शुभसंकल्पांचा सण गुढीपाडवा

0
277
  • डॉ. पांडुरंग फळदेसाई

गुढीपाडवा सांगावा घेऊन येतो वसंत ऋतूचा. आता एका बाजूने उन्हाच्या झळा सोसताना निसर्ग मात्र नव्याची नवलाई घेऊन यायला सज्ज होत असतो. नवसंकल्पांबरोबरच नव्या नवलाईचा संदेश देणारा सण म्हणजे गुढीपाडवा. गोव्यातील नावाजलेल्या मंदिरातून या दिवशी ध्वजारोहण, लघुरुद्र, वसंतपूजा, पालखी, पंचांगवाचन, महाप्रसाद असे अनेक विधी थोड्याफार फरकाने पार पडतात.

गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारण्याचा दिवस. गुढी म्हणजे शुभसंकल्पांचे प्रतीक. संपन्नतेचे, सुबत्तेचे प्रतीक. यशाचे प्रतीक. विजयाचे प्रतीक. म्हणून वर्षारंभाची सुरुवात गुढी उभारून करण्याची परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीत सुरू झाली. अर्थात त्याला कोणतेतरी कारण असायला हवे. कोणीतरी सुरुवात करून द्यायला हवी. म्हणून आपण जेव्हा गुढीपाडव्याचा मागोवा घेतो तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे शककर्त्यांनी हूणांचा पाडाव केला आणि त्या वेळेपासून शालीवाहन शकाची गणना सुरू झाली. हा काळ सनावलीनंतर ७८ वर्षांनी सुरू झाला.
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा हिंदू दिनदर्शिकेचा पहिला दिवस. म्हणजेच भारतीय कालगणनेचा वर्षारंभ. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्याचे कारण म्हणजे ब्रह्मपुराणानुसार या तिथीला ब्रह्माने जगाची निर्मिती केली. भविष्यपुराण तर सांगते की याच दिवशी अग्नीदेवतेचा जन्म झाला. अग्नी हे पावित्र्याचे आणि मांगल्याचे द्योतक. विश्‍वातील सर्व खलांचा नाश अग्नी करतो. त्यामुळे वर्षारंभी होमहवन करून पुण्य पदरी पाडून घ्यावे. त्यासाठी गरजूंना दानधर्म करावा, सकलांचे कल्याण इच्छावे आणि समस्त कुटुंबियांसमवेत आनंदात हा दिवस घालवावा असे पुराणग्रंथात नमूद करण्यात आले आहे.

तसे पाहू गेलो तर शुक्ल आणि कृष्ण पक्षातील प्रथम तिथीला पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणतात. या तिथीचे दुसरे नाव नंदा. मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य प्रतिपदेच्या दिवशी रोहिणी नक्षत्र आल्यास तो मोठा पर्वकाळ मानला जातो. कोणत्याही शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्यास ते भाग्यकारक असते, असे धर्म ग्रंथांतून नमूद केलेले दिसते. प्रतिपदा हा अनध्याय दिवस मानला गेला आहे. म्हणजेच या दिवशी अध्ययनाला सोडचिट्ठी असते. या दिवशी सर्व वेदाध्ययन पाठशाळा बंद असतात.
गुढीपाडवा हा विशेषेकरून महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात इत्यादी प्रदेशात विविध नावांनी साजरा केला जातो. गोव्यात या दिवसाला ‘संवत्सर पाडवो’ असे म्हणतात. संवत्सर पाडवा याचा तो अपभ्रंश असावा. कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात हा ‘उगादी’ नावाने साजरा केला जातो.

वर्षारंभाच्या या दिवसाच्या निमित्ताने घरांची सजावट करतात. रंगीबेरंगी रांगोळ्या, फुले, डहाळ्यांनी घरे सजवतात. पहाटे अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान करतात. आपल्या इष्टदेवता, कुलदेवता आणि ग्रामदेवतांचे पूजन करतात. काही ठिकाणी ब्रह्मपूजन करून ब्राह्मण आणि गरीबांना दानधर्म करतात. परंतु या दिवसाची सुरुवात होते ती कडुलिंबाच्या प्राशनाने. कडुलिंबाची पाने, मिरी, हिंग, लवण, जिरे, ओवा, साखर इत्यादींचे एकत्रित वाटण करून त्याचे प्राशन केले जाते. या मिश्रणाचे भक्षण केल्याने आरोग्य, बळ, बुद्धी आणि तेजस्विता प्राप्त होते, अशी समजूत आहे. बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर पितळेचे अथवा चांदीचे भांडे उपडे घालून त्यावर कडुलिंबाची अथवा आंब्याची डहाळी व फुलांची माळ बांधतात. काही ठिकाणी नारळही सोबत बांधला जातो. त्यामागे अमृत फळाची भावना असते. या गुढीची विधीवत् पूजा करून ती दारापुढे उभारली जाते.

गोव्यातील नावाजल्या मंदिरातून या दिवशी ध्वजारोहण, लघुरुद्र, वसंतपूजा, पालखी, पंचांगवाचन, महाप्रसाद असे अनेक विधी थोड्याफार फरकाने पार पडतात. पंचांगवाचनाचा कार्यक्रम मात्र बहुतेक सर्व लहानमोठ्या गावातील ग्रामदैवतांच्या मंदिरात होतो. पंचांगाची तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाच अंगे होत. पंचांगश्रवणाचे फल काय हे सांगताना असे नमूद करण्यात आले आहे की तिथीच्या श्रवणाने लक्ष्मीची प्राप्ती होते. वाराच्या श्रवणामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते. योगश्रवणाने व्याधीमुक्ती होते आणि करण-श्रवणाने इच्छित यशप्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने पंचांगाचे वाचन वर्षारंभी करावे असा प्रघात आहे. असे जरी असले तरी भारतासारख्या कृषिप्रधान देशात आगामी वर्षातील ऋतुमान आणि पाऊसपाणी कसे असेल याचा अंदाज या पंचांग वाचनाच्यावेळी आवर्जून बांधला जातो.

गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस असून तो संपूर्ण वर्षातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त मानला गेला आहे. त्यामुळे बहुतेक लोक आपल्या चांगल्या कार्याचा आरंभ या दिवशी करतात. कोण नवीन व्यवसायाची सुरुवात करतो, कोण जमीन खरेदी करतो तर कोण गृहबांधणीचा मुहूर्त साधतो. कोण गृहप्रवेश करतो तर कोण सोने-नाणे खरेदी करतो. एकूण काय तर नव्याने संकल्प सोडले जातात, तेदेखील हमखास सिद्धीस जाण्याच्या अपेक्षेने.

गुढीपाडवा सांगावा घेऊन येतो वसंत ऋतूचा. आता एका बाजूने उन्हाच्या झळा सोसताना निसर्ग मात्र नव्याची नवलाई घेऊन यायला सज्ज होत असतो. नवसंकल्पांबरोबरच नव्या नवलाईचा संदेश देणारा सण म्हणजे गुढीपाडवा. तो साजरा करायचा तर मग घरात गोड-धोड तयार व्हायलाच हवे. पुरणपोळी, साखरभात, दुधाचा पायस, इत्यादीसारखे पदार्थ आपल्या स्वागताला सज्ज असतात. त्यामुळेगुढीपाडवा सर्वांना हवाहवासा वाटणारा आहेच मुळी!