>> ओखी वादळ गोव्याहून सरकले गुजरातकडे : राज्यातील एकूण ८४ शॅकना लाखोंचा फटका
ओखी चक्रीवादळाचा परिणाम गोव्याच्या किनारी भागांमध्ये शनिवारी रात्रीनंतर पुन्हा रविवारी रात्री तसेच सोमवारी सकाळी व संध्याकाळी बर्याच प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे. उत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी या किनार्यांवर ३ रोजी रात्री १२ पासून ४ रोजी सकाळी १०पर्यंत समुद्राची पातळी वाढल्याने या किनार्यांवरील शॅकची आणखी नुकसान झाले. सलग दोन दिवसांच्या या नैसर्गिक आपत्तीनंतरही शासकीय आपत्कालीन यंत्रणेचे अस्तित्व दिसून न आल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण गोव्यातील पाळोळे, काणकोण, कोळंब, तळपण, गालजीबाग या किनार्यांवर कालही पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच वास्को शहरात काल जोरदार वादळी वारे सुरू झाल्याने मुरगाव बंदरातील कोळशाची भुकटी शहरभर पसरली. दुकाने, कार्यालयांसह घरांमध्ये भुकटी पसरली.
दुसर्या दिवशी मांद्रेतील
किनारी व्यावसायिकांचे नुकसान
पेडणे (न. प्र.) : ओखी वादळाने दुसर्याही दिवशी पेडणे तालुक्यातील मोरजी, अश्वे-मांद्रे, हरमल व केरी किनारी भागात ३ रोजी रात्रो बारापासून ते सकाळी १०पर्यंत समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने उर्वरीत जी शॅक होती त्याची नुकसानी करून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान व्यावसायिकांना सोसावे लागले. दुसर्याही दिवशी शासकीय आपत्कालीन यंत्रणा किनारी भागात फिरकली नाही. मात्र स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी तेम्बवाडा व विठ्ठलदास वाडा किनारी भागात व्यावसायिकांची भेट घेवून चर्चा केली तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केरी येथे भेट देवून पाहणी केली.
ओखी वादळाने दुसर्याही दिवशी किनारी भागात आपला रुद्रावतार दाखवीत किनारी भागातील होड्या व साहित्य यांनाही धोका निर्माण झाला असून, शॅकमध्ये पाणी तर शिरलेच शिवाय किनार्यावर जे लाकडी पलंग होते तेही काही प्रमाणात वाहून गेले. रेस्टॉरंट मधील वस्तू साहित्य पाणी शिरल्याने त्याचेही नुकसान झाले.
३ व ४ रोजी सलग दोन दिवस ओखी वादळाने किनारी भागात थैमान घातले. दोन दिवस पर्यटकांना खाणा जेवणासाठी भटकावे लागले, सलग तीन दिवस सुट्टी असल्याने देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते, या पर्यटकांना केंद्र बिंदू मानून मोरजी या ठिकाणी संगीत रजनी पार्ट्या आयोजित केल्या होत्या. त्याही पार्ट्या निसर्गानेच उधळून लावल्या. त्यामुळे आयोजकांची बरीच धांदल झाली.
३ रोजी रात्रो बारा नंतर दुसर्या दिवशी पाण्याची पातळी वाढल्याने उरली सुरलेली रेस्टॉरंटस् पाण्याने वाहून गेली. मासेमारी करणार्या व्यावसायीकांच्या झोपड्या पर्यंत पोचून त्यातील जाळीही वाहून गेली, लाकडी पलंग यांचा पत्ताच नाही तर रेस्टॉरंट मध्ये बसायलाही जागाच ग्राहकांना नव्हती. त्यामुळे पूर्ण किनार्यावर सुना सुना वाटत होता. समुद्राच्या लाटा किनारी भागात ज्या ठिकाणी कुटीरे उभारली होती त्या ठिकाणी थेट उसळत होत्या.
वाळूच्या तेम्बानाही या वादळाचा धोका निर्माण झाला असून वाळू समुद्रात झपाट्याने जात असल्याने भविष्यात हि स्थिती अशीच राहिली तर पाणी कधी लोकवस्तीत शिरणार तेही कळणार नाही.
