्दल शेख शंकर रायकर यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. संघाचे अध्यक्ष आत्मानंद पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप लोटलीकर तर पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन किशोर रिवणकर यांनी केले.