शुचितेचा सन्मान

0
109

पं. मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या दोन महान विभूतींना ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी काल संमती दिली. ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आपल्या आयुष्यात सदैव वादातीत राहिली असली, तरी दोघांचीही हिंदुत्ववादी विचारसरणी लक्षात घेता मोदी सरकारने त्यांना हा सर्वोच्च किताब देताना त्यांची विचारधारा हाही निकष मानला का हा प्रश्नही आता उपस्थित केला जाईल. पं. मदनमोहन मालवीय हे सुरूवातीला कॉंग्रेस चळवळीत अग्रणी नेते जरी होते, तरी त्यांनी हिंदू महासभेची स्थापना केली होती आणि वाजपेयी तर जनसंघ आणि भाजपाच्या स्थापनेमध्ये आणि जडणघडणीमध्ये मौलिक योगदान देणारे नेते आहेत. काल ही घोषणा झाली त्यामागील विशेष औचित्यही लक्षात घेण्याजोगे आहे. आज २५ डिसेंबर हा या दोन्ही नेत्यांचा जन्मदिन आहे. त्यामुळे वाजपेयींना त्यांच्या वाढदिनी सन्मानित करीत असताना पं. मालवीय यांचीही आठवण सरकारला झाली का हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र, या सर्वोच्च नागरी सन्मानास ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे निर्विवादपणे पात्र आहेत याविषयी दुमत असणे शक्य नाही. अशा तोडीच्या आणखी अनेक व्यक्तीही आहेत, ज्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान अद्याप मिळालेला नाही, परंतु या किताबाची आजवरची परंपरा लक्षात घेतली तर त्यामागील निर्णय हा मुख्यत्वे राजकीय असतो हे मान्य करणे भाग आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी सचिन तेंडुलकरला भारतरत्न देत असताना अटलजींचा तत्कालीन सरकारला विसर पडला आणि आता अटलजींना सन्मानित करीत असताना मोदी सरकारला नरसिंह रावांसारखा विद्वान या देशाचा पंतप्रधान होऊन गेला याचे विस्मरण झाले. हे किताब आजवर अनेकदा वादाचा विषय बनले. कधी त्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले गेले, तर कधी न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्या. पण हे सारे विवादित विषय बाजूला ठेवून जर या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांकडे पाहिले, तर त्यांचे मोठेपण लक्षात आल्यावाचून राहात नाही. दोहोंचा हा सन्मान हा सार्वजनिक जीवनातील शुचितेचा सन्मान आहे. पं. मालवीयजींनी एक शिक्षणतज्ज्ञ, विधिज्ञ, संस्कृत विद्वान, नेता, पत्रकार अशा आपल्या अनेक पैलूंनी एक कालखंड गाजवला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी जेव्हा ते कलकत्त्याच्या कॉंग्रेस अधिवेशनात भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांच्या वक्तृत्वाने भले भले प्रभावित झाले होते. वाजपेयी ही तर वक्तृत्वाची मुलुखमैदानच. त्यांचे तेरा दिवसांचे सरकार कोसळण्याची वेळ आली तेव्हा संसदेमध्ये त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अजरामर भाषणांपैकी एक मानावे लागेल. पण केवळ अमोघ वक्तृत्वामध्ये या दोन्ही नेत्यांचे मोठेपण सामावलेले नाही. सार्वजनिक जीवनातील शुचिता, पारदर्शकता आणि प्रामाणिकता यांची ही दोन्ही प्रतिके आहेत. पं. मालवीयजींनी तत्कालीन कॉंग्रेस नेत्यांच्या अल्पसंख्यक अनुनय नीतीचा स्पष्टपणे प्रतिवाद केला. अल्पसंख्यकांना अधिक प्रतिनिधित्व देण्यास किंवा त्यांच्यासाठी विभक्त मतदारसंघ देण्यास त्यांनी स्पष्टपणे विरोध केला होता. त्यामुळे त्यांना हिंदू राष्ट्रवादाचे एक प्रणेते मानले जाते. हिंदू धर्मातील जातीयतेविरुद्धही त्यांनी त्या काळामध्ये भूमिका घेतली होती आणि दलितांना मंत्रदीक्षा देऊन सन्मान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता. स्वदेशीचेही ते पुरस्कर्ते होते. महात्मा गांधीं त्यांना आदराने ‘महामना’ संबोधित असत. अशा एका आजवर विस्मृतीच्या खाईत लोटल्या गेलेल्या एका महान नेत्याचा सन्मान एवढ्या उशिरा का होईना होतो आहे ही समाधानाची बाब आहे. वाजपेयी हे तर उजव्या विचारसरणीचे, परंतु विवेकी नेतृत्व म्हणून विरोधकांतही वंदनीय राहिले आहेत. त्यांना भारतरत्न दिले जावे ही मागणी गेली पाच वर्षे होत राहिली तरी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजकीय कारणांसाठी त्याकडे दुर्लक्ष चालवले होते. गेल्या काही वर्षांत हे शासकीय सन्मान निव्वळ राजकीय भूमिकेस अनुसरून दिले जात असल्याने वादाचा विषय बनले आहेत, त्यामुळे त्यांच्याभोवतीचे वलयही हळूहळू ओसरू लागले आहे. परंतु तरीही भारतमातेच्या दोन महान सुपुत्रांचा हा सन्मान यथार्थ आहे यात शंका नाही. सार्वजनिक जीवनातील शुचिताच सन्मानित झाली आहे.