– संदीप मणेरीकर
पायाखाली तुडवताना
निघून येतो एकेक दाणा
जग पाहण्या आसुसलेला
बैलांच्याही पदस्पर्शांना
शेतात पीक डवरून आले की सुरू होते ती लगबगपीक कापण्याची व त्यानंतर ते पीक मळण्याची. आमच्याकडे नाचणी व भात हीच पीकं जास्त. त्यातही भाताचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यामुळे साधारण दिवाळी झाली की भातकापणीची तयारी सुरू होते. आणि भातकापणीनंतर मळणी होते. ही साधारण शेतीच्या कामाची पद्धत असते. आमच्या गावाकडे आमची शेती आहे. आहे म्हणण्यापेक्षा आता होती असंच म्हणावं लागेल. कारण आता शेती नाही पण शेतजमीन मात्र आहे. तिथे भाऊ सध्या राबतो. पण पूर्वी जशी शेती केली जायची तशी मात्र सध्या केली जात नाही ही खरं तर वस्तुस्थिती आहे. एकेकाळी आमच्या घरी शेतीसाठी शेजारच्या गावातून मोर्ले येथून चार चार औताच्या (जोताच्या) जोड्या येत होत्या. अगदी शेत नांगरण्यापासून ते पेरणी होईपर्यंत ह्या जोड्या राबत होत्या. घरी माणसांचा नुसता राबता असायचा. आजी, आई या माणसांना भाकर्या करून देण्यात, त्यांचं चहापाणी, जेवण यातच बुडालेल्या असायच्या. आजोबा, दादा या जोतकर्यांच्या मागे असायचे. त्यांचं चहापाणी, विड्या, चुना-पान-तंबाखू. थोडक्यात त्यांची सरबराई. त्यातच पेरणीच्या काळात धोधो पाऊस पडायचा. त्यामुळे अंगावर असलेली घोंगडी सांभाळत, एका हाताने नांगर सावरत, बैलांना सांभाळत जोत हाकायचं ही मोठी कसरत हे लोक कसे करत होते याचं मोठं कोडं मला आजही पडलेलं आहे. अगदीच जोरात पाऊस पडायला लागला तर मात्र जोत जागच्या जागी थांबवायचं. बैल पाठीवर पाऊस झेलत, शेपट्या हलवत उभे रहायचे. तसेच त्यांचे मालकही. त्यावेळी सारं काम जागच्या जागी थांबायचं. लांबून पाहिल्यास तांबडे, काळे, पांढरे अशा विविध रंगांचे ते बैल व त्यांच्या शेजारी उभे असलेले त्यांचे मालक एखाद्या भिंतीवर काढलेल्या चित्रांप्रमाणे दिसायचे.
आमच्या शेतजमिनीला वायंगण असं म्हणतात. त्यामुळे वायंगणात हा शब्दप्रयोग शेतीबद्दल आहे हे माझ्या गावीही नव्हतं. खरं तर वायंगण म्हणजे शेतजमीन असंच मला तेव्हा वाटायचं. पण वायंगणी हा एक शेतीचा प्रकार आहे हे मला महाविद्यालयीन शिक्षण घेताना कळलं. या वायंगणात आम्ही उन्हाळ्यात खूप मस्ती केलीय. कारण उन्हाळ्यात पेरलेल्या भाताचं दिवसाचं आम्हीच रक्षण करायचो. माळ्याला जाणं, तिथं जाऊन नाटकं करणं, गाणी, अंताक्षरी खेळणं, आदी विविध प्रकार चालू असायचे त्यामुळे आपोआपच भातपिकाचं रक्षण व्हायचं. या भाताची कापणी केल्यानंतर भात एकत्र करून मग त्याची मळणी घातली जाते. ही मळणी घालताना मी बर्याच वेळा मदत केलेली आहे. मळणी घालणे हे माझं शेतातील कामांत सर्वात आवडतं काम होतं. मी शेतातील कुठलीच कामं केलेली नाहीत पण केवळ मळणी घालताना बैलांच्या किंवा रेड्यांच्या मागून फिरण्याचं काम केलेलं आहे. हातात सूप घ्यायचं, एका हातात काठी, चार बैल किंवा रेडे बांधलेले असायचे. त्यांच्याभोवती फिरत रहायचं. समोर पडलेलं भात व गवत खाऊन कोणत्याही क्षणी शेण टाकू शकतात अशी शक्यता असल्याने हातात सूप असायचं. ते शेण त्या सुपात धरायचं असतं. असे प्रकार मळणीत चालत असतात. या सगळ्या प्रकारात बैल किंवा रेड्यांमागून मला गरागरा फिरता येत असे म्हणून मला ही मळणी फार आवडत असे.
