शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी मिळणार नुकसानभरपाई

0
40

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट; 3077 शेतकऱ्यांना मिळणार मदत

राज्यातील 2 हजार कृषी कार्डधारक शेतकरी आणि कृषी कार्ड नसलेले 1077 शेतकरी अशा एकूण 3077 शेतकऱ्यांना गणेशचतुर्थीपूर्वी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे, त्या सर्वांना ही नुकसानभरपाई मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कृषी कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ज्या शेतकऱ्यांकडे कृषी कार्डे आहेत व ज्या शेतकऱ्यांकडे ती नाहीत अशा दोन्ही गटातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठीची प्रक्रिया जवळजवळ अंतिम टप्प्यात असून, त्यांना चतुर्थीपूर्वी भरपाई मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यासंबंधी दै. ‘नवप्रभा’ने कृषी संचालक संदीप फळदेसाई यांच्याशी अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नुकसानभरपाईसाठी अर्ज केलेल्यांपैकी 1077 शेतकऱ्यांकडे कृषी कार्डे नाहीत आणि हे सर्व शेतकरी हे भाज्यांचे पीक घेणारे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना झालेले नुकसान हे 66 लाख रुपये एवढे आहे. कृषी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 2 हजार एवढी आहे आणि त्यांना झालेल्या नुकसानीचा आकडा हा 3.15 कोटी रुपये एवढा आहे. या सर्वांना गणेशचतुर्थी सणापूर्वी नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या जुलै महिन्यात राज्यात पडलेल्या विक्रमी मुसळधार पावसामुळे भातशेती तसेच भाज्यांचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून, या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विरोधी आमदारांबरोबरच सत्ताधारी आमदारांनीही गेल्या पावसाळी अधिवेशनात केली होती.

तसेच कृषीमंत्री रवी नाईक यांच्यासह मुख्यमंत्री प्रमोद सावंत व अन्य काही मंत्र्यांनीही शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मान्य करुन त्यांना भरपाई मिळायला हवी, या याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते. अधिवेशनानंतरही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यासाठीची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याने व कृषी खात्यानेही त्यासाठीची तयारी केल्याने शेतकऱ्यांना चतुर्थीपूर्वी नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.