>> दीड वर्षांसाठी कायदे स्थगित ठेवण्याचा होता प्रस्ताव
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनावर अजून तोडगा निघू शकलेला नाही. काल गुरूवारी केंद्र सरकारने हे कृषी कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र हा प्रस्ताव शेतकर्यांनी फेटाळला आहे. काल झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या सभेत हा निर्णय झाला.
बुधवारी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चेची दहावी फेरी झाली होती. त्यावेळी केंद्राने सदर कृषी कायदे दीड वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव शेतकर्यांसमोर ठेवला होता. त्यावर काल गुरूवारी शेतकर्यांनी चर्चा केली व हा प्रस्ताव शेतकर्यांनी फेटाळला. यावेळी हे कायदे पूर्णपणे मागे घ्यावेत हीच आमची मागणी असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
आज दि. २२ रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची अकरावी बैठक होणार आहे. तिन्ही कायदे पूर्णपणे मागे घ्या व हमीभावासाठी कायदे करा या शेतकर्यांच्या मागण्या असून त्यावर शेतकरी ठाम आहेत.