41 वर्षांनंतर भारत पुन्हा अंतराळात
नासा व इस्रोतर्फे संयुक्त मोहीम
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला काल बुधवारी 25 जून रोजी ॲक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकात जात आहेत. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने ॲक्सियम मिशन 4 यशस्वीपणे प्रक्षेपित केले. हे मिशन नासा आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त प्रयत्नांचा एक भाग आहे. भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी या मिशनमध्ये पायलट म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली आहे. 41 वर्षांनंतर भारत पुन्हा अंतराळात पोहोचला आहे.
हे मिशन भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे, ज्यामध्ये पोलंड आणि हंगरीच्या पहिल्या अंतराळवीरांचाही समावेश आहे. हे एक्सिओमचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे चौथे खासगी अंतराळवीर मिशन आहे. मिशनचे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर आणि एक्सिओम स्पेसच्या मानवी अंतराळ उड्डाण संचालक पॅगी व्हिटसन यांच्याकडे आहे, तर शुभांशु शुक्ला पायलट म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय, पोलंड आणि हंगरीचे टिबोर कापू हे दोन मिशन विशेषज्ञ या मिशनचा भाग आहेत.
असा असेल प्रवास
भारतीय वेळेनुसार दुपारी 12:00 वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून हे मिशन लाँच करण्यात आले. सर्व अंतराळवीरानी स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान सुमारे 28.5 तासांनंतर आज 26 जून रोजी दुपारी 4:30 वाजता आयएसएसशी जोडले जाईल.
41 वर्षांनंतर भारतीय
अंतराळवीर अंतराळात
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय संस्था इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असतील. 41 वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अंतराळयानातून अंतराळ प्रवास केला होता.
बऱ्याचवेळा मोहिम पुढे ढकलली
एक्सिओम-4 हे स्पेसएक्सचे 53 वे ड्रॅगन मिशन आहे आणि 15 वी मानवी अंतराळ मोहीम आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हेही अंतराळात जाणार आहेत. ही मोहीम आधी 8 जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती 10 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. काल अखेर 25 जूनला शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण केले. भारताने या मोहिमेवर आतापर्यंत सुमारे 548 कोटी रुपये खर्च केले आहेत.
शुभांशू शुक्ला यांचा संदेश
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून पहिला संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी, नमस्कार माझ्या देशवासीयांनो! 41 वर्षांनंतर आपण पुन्हा अंतराळात पोहोचलो आहोत. माझ्या खांद्यावर तिरंगा आहे, जो दर्शवतो की मी तुम्हा सर्वांसोबत आहे. ही फक्त माझी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतची यात्रा नाही, तर भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. मी तुम्हा सर्वांना या प्रवासाचा भाग बनण्याचे आवाहन करतो. चला आपण भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची ही यात्रा एकत्र सुरू करूया. धन्यवाद! जय हिंद, जय भारत! असे म्हटले आहे.
मोदींकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशू शुक्लाला शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही भारत, हंगेरी, पोलंड आणि अमेरिकेच्या अंतराळवीरांना घेऊन गेलेल्या अंतराळ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाचे स्वागत करतो. शुंभाशू यांना आणि इतर अंतराळवीरांना यशाच्या हार्दिक शुभेच्छा! असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.