>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती; मुलाने अर्ज केल्यास वडिलांचा अनुभव ग्राह्य
राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या वर्ष 2023-2026 च्या नवीन शॅक धोरणामधील 18 ते 60 वर्षे ही वयोमर्यादा शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार आता 65 ते 70 वर्षे वयापर्यंतचे पारंपरिक शॅकचालक शॅकसाठी अर्ज करू शकतात. तसेच, आपल्या कुटुंबातील युवकाला शॅक व्यवसाय करण्यासाठी पुढे आणू शकतात. त्या युवकाच्या वडिलांचा अनुभव शॅक वितरणाच्या वेळी ग्राह्य धरला जाणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
पर्यटन खात्याच्या नवीन शॅक धोरणामध्ये शॅक व्यवसायासाठी अर्जदाराला वयोमर्यादेचे बंधन घालण्यात आल्याने शॅक व्यावसायिकांत नाराजी पसरली होती. आमदार विजय सरदेसाई यांनी नवीन शॅक धोरणातील वयोमर्यादा मागे घेऊन स्थानिक शॅक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याची मागणी एका पत्रकार परिषदेत बुधवारी केली होती. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी याविषयावर चर्चा केली होती.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी राज्यातील शॅक व्यावसियाकांची पर्यटन भवनामध्ये काल बैठक घेऊन शॅक धोरणावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, शॅक हा पारंपरिक व्यवसाय गोमंतकीयांकडे कायम राहावा हे शॅक धोरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक शॅकमध्ये गोव्याचे खाद्यपदार्थ दिले जावेत. राज्याच्या पर्यटनामध्ये शॅकचालकांची भूमिका महत्त्वाची आहे. शॅक व्यावसायिकांसाठी डिजिटल पेमेंटची संकल्पना लागू केली जाणार आहे. ज्यामध्ये शॅकचालकांना पीओएस मशीन दिली जातील, असेही खंवटे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला किनारी भागातील कळंगुटचे आमदार मायकल लोबो, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका यांची उपस्थिती होती.