शेतकऱ्यांना आधारभूत किमतीचे पैसे 15 ऑगस्टपूर्वी देणार : मुख्यमंत्री

0
4

ज्या शेतकऱ्यांना पिकावरील आधारभूत किंमतीचे पैसे सरकार देणे आहे त्यांना ते येत्या 15 ऑगस्टपूर्वी देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासाला काल त्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी नारळ बागायतदारांना नारळावरील आधारभूत किमतीचे पैसे मिळाले नसल्यासंबंधीचा प्रश्न काल प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नारळ बागायतदारांसह सगळ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवरील आधारभूत किमतीचे जे पैसे सरकार देणे आहे ते 15 ऑगस्टपूर्वी देण्यात येतील, असे आश्वासन सभाग्ृाहात दिले.

शेतकऱ्यांना त्यांच्या आधारभूत किमतीचे पैसे पावसाळ्यापूर्वी मिळायला हवेत, अशी मागणी यावेळी आम आदमी पक्षाचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना 15 ऑगस्टपूर्वी ते पैसे देण्याची सोय केली जाणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोव्यातील तब्बल 476 शेतकऱ्यांना तर उत्तर गोव्यातील मात्र फक्त 87 नारळ उत्पादकांना हे आधारभूत किमतीचे पैसे मिळणे बाकी आहेत असे सांगून दक्षिण गोव्यातील नारळ उत्पादकांकडे सरकारने दुर्लक्ष का केले आहे, असा सवाल केला.
त्यावर उत्तर गोव्यात नारळ उत्पादक कमी आहेत. तर दक्षिण गोव्यात त्यांची संख्या लक्षणीय आहे आणि म्हणूनच आधारभूत किंमत न मिळालेल्या दक्षिण गोव्यातील नारळ उत्पादकांची संख्या जास्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.