काणकोण तालुक्यातील
जलसफरी बंद
पैंगीण (न. प्र.) : ओखी चक्रीवादळाचा फटका कालही काणकोण तालुक्यातील किनारपट्टी भागांना बसला. पाळोळे किनार्यावर कालही पाण्याची पातळी वाढलेली अनुभवायला मिळाली. पाळोळे समुद्रात उंच लाट निर्माण झाल्या असल्यामुळे पर्यटकांना समुद्रात पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. किनार्यावर धोक्याची निशाणी दर्शविणारे झेंडे लावण्याचे काम जीवरक्षकांतर्फे केले जात आहे.
काणकोण तालुक्यातील पाळोळे, पाटणे, आड कोळंब, तळपण, पोळे, गालजीबाग या किनार्यावर पाण्याची पातळी वाढू लागल्याने मत्स्य व्यवसायिकांनी किनार्यावर नांगरून ठेवलेल्या होड्या व पाती सुरक्षित जागी हलविल्या. पाळोळे प्रभागाचे नगरसेवक दयानंद पागी यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पाळोळेत पाणी किनार्याच्या प्रवेशद्वारापर्यंत चढले होते.
काल दिवसभर काणकोणात वादळी वारे वाहत होते. तसेच पावसाळी ढगाळ वातावरण होते.
काणकोणात काल सगळीकडे जोरदार वारे वाहत असल्याने, सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसले. पाळोळे भागात किनारपट्टीच्या नजीक शॅक तसेच तंबू उभारण्यात आल्याने वाढत्या पाण्याच्या पातळीची शॅक व्यवसायिकांत भिती निर्माण झाल्याचे पाळोळे येथील एक शॅक व्यवसायिक जॅम फर्नांडिस यांनी सांगितले.
‘जलसफरी’ बंद
गेले दोन दिवस समुद्राच्या लाटांचा वेग वाढल्याने तसेच उंच लाटा निर्माण झाल्याने होडयाद्वारे पर्यटकांना घेऊन ‘जलसफरी’ करण्याचे प्रकार पाळोळे तसेच अन्य किनार्यांवर पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे त्या धंद्यात असलेल्याना चांगलाच फटका बसला आहे. संबंधित खात्याकडून कोणत्याच प्रकारचा परवाना न घेता हे प्रकार पाळोळे, आगोंद, पाटणे किनार्यावर सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
पर्यटकांवर परिणाम
‘ओखी’ चक्रीवादळाचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्याचे पाळोळे येथील एक व्यवसायिक शेखर नाईक गावकर यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातही मोठे नुकसान
मडगाव (न. प्र.) : ओखी चक्रीवादळ व पौर्णिमा यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागातील शेक व्यवसायाला धक्का बसला व किमान ५० पेक्षा जास्ती लाख रुपयांची हानी झाली. बेतलभाटी, बाणावली, सोर्नाभाटी तसेच केळशी येथे हानी झाली. जास्ती हानी केळशी येथे झाली. अखिल गोवा बीच शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपयांची हानी झाली. शॅक मालकानी पर्यटन खात्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. कित्येकांचे फर्निचर ध्वनी यंत्रणा, भांडी, छत्र्या वाहून गेल्या. आत पाणी भरल्याने सामान वाहून गेले व कित्येक ठिकाणी भिजून निकामी झाले.
हरमल, केरीत नुकसान
हरमल ( न. वा.) : ओखी वादळाचा तडाखा दुसर्या दिवशीही हरमल केरी – तेरेखोल समुद्रकिनार्याला बसून येथिल शॅक व्यावसायिकांना लाखोंची नुकसानी झाली आहे.खवळलेल्या समुद्राचे पाणी किनार्यालगत असलेल्या शॅकमध्ये घुसुन अनेकांच्या शॅकांची पडझड झाली आहे तर काहींची विद्द्युत उपकरणे निकामी झाली आहेत.हरमल किनारी भागांत अंदाजित १३ – १४ लाखापर्यंत व केरी तेरेखोल भागाला अंदाजित १५ लाखांचा फटका बसला आहे.