२५ गावांत घरोघरी समस्या जाणून घेणार
कृषी खात्याने गोव्यातील ज्या २५ गावात शेतीचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या गावातील घरोघरी जाऊन किती लोकांना शेती करण्यास रस आहे, त्यासाठी त्यांना कृषी खात्याकडून कशा प्रकारचे सहाय्य व मदत हवी आहे हे जाणून घेण्यात येणार असल्याचे कृषी खात्यातील सूत्रांनी सांगितले. येत्या आठवड्यापासून हे काम सुरू होणार आहे.
किती लोकांना शेती करायची आहे, त्यांना कशा प्रकारची शेती करायची आहे, त्यासाठी त्यांना काय काय हवे आहे याची घरोघरी जाऊन माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही माहिती संकलित केल्यानंतर त्या त्या गावातील लोकांना त्यांच्या मागणीनुसार विहिरी, जलसिंचनासाठी वाहिन्या, धान्य साठवून ठेवण्यासाठी कोठारे, बियाणी, कलमे, रस्ता हवा असल्यास रस्ता, खाजन शेती असल्यास तेथे बांध असे सर्व काही उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात येणार आहे.
घरोघरी लोकांना भेटायला जाताना सोबत आर्डीएचे अधिकारी, बँकेचे अधिकारी यांनाही नेण्यात येणार आहे. या लोकांची घरोघरी जाऊन भेट घेतल्यानंतर त्या त्या गावाचा शेतीदृष्ट्या कसा विकास करता येईल यासंबंधीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्या गावांचा शेतीच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या गावात जाऊन खात्याने यापूर्वीच ग्रामस्थांच्या बैठका घेतलेल्या असून प्रत्येक गावात चांगला प्रतिसाद लाभल्यचे सूत्रांनी स्पष्ट केले. दर एका गावातील बैठकीला किमान ७० ते १०० लोकांनी उपस्थिती लावली होती. बैठकांना गावचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, ख्रिस्ती धर्मगुरू (पाद्री) यांनी उपस्थिती लावून विविध सूचना केल्या असे सूत्रांनी सांगितले.
या २५ गावांचा शेतीच्या दृष्टीने विकास करण्यात आल्यानंतर गावातील शेती उत्पादन दुप्पट तसेच काही ठिकाणी तिप्पटही होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. शेतीला चालना देण्यात येणार असलेल्या या गावांत काणकोणमधील खोतीगांव व गावडोंगरी हे गाव आघाडीवर आहेत. सासष्टीतील राय, दवर्ली, सुरावली, फोंडा येथील निरंकाल हे गावही आघाडीवर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पेडणे, सांगे, सत्तरी या तालुक्यातही शेती कधी नव्हे एवढी बहरणार असल्याचा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.