शृंगारशिल्प खजुराहो

0
128

– सौ. पौर्णिमा केरकर
‘हेमवती’ नावाप्रमाणेच रसरशीत यौवनाची. जणू रूपाची भरती आलेले तारुण्य घेऊनच ती तळ्यात स्नानाला गेली. तिच्या त्या तारुण्याने आजूबाजूचा परिसर तर शहारलाच, पण आकाशातील चंद्रही तिच्या रूपलावण्यावर भाळला. विरघळून गेला. तो तळ्यात उतरला. त्याने हेमवतीला आलिंगन दिले. ब्राह्ममुहूर्तावरच चंद्राने हेमवतीचे कौमार्य भंग केले. तिने तर शापच दिला. चंद्राने हेमवतीला सांगितले की आपल्या दोघांच्या संयोगाने जो पुत्र होईल तो एक अजेय क्षत्रिय असेल. कौमार्य भंग पावलेली हेमवती विषण्ण मनाने कर्णावती नदीकिनारी वास्तव्य करून राहू लागली व याच नदीच्या काठावर चंद्रासारख्या रूपवान पुत्राला तिने जन्म दिला.हेमवती व चंद्राच्या संयोगातून त्याची झालेली निर्मिती म्हणूनच पुत्राचे नाव ‘चंद्रवर्मन’ ठेवण्यात आले. चंद्रवर्मनाच्या जन्माच्या वेळी चंद्रदेवसुद्धा धरतीवर अवतीर्ण झाले होते. साक्षात ब्रह्मदेवाने चंद्रवर्मनची कुंडली तयार केली. चंद्रवर्मनच्या रूपानेच जन्म झाला पहिल्या चंदेलवंशीय राजाचा! पुढे यानेच म्हणजे राजा चंद्रवर्मनने स्वतःचे राज्य स्थापन करून मंदिरबांधणीला प्रारंभ केला. कालांतराने हेमवती पंचतत्त्वात विलीन झाली.
चंद्राच्या सहवासातील शृंगारशिल्प मात्र खजुराहोच्या रूपाने अमर झालेले. तिने ते चंद्रवर्मनकडून पुरे करून घेतले. जवळ जवळ लहान-मोठ्या पंच्याऐंशी मंदिरांचा येथे समूह आहे. विविध आकर्षक तलाव आहेत. स्वर्गीय वाटाव्यात अशा बागा आहेत. या सगळ्यांची निर्मिती चंदेलवंशीय राजांनी आपापल्या राजवटीप्रमाणे केलेली आहे. मंदिरावर कोरली गेलेली कामशिल्पे, अवतीभोवतीच्या परिसरातील घटक, त्यात निसर्गातील पशुपक्षी, झाडे या सार्‍यांचेच कोरीवकाम येथे आलेले आहे. यात टप्प्याटप्प्याने झालेला बदल हेच तर दर्शवितो. चंदेलवंशीय राजांनी फक्त यज्ञ, जप-जाप्य न करता मंदिरसमूहाच्या माध्यमातून अजरामर कलाकृती निर्माण केल्या. हिंदू आणि जैन धर्माचा संस्कार मंदिरसमूहातून अनुभवता येतो.
मध्य प्रदेशातल्या छतरपूर जिल्ह्यातील ‘खजुराहो’ हे तसे लहानसेच गाव. परंतु मंदिरसमूहावरील शृंगारशिल्पे एकूणच सौंदर्यमयी, नजर खिळवून ठेवणारे हे सृजन! वैविध्यपूर्ण मंदिरशैलीमुळे खजुराहो जागतिक नकाशावर जाऊन स्थिरावलेले आहे. दिल्लीपासून सहाशे वीस कि.मी.चे अंतर विमानानेसुद्धा पार करता येते. गाव जरी लहान असला तरी या मंदिरसमूहामुळे पर्यटकांचे आवडते स्थान बनल्याने सर्वच मौसमांत पर्यटकांची प्रचंड वर्दळ असते. मध्य प्रदेशात पर्यटनाला जायचे आणि ‘खजुराहो’ पाहायचे नाही हे कसे शक्य आहे? पंचमढीच्या निसर्गसुंदर थंड हवेचा पाहुणचार घेतल्यानंतर आम्हाला ओढ लागली होती खजुराहोच्या प्रवासाची. पंचमढीपासून जवळजवळ आठशे कि.मी.चे हे अंतर. रस्ता निर्मनुष्य. त्यात भर पडली कोणाच्या तरी सांगण्याची, म्हणे वाटेवरती नक्षलवादी पर्यटकांना लुटण्यासाठी वाट पाहात असतात. त्यामुळे खूप जणांची द्विधा मनःस्थिती झाली होती. आम्ही ज्या ट्रॅव्हल एजन्सीद्वारे गेलो होतो, त्यांच्या प्रतिनिधीच्या मनात ‘खजुराहो’ला मुळी जायचेच नाही असेच काहीसे असावे. हे नंतर खजुराहोच्या प्रवासात आमच्या लक्षात आले. कारण पंचमढीहून ज्या मार्गाचा अवलंब केलेला होता तो तर मातीचा, दगडांचा, मोठमोठे मध्ये मध्ये खड्डे पडलेला रस्ता. त्यामुळे अगदीच संथ गतीने आमचा प्रवास. मध्ये तहान-भूक लागली तर बसमधून खाली उतरून जायची सोय नाही. रस्ता चुकला तरी कोणाला विचारता येत नव्हते. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान ‘इंटरनेट’च्या रूपाने आमच्या साहाय्यास धावून आले. रोडमॅपच्या आधारे आम्ही रस्ता शोधला आणि एकदाचे खजुराहोला रात्री उशिराने पोहोचलो. पण मनात राहून राहून विचार येत होता की जागतिक वारसास्थळाच्या यादीत स्थिरावलेले हे सृजन पाहण्यासाठीचा रस्ता एवढा खराब?
