शिव-शक्तीच्या मीलनाचे स्थान श्रीशैल

0
414

– सौ. पौर्णिमा केरकर
मंजुनाथ आमच्या घराशी जोडला गेला तेव्हापासून मनात सतत आंध्र प्रदेशात एकदा तरी जाऊन यायला हवे हा विचार घोळत राहिला. आंध्र-कर्नाटकचा महत्त्वपूर्ण उत्सव म्हणजे दसरोत्सव; व या वर्षीच्या दसरोत्सवाला सलग चार दिवस सुट्टी मिळाल्याने ही संधी वाया घालवायची नाही हाच विचार करून आम्ही प्रवासाची तयारी सुरू केली.आंध्रातील कर्नुल जिल्ह्यात ‘पोलकल्ली’ हे एक खेडेगाव आहे. तिथपर्यंतचा प्रवास हा स्वतःच्या गाडीने करणे ही तर कठीणच जबाबदारी. परंतु संशोधकाची नजर आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणी एकट्यानेच सातत्याने गाडी चालविण्याची सहनशीलता राजेंद्रकडे उपजतच असल्याने राज्यातील तसेच इतर प्रदेशांतील असे असंख्य दुर्गम भाग सवडीने आणि बारकाईने अनुभवता आले. त्यामुळे ज्ञानात तर भर पडलीच, तसेच जीवनाला अनुभवसमृद्ध करता आले.
‘पोलकल्ली’ हा जरी ग्रामीण भाग असला तरी इतिहास संशोधकांना खुणावणार्‍या कितीतरी प्राचीन खुणा या गावाशी समरस झालेल्या आहेत. याच गावात असलेले नंदीमंदिर याची साक्ष पटविते. शिवाचे वाहन असलेल्या नंदीची स्थापना मंदिरात, तर बाहेरच्या प्रांगणात शिवलिंगाचे अस्तित्व. मंदिर छोटेखानीच, पण आतील मूर्ती मात्र खूप मोठी. दाटीवाटीने वसलेली घरे, त्यांमध्येच हे मंदिर. त्यातही शिवलिंग बाहेर तर मंदिरात नंदी, यातून शिवाने आपल्या सेवकाला दिलेली उदात्त वागणूक दिसते. त्याच्या जमिनीवरील बसण्याची ऐट मोठी डौलदार आणि सामर्थ्याने भरलेली आहे. हे सगळेच सामर्थ्याचे सौंदर्य आंध्रच्या कर्नुल जिल्ह्यातील भटकंतीत अनुभवता आले.
निर्मितीची शक्ती ज्याच्यामध्ये पुरेपूर भरून राहिलेली आहे, ज्याची अर्धांगिनी आदिशक्ती पार्वती आहे, असा देव म्हणजे लिंगरूप शिवशंभो. शिव व शक्ती यांच्या मीलनातूनच या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्यासंदर्भातील कितीतरी कथा-दंतकथा घुटमळत असतात. याच शिव-शक्तीची भक्ती आंध्रच्या पर्वतशैलीत भीनलेली आहे. श्रीशैल पर्वत आणि तिथे नंदणारा मल्लिकार्जुन शिव हे त्याचेच तर रूप आहे. आसेतुहिमाचल अशा तर्‍हेच्या खुणा शिवाच्या संचाराच्या आढळतात. तो भोळासांब जटाधारी कधी कोपिष्ट, क्रोधिष्ट होऊन अंगार ओकणारा, कधी डोक्यावरील नजाकतीने विराजमान झालेल्या अर्धचंद्रकोरीप्रमाणे हळवी स्पंदने जागवणारा, भावविव्हळ प्रेमवीराच्या रूपात दर्शन देणारा, वर्षानुवर्षे तपश्‍चर्येत मग्न राहून योगसामर्थ्य स्पष्ट करणारा, तर कधी शिकारीच्या निमित्ताने श्रीशैलाच्या नल्लमलै जंगलात भटकंती करता आदिवासी देखण्या चेंचू तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडालेला भोगी. शिव हा इथल्या लोकमानसाचे आराध्य दैवत. एकूणच शिव हा देखणा देवपुरुष आहे ही भावना मनात रूढ होण्यासारखाच ‘श्रीशैल’चा परिसर आहे. तेथील हिरवे वैभव, देशातील सर्वात मोठा वाघ्र प्रकल्प, आदिवासी चेंचूंचे भावविश्‍व, श्रीशैलचा दृष्टीला अचंबित करणारा धरणपरिसर… रात्रीच्या वेळी विहंगम असे दिसणारे हे धरण म्हणजे या प्रदेशाचा आत्माच आहे.
