हरमल समुद्रकिनाऱ्यावरील खून प्रकरणानंतर पर्यटन खात्याला जाग आली असून, नियमांचे कडक पालन करण्याबाबत शॅकमालकांना एक परिपत्रक जारी केले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमालकांना ध्वनिप्रदूषण टाळणे, अन्य नियम व अटींचे पालन करण्याचे निर्देश दिला आहे. वाजवलेले संगीत शॅकमध्येच ऐकू येईल एवढ्या आवाजात वाजवावे. त्या संगीताचा आसपासच्या रहिवाशांना कोणताही त्रास होता कामा नये, शॅक सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू ठेवावे. तसेच, शॅकमालकांनी गोव्यातील संगीत आणि गोव्यातील खाद्यपदार्थांना प्रोत्साहन द्यावे, असेही म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील पर्यटन क्षेत्रातील आव्हाने, समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदेवेलू यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पर्वरीत काल घेण्यात आली. या बैठकीत शॅक कर्मचारी, सुरक्षा व धोरणात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सरकारच्या विविध विभागाच्या सहकार्यातून पर्यटनाशी निगडीत समस्या दूर करण्याचे ठरविण्यात आले आहे.