शेअर बाजार लालेलाल! गत 5 महिन्यांत 90 लाख कोटींचा चुराडा

0
4

>> कालच्या एका दिवसात गुंतवणूकदारांनी 9 लाख कोटी गमावले; सेन्सेक्समध्ये विक्रमी 1400 अंकांची, तर निफ्टीमध्ये 426 अंकांची घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी काल शेअर बाजार लालेलाल झालेला पाहायला मिळाला. मागच्या सप्टेंबर महिन्यापासून बाजारात 1.9 टक्क्यांची घसरण झाली असून, गुंतवणूकदारांचा 18 टक्के नफा वाया गेला आहे. 30 सप्टेंबर 2024 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये सूचिबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 474 लाख कोटी रुपये होते, जे 28 फेब्रुवारी रोजी 384 लाख कोटी रुपयांवर घसरले. म्हणजेच, गत 5 महिन्यांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 90 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

मागच्या वर्षी 26 सप्टेंबर 2024 रोजी बाजाराने उच्चांक गाठला होता. त्यानंतर काल सेन्सेक्समध्ये 16 टक्के (12,256 अंक) आणि निफ्टीमध्ये 18 टक्के (3,991 अंक) एवढी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये काल 1,400 अंकाची घसरण झाली आणि निर्देशांक 73,201 वर स्थिरावला. निफ्टीमध्ये 426 अंकाची घसरण होऊन निर्देशांक 22,119 वर स्थिरावला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत काल सुमारे 9 लाख कोटींची घट झाली.
काल सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या स्थितीत पाहायला मिळाले. आयटी, ऑटो, मीडिया आणि टेलिकॉमच्या शेअर्सना विक्रीचा फटका बसला. प्रत्येक स्टॉक 2 ते 3 टक्क्यांच्या दरम्यान घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त एक (एचडीएफसी बँक) तेवढा वधारला. निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर्समध्ये घसरण झाली आणि फक्त 5 मध्ये वाढ झाली. सर्वाधिक घसरण निफ्टी आयटीमध्ये 4.18 टक्के, ऑटोमध्ये 3.92 टक्के, मीडियामध्ये 3.48 टक्के, सरकारी बँकांमध्ये 2.83 टक्के, मेटलमध्ये 1.39 टक्के घसरण झाली. याशिवाय फार्मा, बँकिंग, एफएमसीजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली.
कालच्या घसरणीमागे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचे सांगितले जाते. घसरणीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आयात कर वाढवण्याचा निर्णय, जीडीपी अहवालाची चिंता, आयटी स्टॉक्सची निराशजनक कामगिरी आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री ही कारणे असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.

1996 नंतर पहिल्यांदाच सलग 5 महिने घसरण
1996 नंतर पहिल्यांदाच सलग पाच महिने शेअर बाजारात घसरण झाली आहे. यापूर्वी 1996 मध्ये, जुलै ते नोव्हेंबर असे सलग 5 महिने बाजारात घसरण झाली होती. या 5 महिन्यांत निफ्टी 50 निर्देशांक 26 टक्क्यांनी घसरला होता.

घसरणीमागील प्रमुख कारण मंदावलेली भारतीय अर्थव्यवस्था
अलीकडच्या काही महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये जीडीपी वाढीचा दर 8.2 टक्के होता, तर 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो 6.7 टक्के होता. दुसऱ्या तिमाहीत ती संख्या 5.4 टक्क्यांपर्यंत घसरली. उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे विकासदर मंदावला.