श्रीशैल-नल्लमलै या पर्वतराजीत पूर्वापार वास्तव्य आहे ते ‘चेंचू’ या आदिवासी जमातीचे. शैवस्थान म्हणून नावारूपास आलेले हे स्थान बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणूनही या स्थानाविषयी भाविकमनात अढळ श्रद्धा आहे. असे जरी असले तरी मुळातली ही जागा चेंचूंची असे अभ्यासक सांगतात. शिवाय ‘शिव’ हा चेंचूंचा जावई असल्याने या मंदिराच्या कार्यभागात चेंचूंना महत्त्वपूर्ण स्थान आहे. महाशिवरात्रीला या स्थानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्भगृहात जाऊन स्वहस्ते लिंगपूजा करण्याचा सन्मान जसा चेंचूंचा आहे, तसेच रथ ओढताना रथोत्सवातही त्यांचा हा हक्क अबाधित आहे. श्रीशैलचा मल्लिकार्जुन व त्याच्या या वास्तव्याविषयी अनेक कथा लोकमानसांत प्रचलित आहेत. तिथल्या लोकमानसाचा तर तो ‘चेंचू मलैया’ आहेच, त्याबरोबरीनेच तो भ्रमरावा, चंद्रावती यांच्याशीही स्वतःचे नाते सांगतो.
कोणे एके काळी म्हणे या परिसरात- चंद्रगुप्तपुरामध्ये- ‘चंद्रगुप्त’ राजा राज्य करीत होता. त्याला एक अतिरूपवान मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर त्याला लगेचच लढाईच्या कामगिरीपायी बाहेरगावी खूप वर्षांसाठी जावे लागले. कामगिरी आटोपून काही वर्षांनी परत येऊन पाहतो तो त्याची मुलगी चंद्रवती वयात आलेली दिसली. तिच्याशी नकळत त्याची कामवासना जागी झाली. चंद्रावती क्रोधिष्ठ झाली. ‘तू दगड बनशील’ असा शाप देऊन ती श्रीशैलम पर्वतराजीत विसावली. तिने शिवाला मनोमन आपला पती मानले. पर्वतराजीत सोबतीला तिची गाय होती. ही गाय म्हणे एकेठिकाणी नियमित दूध सांडायची. त्याच जागेवर हे शिवलिंग होते. चंद्रावती मनोभावे जाईच्या नाजुक सुगंधित फुलांनी लिंगाची पूजा करायची. ‘जाई’चे संस्कृतातील नाव ‘मल्लिका’ म्हणून मल्लिकार्जुन. हा अर्जुनही असाच भटकंतीतून या कथानकाशी जोडला गेला असावा.
शिव जेव्हापासून इथे स्थिरावला त्यावेळेपासून म्हणे हे स्थान सर्वांसाठी पूजनीय बनले. या कथानकाशी निगडीत एक शिल्पसुद्धा मंदिर प्राकारात कोरले गेलेले दृष्टीस पडते. इथे शिव चार शिकारी कुत्र्यांसोबत शिकार्‍याच्या वेषात जंगली वाघाला मारण्याच्या आविर्भावात आहे, तर त्याच्याशेजारी त्याची आदिशक्ती पत्नी आहे. जंगल परिसरात हे मंदिर येत असल्याने पर्यटकांना जसे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकाचे दर्शन घेतल्याचे समाधान मिळते, तसाच सभोवतालचा परिसर पाहून प्रवासाचा सारा थकवासुद्धा कोठल्या कोठे नाहीसा होतो.
