शून्य पटसंख्येमुळे 7 सरकारी शाळा बंद

0
7

डिचोलीतील 4, तर फोंड्यातील 3 शाळांचा समावेश; प्राथमिक शाळांची संख्या 694 पर्यंत घसरली

राज्यात शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये सात सरकारी प्राथमिक शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत. या सात सरकारी प्राथमिक शाळांमध्ये एकाही मुलाची नोंद झाली नाही. त्यामुळे राज्य सरकारने सातही सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्यास मान्यता दिली. या सात शाळांमध्ये डिचोली तालुक्यातील चार आणि फोंडा तालुक्यातील तीन प्राथमिक शाळांचा समावेश आहे.

बंद केलेल्या शाळांमध्ये डिचोली तालुक्यातील आमठाणे, खारेखाजन-विर्डी, चिंचवाडा-पाळी आणि लामगाव-डिचोली येथील प्राथमिक शाळांचा समावेश आहे, तर फोंडा तालुक्यातील गावणे क्रमांक 1, सक्रे शिरोडा आणि तिराळ उसगाव येथील प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक सरकारी प्राथमिक शाळा बंद होत आहेत. राज्यभरातील सरकारी प्राथमिक शाळांची संख्या 1 हजारांपेक्षा जास्त होती. आता, राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांची संख्या 694 वर आली आहे. या प्राथमिक शाळांतील सुमारे 57 टक्के किंवा 400 प्राथमिक शाळांमध्ये पाच व त्याहून कमी मुलांची नावनोंदणी झालेली आहे.

राज्य सरकारकडून सरकारी प्राथमिक शाळांसाठी नवीन इमारती, शाळांची दुरुस्ती कामे केली जात असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक शाळा बंद होत आहेत. सरकारी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या शून्य किंवा कमी असण्याची कारणे शोधण्याची गरज व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूला खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्याचाही परिणाम सरकारी शाळा बंद होण्यावर होत आहे.

गेल्या 4 वर्षांत 44 सरकारी शाळा बंद

राज्यात वर्ष 2020 पासून 2024 पर्यंत एकूण 44 सरकारी प्राथमिक शाळा शून्य पटसंख्येमुळे बंद करण्यात आल्या आहेत. या 44 प्राथमिक शाळांपैकी 2020-21 या शैक्षणिक वर्षात 11, 2021-22 मध्ये 8, 2022-23 मध्ये 11 आणि 2023-24 मध्ये 14 शाळा बंद करण्यात आल्याची माहिती गोवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.