शेतकर्‍यांचा ‘भारत बंद’ शांततेने

0
267

>> बर्‍याच ठिकाणी संमिश्र परिणाम

>> अनेक ठिकाणी परीक्षा लांबणीवर

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी काल मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. शेतकर्‍यांच्या संघटनांनी पुकारलेला ‘भारत बंद’ शांततेने पार पडला. सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत भारतभर हा बंद पाळला गेला.

भारत बंद आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले होते. पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगण, झारखंड आणि दिल्ली आदी राज्यांतून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र ठिकठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. केंद्राने तीन नवीन कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी दिल्लीत जमलेल्या शेतकर्‍यांनी केली आहे. दिल्लीतील सिंघू सीमेवरील नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात मोर्चा काढला. नवीन शेतीविषयक कायदे रद्द करावेत या मागणीसाठी निषेध करणार्‍या शेतकर्‍यांनी दिल्ली-मेरठ महामार्ग रोखला. या नवीन कायद्यांबाबत आंदोलक आणि केंद्र यांच्यात चर्चेतून अद्याप काही तोडगा निघालेला नाही.

विविध राज्यांचा पाठिंबा
आंध्र प्रदेशमध्ये डावे पक्ष आणि एसआफआय या विद्यार्थी संघटनेने विशाखापट्टणम येथे आंदोलन केले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा निषेध केला. कर्नाटकमध्ये कॉंग्रेस नेत्यांनी बंगळुरूमध्ये निदर्शने करत शेतकर्‍यांना पाठिंबा दिला आणि काळे झेंडे दाखवले. पश्चिम बंगालमध्ये सीटू संघटनेने शेतकर्‍यांच्या बंदला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. ओडिशामध्ये भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर डावे पक्ष, कामगार संघटनांनी ट्रेन थांबवत शेतकर्‍यांना पाठिंबा जाहीर केला.

राजस्थानात सत्तारुढ कॉंग्रेस पक्षाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. महाराष्ट्रात सत्तारुढ शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे समर्थन केले. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागांमध्ये बंदचा परिणाम जाणवला. यावेळी काही ठिकाणी सुरू असलेली दुकाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांना ताब्यात घेतले. वाशी मुंबईत शीख रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षण क्षेत्रावर परिणाम
भारत बंदमुळे अनेक राज्यांमधील विद्यापीठाच्या वतीने काल घेण्यात येणार्‍या परीक्षांवर परिणाम झाला आहे. यात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या परीक्षांचाही समावेश आहे. काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, काही परीक्षांच्या सुधारित तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
भारत बंदमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडियाच्यावतीने घेण्यात येणारी सीए फाऊंडेशन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, १३ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
उस्मानिया विद्यापीठानेही परीक्षा स्थगित केल्या आहेत. मात्र आज दि. ९ डिसेंबर रोजी होणार्‍या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. ओडिशा लोक सेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा ८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा पुढील वर्षात म्हणजे २ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाणार आहे.

विरोधी पक्षनेते आज
राष्ट्रपतींना भेटणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत पाच पक्षांचे नेते आज बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. डाव्या विचारांचे नेते सीताराम येचुरीही या नेत्यांमध्ये असणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हे पाच नेते आज संध्याकाळी पाच वाजता भेटणार आहेत. कोविड प्रोटोकॉल असल्याने पाच नेत्यांनाच भेटण्याची संमती राष्ट्रपतींनी दिली आहे.

राष्ट्रपतींसोबत होणारी ही भेट कृषी कायद्यांसंदर्भात असणार आहे. शेतकर्‍यांनी काल भारत बंदचीही हाक दिली होती. या बंदला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, डाव्या विचारांचे पक्ष, शिवसेना या सगळ्यांनी पाठिंबा दर्शवला. आता आज राष्ट्रपतींची भेट घेऊन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंबंधीची चर्चा केली जाणार आहे.