नलमलैय म्हणजे घनदाट जंगल. रायचूर-आंध्रच्या सीमेवरचा कर्नाटकातील जिल्हा. याची सीमा ओलांडण्यापूर्वी अवतीभवती नजरेस पडतात ते गुलाबी, पांढर्‍या, फिकट लाल रंगाच्या छटा असलेले मोठमोठे पाषाणी डोंगर. अगदी एकटक त्यांच्याकडे पाहताना प्रत्येक पाषाणातून एक-एक अप्रतिम आविष्काराचे शिल्पच डोकावताना दिसते, एवढा घडवी, कोरीव आकार इथल्या पाषाणांच्या डोंगरांना आहे. ‘पाषाणांची चिरंजीव भाषा’ असा सार्थ गौरव अरुणा ढेरे यांनी या प्रदेशाच्या बाबतीत केलेला आहे.
‘नागार्जुनसागर श्रीशैलम टायगर रिझर्व’ हे देशातील सर्वात मोठे वाघासाठीचे राखीव जंगल आंध्रात आहे ते या ज्योतिर्लिंगाकडे जाताना वाटेत लागते. एरवी आंध्र प्रदेश हा कोरडा, रुक्ष प्रदेश. परंतु या राखीव जंगलामुळे आज जो मुबलक जलसाठा या प्रदेशाला प्राप्त झाला, त्याचे महत्त्व इथल्या लोकमानसाने कायमस्वरूपी लक्षात ठेवायला हवे. पाषाणांच्या कातीव पर्वतरांगा, घनदाट जंगल, सरळसोट पठारे, दोन महत्त्वाच्या कृष्णा व गोदावरी या नद्या यांच्याशी नाते जुळविणारा हा प्रदेश जास्तीत जास्त भातशेतीची लागवड करणारा आहे. संस्कृती, इतिहास, पर्यावरण यांची जोपासना करतानाच शक्तीपीठांच्या सामर्थ्याने लोकमानसाचे मनोबल उंचावणारा आहे.
नल्लमलैयाच्या जंगलाविषयी सांगितले जाते की डोळ्यांत बोट घातले तरी समोरचं काहीच दिसू नये असे हे जंगल आहे. नव्यानेच जन्माला आलेलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर हे नल्लमलैयाचे जंगल आहे. या घनदाट जंगलात जवळ जवळ अठ्ठेचाळीस हजार चेंचू लोक आपली छोटी-छोेटी गावं करून राहतात. खरं तर या जंगलात माणसं राहतात याचाही विसर सरकारला पडावा एवढे त्यांचे अस्तित्व नगण्य मानले जाते. आजही हे चेंचू कमरेपुरते वस्त्र गुंडाळून, खांद्यावर तीरकमठा लावून जंगलात फिरताना आढळतात.
आमचा आणि या जंगलाचा संबंध फक्त श्रीशैलमहून गोव्याला परत फिरताना आला तेवढाच. तोही क्षण आमच्या प्रवासाच्या दृष्टीने अविस्मरणीय असाच होता. वाघांसाठी राखीव जंगल म्हटले की वनखात्याचे कडक कायदेकानून पाळावे लागतात. वाघ हा तर अन्नसाखळीतील प्रमुख. तृणहारी जनावरांवर तर तो नियंत्रण ठेवतो. शिवाय जंगलात वाघ आहे असे सिद्ध झाले की जंगलतोडीच्या, शिकारीच्या निमित्ताने जंगलात प्रवेश करणार्‍यांवरसुद्धा निर्बंध येतात. परिणामी जंगल सुरक्षित राहते व त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा जतन होतो.
