शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’

0
23

>> गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा

कालचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. काल शेअर बाजारात सेन्सेक्स ८७२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही २६८ अंकांची घसरण झाली. सलग दोन सत्रांत शेअर बाजारात घसरण झाल्याने त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला. सलग दोन सत्रातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या ६.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्ह त्याच्या व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले.

अमेरिकेच्या फेड बँकेच्या धोरणाचा भारतीय शेअर बाजाराला मोठा फटका बसला. शेअर बाजाराचा निफ्टी २६८ अंकांनी घसरून १७ हजार ४९१ वर पोहोचला, तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८७२ अंकांच्या पडझडीनंतर ५८ हजार ७७४ वर स्थिरावला. परदेशी गुंतवणूकदारांच्या शेअर खरेदीनंतरही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग दोन दिवसात १७०० अंकांनी घसरला. काल सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये १ ते २.७ टक्क्यांची घसरण झाली. कालच्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारातील भांडवली मूल्य २८०.५२ लाख कोटींवरुन ते २७४.०२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

फेडच्या व्याजदर वाढीमुळे चिंता
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची २५ ते २७ ऑगस्ट या दरम्यान बैठक आहे. या बैठकीत पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. फेडकडून येत्या काळात व्याजदरात ७५ अंकांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील महागाई दर दोन टक्क्यांवर आणण्यासाठी फेडकडून प्रयत्न सुरू आहे.