दुसर्‍या दिवशी सकाळी मंदिरसमूह पाहण्यासाठी आम्ही गेलो. प्रथमदर्शनीच तो सारा परिसर नजरेसमोर आला आणि आदल्या दिवशीच्या त्या वेदनादायी आठवणी मिटून गेल्या. गोव्यात पोहोचल्यानंतर कळलं, त्याच्याहीपेक्षा खूप चांगला रस्ता आहे, परंतु त्या मार्गाने जाण्यात तोटा होता. त्यामुळे इथे व्यवहार आड आला. असे अनुभव प्रवासात केव्हा केव्हा येतातच. त्यातूनच आपण पुढच्या प्रवासावेळी सावध होतो. या गोष्टी इतरांच्याही लक्षात यायला हव्यात. आमच्यासमोर उभ्या राहणार्‍या रसरशीत कौमार्याचे सौंदर्य आम्हाला सकाळच्या कोवळ्या लुसलुशीत उन्हातूनच अनुभवता यावे अशीच तजवीज असावी. जे घडते ते चांगल्यासाठीच हाच विचार मनात ठसवला. मनात- ‘पराभवातहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा’ या बोरकरांच्या ओळी आठल्या आणि शृंगारशिल्पे पाहण्यासाठी मन सज्ज झाले.
‘खजुराहो’ या लहानशा शहररूपी गावात खजूर मोठ्या प्रमाणात होते म्हणूनच त्याला खजुरवाटिका, खज्जूरपूर, कजुरा, खजुराहो नावाने ओळखले जाते. तंत्र-मंत्र शिकविण्याचे विद्याकेंद्र एकेकाळी येथे होते. त्यामुळे या परिसरात साधुसंतांचा वावर मोठ्या प्रमाणात असे. चंदेलवंशीय वेगवेगळ्या राजांनी चंद्रवर्मनपासून सुरू झालेली राजवट समीरवर्मनपर्यंत पोहोचली. या प्रवासात सुंदर मंदिरसमूह निर्माण केले. एकूण येथील मूर्ती तीन समूहांत विभागलेल्या आहेत. पश्‍चिम, पूर्व आणि दक्षिण समूहात ही विविधांगी मंदिरे आपल्याला खुणावत राहतात. पश्‍चिमेला मतंगेश्‍वर, लक्ष्मण, वराह, लक्ष्मी, कंदारिया, जगदंबा, महादेव, चौसष्ठ योगिनी, ललंगुआ, पार्वती, विश्‍वनाथ ही मंदिरे आहेत, तर पूर्वेला जैनांची मंदिरे त्यांत पार्श्‍वनाथ, आदिनाथ, घंटाई, जवारी, वामन वगैरे हिंदू मंदिरसमूह पाहता येतात. साहू शांती प्रसाद जैन कला संग्रहालयात जैन तीर्थकरांच्या विविध मूर्ती पाहावयास मिळतात. दक्षिणेला दुला देव, चतुर्भुज मंदिरे आहेत.
