शूरा मी वंदिले!

0
50

भारताच्या तिन्ही सैन्यदलांचे सर्वोच्च प्रमुख जनरल बिपीन रावत, पत्नी मधुलिका व सहकार्‍यांचा भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत काल झालेला ह्रदयद्रावक अंत समस्त भारतीयांच्या काळजाला चरे पाडणारा आहे. भारताचा हा निधड्या छातीचा सरसेनापती अशा प्रकारे हकनाक बळी जावा याचे दुःख फार मोठे आहे. सत्तरच्या दशकामध्ये लष्करातील सेकंड लेफ्टनंट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेला आणि पिढीजात लष्करी वारसा असलेला हा गढवाली रजपूत वीर चार दशकांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, जनरल अशी पदे चढत चढत लष्करप्रमुख बनला. त्या पदावरून निवृत्त होत असताना भारताचे दोन ज्येष्ठांना डावलून देशाचे पहिले सरसेनापती होण्याचा बहुमान त्यांना देण्यात आला होता. मात्र, ही कारकीर्द कसाला लागायची असतानाच काळाने या वीरावर असा क्रूर घाला घातला आहे.
जनरल बिपीन रावत यांची प्रदीर्घ लष्करी सेवेतील अतुलनीय कामगिरी सर्वविदित आहे. त्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांना आजवर लाभलेली परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक आणि तत्सम शौर्यपदकेच सांगत आहेत. काश्मीरमध्ये असो, चीन सीमेवर असो, ईशान्येत असो नाही तर भारतीय सीमेपार म्यानमारच्या सीमेत घुसून केलेला सर्जिकल स्ट्राइक असो, जनरल बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील पराक्रमाने सदैव भारतीय लष्कराची शान वाढविली. उरीपासून दोकलामपर्यंत जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे भारतीय लष्कराच्या पराक्रमाची ध्वजा रोवल्याविना राहिले नाहीत. ईशान्य भारतातील हिंसाचाराला आटोक्यात आणून शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचे फार मोठे योगदान राहिलेले आहे.
सैनिक कसा असावा हे सांगताना ते ‘नाम, नमक, निशान, वफादारी आणि इज्जत’ ही पाच तत्त्वे प्रत्येक सैनिकाची प्राणतत्त्वे असल्याचे ते सांगायचे. ह्या पाचही तत्त्वांचा मिलाफ असलेले लढवय्ये जीवन ते जगले. त्यांचा अंतही उटीतील वेलिंग्टनच्या लष्करी महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थींना संबोधित करण्यासाठी जात असताना व्हावा हा केवढा दैवदुर्विलास.
त्यांच्या हेलिकॉप्टरची उटीजवळील कट्टेरीत काल झालेली भीषण दुर्घटना दुर्दैवी तर आहेच, शिवाय अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारीही आहे. भारतीय हवाई दलाचे जे एमआय १७ व्ही ५ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले ते काही साधेसुधे नव्हे. अगदी पंतप्रधानांसह सर्वोच्च पदांवरील व्यक्तींची ने-आण करणारे ते अत्याधुनिक व सुरक्षित हेलिकॉप्टर आहे. बालाकोट कारवाईवेळी झालेली एक दुर्घटना सोडली तर रशियन बनावटीच्या ह्या बनावटीच्या हेलिकॉप्टरची अन्य एकही दुर्घटना आजवर घडलेली नाही. त्यामुळे ही दुर्घटना हा संरक्षणदृष्ट्याही मोठा हादरा आहे. पाकिस्तान आणि चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून भारताच्या सामरिक ताकदीचा सदैव उच्चार करीत आलेले आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास भारत कसा सर्वतोपरी समर्थ आहे ते भारतीय जनतेला सदैव आश्वस्त करीत आलेले खंबीर, कणखर व्यक्तिमत्त्वाचे जनरल रावत आता आपल्यात नाहीत हे दुःख पचवणे तमाम सैनिकांना आणि आम देशप्रेमी नागरिकांनाही नक्कीच जड जाईल. तुमच्या संरक्षणासाठी तिन्ही दले सज्ज आणि सिद्ध आहेत हा भरवसा एकशे तीस कोटी भारतीयांना अहोरात्र देत आलेला एक खंदा लढाऊ वीर आपल्यातून निघून गेला आहे.
ही हेलिकॉप्टर दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? खराब हवामान, तांत्रिक बिघाड, मानवी चूक की घातपातामुळे ती घडली याचे उत्तर शोधले जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीत ते झाडांना धडकून आग लागल्याचे व हेलिकॉप्टरमधून मृतदेह खाली पडताना त्यांनी पाहिल्याचे म्हटले आहे. खरोखर एखाद्या झाडाला वा वीज तारांना हेलिकॉप्टरची अशा प्रकारे धडक बसली का, या दुर्घटनेवेळी एखादा स्फोट झाला असावा का अशा नाना शंका उपस्थित होणे साहजिक आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सर्वतोपरी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ईशान्येतील सध्याच्या संशयास्पद घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा संशय डोकावणे चुकीचे म्हणता येणार नाही. आजवर अनेक नेते, सेनानी अशा दुर्घटनांमध्ये मारले गेले. परंतु ह्या दुर्घटनेचे भीषण स्वरूप, दुर्घटनेनंतर लागलेल्या आगीत मृतदेहांचा ओळखही पटवता न येण्याइतपत कोळसा होणे हे सगळे अंगावर शहारे आणणारे आहे. जनरल रावत यांचे पद दुसरा एखादा पराक्रमी वीर घेईल, लवकरच औपचारिकरीत्या ती घोषणाही होईल. परंतु त्यांच्या आजवरच्या प्रदीर्घ सैनिकी जीवनातील पराक्रमाची गाथा येथे कायमची मिटली गेली आहे हे कसे विसरता येईल?