शुक्रवार ठरला उत्कंठावर्धक, धक्कादायक!

0
102

नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी कालराज्यात राजकीय घडामोडींना वेगआला होता. काल सकाळी ९.३० वा. पासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पक्षाच्या आमदारांशी व्यक्तीगतरित्या एकास एक संवाद साधला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या सर्व आमदारांना ताज्या घडामोडींविषयी माहिती देण्यात आल्याचे व नव्या नेत्याच्या निवडीसंदर्भात त्यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नव्या मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवारांबाबत गुरुवारपासून चाचपणी सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर काल या हालचालींना आणखी वेग आला. आज शनिवारी दुपारी पर्रीकर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करून त्याचा संध्याकाळी शपथग्रहण होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर काल राजकीय घडामोडींना वेग आला होता. सभापती राजेंद्र आर्लेकर, आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा या तीन वरिष्ठ नेत्यांच्या नावांची भावी मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती. कधी आर्लेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त येऊन धडकत होते. तर कधी पार्सेकर यांचे नाव निश्‍चित झाल्याची बातमी येत होती. परवापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत म्हणावे तेवढे नसलेल्या फ्रान्सिस डिसोझा यांच्या नावाचाही आता विचार होऊ लागल्याचे वृत्त काल सकाळी पसरले होते. भाजपमधील अल्पसंख्यांकातील काही आमदारांनी शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मुख्यमंत्रीपदी बसवून भाजपने आपण अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही हे दाखवून द्यावे असा सूर लावला होता. आमदार मायकल लोबो यांनी तर उघडपणे फ्रान्सिस डिसोझा यांच्या नावाचा हट्ट धरला होता.
या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर विदेश दौर्‍यावर असलेले उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही काल तातडीने राज्यात दाखल झाले. एरवी सौम्य व मवाळ प्रवृत्तीचे अशी प्रतिमा असलेल्या डिसोझा यांनी मुख्यमंत्रीपदी आपली निवड झालीच पाहिजे असा पवित्रा घेऊन काल सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एका बाजूने राजेंद्र आर्लेकर व लक्ष्मीकांत पार्सेकर हे वेगाने आपले घोडे दामटत असताना फ्रान्सिस डिसोझा यांनीही ताठर भूमिका घेतल्याने गोव्याच्या राजकीय क्षेत्रात बंडखोरीचे वातावरण होते. उत्तर गोव्यातील मतदारांपैकी काही जणांना पार्सेकर हे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत होते. तर अन्य एक मोठा गट पार्सेकर मुख्यमंत्री व्हावेत या मताचा होता. तर दक्षिण गोव्यातील ख्रिश्‍चन बहुसंख्य असलेल्या सासष्टी तालुक्यातील लोकांचा मात्र फ्रान्सिस डिसोझा यांच्या बाजूने कौल होता.