आपल्या देशात मंदिर स्थापत्त्याचा जन्म कधीपासूनचा आहे हे नेमकेपणाने सांगता येते नाही. देव, देवपूजा, देवालये ही इथे फक्त आपल्या पूजेसाठी, प्रार्थनेसाठीच आहेत, ती देवदेवतांची निवासस्थानेच आहेत हा समज पूर्णतः गळून पडावा अशीच जागा खजुराहो आहे. आपण कोठल्याही एका स्वार्थी भावनेने मंदिरसमूहात प्रवेश करत नाही. निरामय मनाने कामशिल्पातील आनंद येथे शोधायचा असतो. संस्कृती सृजनशीलतेचे महान तत्त्व पिढ्यान्‌पिढ्यांपर्यंत शास्त्रशुद्धरीतीने पोहोचविण्याचे काम मंदिरावरील कोरीव शिल्पे करतात. स्त्रियांचे उसळते तारुण्य आणि सळसळते लावण्य यांनी युक्त ही अनोखी शिल्पे न्याहाळताना पाहणार्‍यांच्या मनात गोड संवेदनेची लहर उमटून जाते. मंदिरांवरील शिल्पावळीत देवदेवतांच्या मूर्तींबरोबरच सुडौल, कमनीय बांध्याच्या, प्रमाणबद्ध शरीराच्या अशा चित्तवेधक, कामक्रीडेत रस घेणार्‍या नर-नारींच्या शिल्पांवरून नजर हटता हटत नाही. इथे असंख्य पर्यटकांची ये-जा सुरू असते. वेगवेगळ्या उद्देशाने येथे येणे होते. मुळात मंदिरांवर कोरलेली रतिशिल्पे हा लोकमानसाच्या जाणिवांचा अविभाज्य घटक. शिल्पसमूहाची रासक्रीडा पाहताना मनातील निरामयता टिकवून ठेवणे ही कसोटी असते. अगणित शिल्पे, तेवढ्याच त्यांच्या भावमुद्रा आपल्या शरीर-मनाचा वेध घेतात. सनातन काळापासून मनामनातील कामाग्नीची भावना जी नैसर्गिक स्वरूपात वावरणारी असते ती अगदी नितळ, पारदर्शी होत आपल्यासमोर उभी ठाकते. शृंगाराचे उघड उघड प्रदर्शन, पण कोठेही वासनेने बरबटलेल्या भावना अस्तित्वात नाही. प्रत्येक शिल्पामधून समर्पण, समरसतेतून आलेले तेज, उत्साह जाणवतो. सळसळत्या उत्साहाच्या सोबतीने सृजनत्वाचे केलेले हे नितळ स्वागत आहे. जगण्याची मूळ प्रेरणा रसरशीतपणे आपल्याच मस्तीत सामोरी येते. योगमग्न व भोगमग्न रासक्रीडा अनुभवताना थक्क व्हायला होते. सर्जनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणातील उत्सव इतरत्र क्वचितच कोठे असेल. ही सारीच शिल्पे काहीतरी सांगू पाहतात, बोलू पाहतात, एवढी संवेदनशीलता त्यांच्यात भिनलेली आहे. नजर जेव्हा त्यांच्याशी एकरूप होते तेव्हा वाटते आपल्या देहमनाचेसुद्धा मंदिरच झाले आहे जे एका सृजनाने भरून गेलेले आहे. सर्जनाचे स्वागत करण्यासाठी आतुरलेले आहे. योग आणि भोग याचा साक्षात्कार घडवित आहे.
मंदिरांवरील शिल्पसमूह पाहताना तो संपता संपत नाही. खालपासून वरपर्यंत केलेले कोरीवकाम, जीव ओतल्याशिवाय, समर्पणाशिवाय शक्य होणारच नाही. किती तर्‍हेची माणसे, देवदेवतांच्या अदाकारी, प्राणी, पक्षी… किती तरी चित्रे… किती अर्थ अगदी डोळे खिळवून टाकणारे व दीपवून टाकणारे. परतीच्या प्रवासातही मन खजुराहोच्या शृंगारशिल्पांतच घुटमळत राहिले…
गेली काही वर्षे इथे मध्य प्रदेश सरकारच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यांत नृत्यमहोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी विविध प्रांतांतून विख्यात कलाकार येतात. नृत्यशैलीची अदाकारी पाहण्यासाठी लाखो पर्यटक इथे भेट देतात. मंदिराच्या पार्श्‍वभूमीवर जी कला रुजली, बहरली तिचा आविष्कार मंदिरपरिसरात अनुभवणे, हा दैवी आनंद मिळविण्याच येथे येणे होते. इथे आयोजित करण्यात येणारा लोकोत्सव हेसुद्धा खजुराहोचे वैशिष्ट्य आहे. अलीकडच्या वर्षात तर लाईट-शोच्या माध्यमातून मंदिरांचा इतिहास, संस्कृती यांवर प्रकाशझोत टाकला जात आहे. रात्री साडेसात वाजता हा शो दाखवला जातो. त्यासाठी खास तिकीट काढून प्रवेश करावा लागतो. निरभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर विजेच्या प्रकाशात सर्वांगाने प्रज्वलित झालेली मंदिरे पाहताना जी आनंदप्राप्ती होते ती अवर्णनीयच असते. मला तर या मंदिरसमूहाचे लावण्य कोजागरीच्या चांदण्यात अनुभवता आले. चांदण्यातील हे मंदिरसमूह सजिवंत होऊन उठले होते. निर्मितीचा तो उत्साह होता. यौवनाचे ताजेपण त्याला वेढून होते. ते सृजन आणि सर्जनाचे देखणेपण होते. त्यासाठी बोरकर परत एकदा मला आठवले- इंद्राचा मज भोग हवा अन् चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो, अतिजागृत त्यात प्रयोग हवा