शुभंकर, रुत्विका दुसर्‍या फेरीत दाखल

0
131

विद्यमान विजेत्या बी. साई प्रणिथ याला सिंगापूर ओपनच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सहाव्या मानांकित प्रणिथला जपानच्या यू इगाराशी याने २१-१६, १६-२१,१८-२१ असे पराभूत केले. हा सामना १ तास ११ मिनिटे चालला. दुसरीकडे शुभंकर डे, रुत्विका शिवानी गड्डे व माजी राष्ट्रीय विजेत्या रितुपर्ण दासने परस्परविरोधी विजयांसह दुसरी फेरी गाठली.

शुभंकरने कॅनडाच्या जेसन अँथनी हो शुई याला तीन गेममध्ये १४-२१, २१-१४, २१-१६ असे हरविले. तर रुत्विकाने बल्गेरियाच्या लिंडा झेचिरी हिचे आव्हान २१-१५, १७-२१, २१-१६ असे परतवून लावले. स्वित्झर्लंडच्या सबरिना जॅकेटने रितुपर्णविरुद्धचा सामना अर्धवट सोडला. यावेळी पहिल्या गेममध्ये रितुपर्ण ५-३ अशी आघाडीवर होती.

मिश्र दुहेरीतील भारताची सर्वोत्तम मानांकित जोडी असलेल्या प्रणव जेरी चोप्रा व सिक्की रेड्डी यांनी जर्मनीच्या जोन्स राल्फी जेनसन व कार्ला नेल्टे यांना २१-१९, १६-२१, २१-१२ असे नमवून दुसरी फेरी गाठली. आरएमव्ही गुुरुसाईदत्त व वैष्णवी रेड्डी जक्का यांना पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले. गुरुसाईदत्तला चीनच्या कियाव बिन याने २१-१४, २१-१९ असे पराजित केले तर वैष्णवीला जपानच्या मिनात्सू मितानीने २१-१९, २१-७ असे हरवून घरचा रस्ता दाखविला. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांना पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. एनजी त्स याव व युएन सिन यिंग या हॉंगकॉंगच्या जोडीने भारतीय जोडीला २१-१८, १३-२१, १४-२१ असे पराभूत केले.

अन्य भारतीयांचे निकाल ः मंदिराजू अनिलकुमार राजू व व्यंकट गौरव प्रसाद पराभूत वि. ऍरोन चिया व वोई विक सोह १६-२१, १६-२१, मुग्धा आग्रे पराभूत वि. गाओ फिंगजी १२-२१, १६-२१, अर्जुन एमआर व श्‍लोक रामचंद्रन पराभूत वि. बेन लेन व शॉन वेंडी २१-१९, १७-२१, १९-२१, अरुण जॉर्ज व सन्यम शुक्ला पराभूत वि. पो ली वेई व यांग मिंग त्से २१-१६, १७-२१, २०-२२, साई उत्तेजिता राव चुक्का पराभूत वि. बिट्रीझ कोरालेस २३-२१, ४-२१, ६-२१, सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी वि. वि. रिझकी हितायत व लोह किन हेन २१-१६, २४-२२, वैदेही चौधरी पराभूत वि. नित्चानोन जिंदापोल १०-२१, ६-२१, सौरभ वर्मा वि. वि. पारुपल्ली कश्यप २१-९, २१-६.