शॅक कर्मचाऱ्यांची पुन्हा गुंडगिरी; 6 पर्यटकांना मारहाण

0
2

>> कळंगुट किनाऱ्यावरील घटना; एक पर्यटक गंभीर जखमी; सुरक्षारक्षकासह पाचजणांना अटक

कळंगुट किनाऱ्यावरील ‘मरिना’ शॅकमध्ये पर्यटकांना मारहाण व त्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच, काल पुन्हा एक तसाच प्रकार समोर आला. कळंगुट समुद्र किनाऱ्यावरील ‘प्लॅनेट गोवा’ नामक शॅकच्या कर्मचाऱ्यांनी व एका सुरक्षारक्षकाने मुंबईतील 6 पर्यटकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत रोहित दरोलिया (40, रा. मुंबई) हा पर्यटक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कळंगुट पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

ही घटना शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली. लुईझा कुतिन्हो यांच्या मालकीच्या प्लॅनेट गोवा शॅकसमोर मुंबईतील सहा पर्यटकांचा गट वाळूमध्ये मौजमस्ती करत होता. येथील सुरक्षारक्षकाने प्रथम क्षुल्लक कारणावरून त्या पर्यटकांशी वाद घातला. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर सुरक्षारक्षकाने शॅकमध्ये जाऊन तिथे झोपलेल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून आणले. त्यानंतर त्या सर्वांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात रोहित दरोलिया हा गंभीर जखमी झाला. तसेच त्याच्या सहकारी मित्रांना किरकोळ दुखापत झाली. जखमींना सर्वप्रथम कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर अग्रवाल याला गोमेकॉत दाखल करण्यात आले.

या प्रकरणी नितीन अग्रवाल यांनी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून कळंगुट पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये नौफाल पी. टी. (28, मूळ रा. केरळ), रोहित कुमार (27), अभिषेक कुमार (24), विनोद कुमार (31) आणि सुरिंदर कुमार (28, सर्व मूळ रा. हिमाचल प्रदेश) यांचा समावेश आहे.