शॅक कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

0
4

हरमल समुद्रकिनाऱ्यावर काल सायंकाळच्या वेळेस फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा शॅक कर्मचाऱ्यांच्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. अमर बांदेकर (रा. हरमल) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमर बांदेकर हा काल सायंकाळी हरमल किनाऱ्यावर फेरफटका मारत होता, त्यावेळी तेथीलच एका शॅकसमोर मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा कोणालाही अडथळा होऊ नये, यासाठी त्याने काही खुर्च्या बाजूला केल्या. त्यावरून शॅकच्या एका कर्मचाऱ्याने त्याला हटकले. त्यावरून सुरुवातीला शाब्दिक वाद होऊन नंतर त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. शॅक कर्मचाऱ्यांनी मिळून अमरला बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अमरला रुग्णालयात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.