कापलेल्या भाताची उंच गोल अशी रास केली जाते. त्याला उडवी म्हणतात. त्या उडव्यावरून दोन्ही हातात मावेल एवढं ते कापलेलं भात खाली मळणी चालू असते त्याठिकाणी त्या बैलांच्या पुढ्यात टाकायचं. त्यातील मळून झालेलं भात बाजूला काढायचं गवत बाजूला काढायचं अशी विविध कामं करण्यासाठी गडीमाणसं राबत असत. पण तत्पूर्वी मळणीसाठी अंगण किंवा खळं तयार करण्याचं एक काम असतं. त्यानुसार जिथे मळणी घालायची आहे, त्याठिकाणी साफसफाई करून अंगण तयार करायचं. त्यानंतर तिथे तेवढी जमीन शेणानं सारवायची असते. त्या ठिकाणी एक मोठा खुंट घट्ट पुरावा लागतो. एवढे सगळे सोपस्कार केले जातात. त्या खुंटाला एक आंब्याचा टाळ बांधला जातो. आणि मग मळणीच्या कामाला सुरूवात होते. साधारण संध्याकाळी किंवा पहाटे या मळणीला सुरूवात केली जाते. भर दुपारी मळणी घातली जात नाही.
आमच्या या वायंगणाशेजारी आणखी एक शेत आहे. त्याला मोर्लेकरांची पुरण असं म्हणतात. कधी कधी त्या ठिकाणीही दादा व आणखी त्या गावातील लोकांना सोबत घेऊन शेती करत होते. मग आम्ही तिथेही शेताची राखण करण्यासाठी अर्थात मजा करण्यासाठी जात होतो. दादा आणि आणखी कोणीतरी माळेकरी रात्रीच्यावेळी या शेताची राखण करण्यासाठी जात होते. तिथे एक-दोन माळे असायचे. त्या माळ्यांवर ते ते लोक जायचे. दादांना शिकारीची आवड होती. ते बंदूक घेऊन जायचे. कधी तरी एखादा डुक्कर त्यांच्या बंदुकीच्या निशाण्यावर असायचा. सकाळी आम्हांला दादा मारलेला डुक्कर दाखवायला घेऊन जात होते. डुक्कर, मेरू, गवेरेडे, ससे, असे कितीतरी प्राणी या भातपिकावर डल्ला मारण्यासाठी येत असत. त्यामुळे या प्राण्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर उरलेल्या पिकाची मळणी घातली जात असे.
मळणी घालून झाली की भात वार्याला देण्याची एक पद्धत आहे. मळून काढलेल्या भाताच्या दाण्यांत किंवा गोट्यांत सालपट, कचरा असतो. तो काढण्यासाठी भाताचे दाणे सुपात भरून ते वारा आला की खाली जमिनीवर हळूहळू पाडायचे असतात. त्यामुळे या दाण्यांबरोबर असलेला कचरा वार्यासोबत उडून जातो व केवळ स्वच्छ दाणे तेवढे खाली रहातात. मग ते दाणे, ते भात पोत्यांत भरून त्याची असली तर वाटणी करून घरी बैलगाडीतून किंवा पाठीवर मारून घरी आणलं जातं.
या एकंदर प्रक्रियेमध्ये किमान आठवडा जातो. यातही कसलाच व्यत्यय आला नाही तर! आज मळणी बंद झालेली आहे. लोकांनी शेती सोडून दिलेली आहे. शेती केली तर त्याचा फायदा शेतकर्यांपेक्षाही इतर जनावरांना जास्त होतो. आज जंगली प्राण्यांच्या शिकारीवर सरकारने कायद्याने बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतात गवेरेडे, मेरू, डुक्कर येऊन आपण कष्टाने पिकवलेले शेत उघड्या डोळ्यांनी काही वर्षांपूर्वी हे शेतकरी पहात होते. मात्र, यावर काहीच उपाय नसल्याने लोकांनी आपली शेती पडीक ठेवणे जास्त पसंत केलेलं आहे. तसंच शेती बंद केल्यामुळे पाळीव जनावरांना नुसतं कसं पोसणार म्हणून तीही विकून ते मोकळे झालेले आहेत. त्यामुळे आज शेतकामासाठी बैल किंवा रेडे मिळत नाहीत. तसंच आजच्या तरुणांना शेतीपेक्षा नोकरीचं जास्त आकर्षण असल्यामुळे नव्या पिढीनेही शेतीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतीसाठी आवश्यक ती माणसं मिळणं दुर्लभ झालेलं आहे. आणि शेवटी आज शेतीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात शेतकर्यांना किती मान आणि पान मिळतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शेती करणार्या आमच्या या देशात सर्वात मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी सगळ्यात जास्त कर्जबाजारी झालेला दिसत आहे. कर्ज आणि बेभरवशी हवामान आणि केवळ आश्वासनी राजकारणी यामुळे या देशातील शेतकर्यांचीच मळणी होत असल्याचे विदारक दृश्य आज जागोजागी शेतकर्यांच्याबाबतीत दिसून येत आहे. या सगळ्याच कारणांमुळे आज आमच्या गावात शेती बंद झालेली आहे. तशीच आमच्या घरचीही बंद झालेली आहे. त्यामुळे मळणीसारख्या प्रथा आज बंद झालेल्या आहेत. त्यामुळे या सुंदर अशा ग्रामीण जीवनाचं एक अंग असलेल्या शेतीतील ‘मळणी’ हा मोती आज ओघळत चाललेला आहे.