या राखीव जंगलाच्या कडक नियमावलीचा फटकाच आम्हाला त्यावेळी बसला. सांगायचे म्हणजे, श्रीशैलमहून माघारी वळताना या राखीव जंगलातील मार्गाचाच अवलंब करावा लागतो. रात्रीच्या वेळी वाघांचा मुक्त संचार असल्याने रात्री साडेनऊ ते सकाळी पाचपर्यंत हा रस्ता पर्यटकांसाठी, येणार्‍या-जाणार्‍यांसाठी बंदच असतो. त्यामुळे कितीही मोठा लक्ष्मीपुत्र असो, नाहीतर मोठ्या राजकारण्याचा जवळचा नातेेवाईक; त्याला थांबावेच लागते! सगळ्यांनाच काही या नियमाविषयी माहिती नसल्याने श्रीशैलमहून पर्यटक गमतगमत येतात. वाटेत श्रीशैलमच्या धरणाचे मनोहारी दृश्य दिसते. तेथे थांबून फोटो घेण्याचा मोह नाही म्हटलं तरी टाळता येत नाही. गोल गोल वळसे घेत आपली गाडी उतरणीला असते, त्यामुळे कोठूनही या धरणाच्या फेसाळ लाटांच्या तुषारांचे नर्तन डोळे भरून पाहताना वेळ वाढतच जातो. त्याहीपुढे घाटमार्ग संपला की रात्र असली तर जेवणासाठी थांबायचे म्हटले तरी हॉटेल एकाच जागी. पुढचा अडीच तासांचा प्रवास जंगलमार्गाचा असल्याने तिथेही वेळ जातोच. पर्यटकांना रात्री साडेनऊ वाजता रस्ता बंद होतो हे जर आपल्याला माहीत असेल तर मात्र आपण घाईघाई करून साडेनऊपूर्वी पोहोचतो, अन्यथा संपूर्ण रात्र पहाटे उजाडेपर्यंत अरण्यात रस्त्यावर- आपले वाहन असेल तर वाहनात- काढावी लागते. आम्हालाही काढावी लागली. एक वेगळा अनुभव म्हणूनच आम्ही ती रात्र हौसेने साजरी केली. वाघाची एखादी तरी डरकाळी ऐकू यावी असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. प्रवासासाठी बाहेर पडताना घ्यावयाच्या काळजीत एका वेगळ्या अनुभवाची भर पडली. त्यातूनही खूप काही शिकता आले. अनुभवाची, प्रसंगाची गाठोडी अशी सोबतीला असली की समस्यांना सहजपणाने भीडणे होते. त्याची भीती वाटत नाही की ते ओझंही होत नाही. उलट आपणच समृद्ध होत जातो. आंध्र प्रदेशातील ‘हुडहुड वादळा’ची सुरुवातीची झलक आमच्या या प्रवासात आम्हाला स्पर्शून गेली.
कृष्णेवर असलेले श्रीशैलम धरण हे दरवाजे असलेले मोठे धरण. श्रीशैलमहून परतताना खाली उतरेपर्यंत त्याची सोबत आपल्याला होते. एरव्ही कृष्णेच्या पाण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून वाद चालू आहे. एरव्ही कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडासारख्या भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य ही फार मोठी समस्या आहे. खरेतर ‘नागार्जुनसागर श्रीशैलम टायगर रिर्झव्ह’मुळे पाण्याचे स्रोत अबाधित राहिलेले आहेत, याचा विसर इतरांना पडताना दिसतो.
कृष्णेच्या पूर्व तीरावर वसलेले श्रीशैल हे स्थान म्हणजे एक पर्वत आहे. चार दिशांना चार उंच शिखरे व चार दरवाजे आहेत. पूर्वेला त्रिपुरांतक, अलंपूर पश्‍चिमेला, दक्षिणेला सिद्धवट आणि उत्तरेला महेश्‍वर. या डोंगररांगातून वाहणारे पाणी कृष्णेला मिळते. हा पर्वत अतिरमणीय व घनदाट जंगलाने व्यापलेला आहे म्हणूनच कित्येकांना आपल्या उदासीनतेच्या, रागाच्या वेळी, आनंदाच्या भरात इथेच यावेसे वाटते. कार्तिकेय शिव-पर्वतीवर रागावले तेव्हा त्यांनी हाच मार्ग स्वीकारला होता. अधोरपंथी कापालिकानीही इथेच बस्तान मांडले होते. आद्य शंकराचार्यांचे वास्तव्यसुद्धा इथे कधीकाळी होते. नागार्जुनासारख्या बौद्ध महापंडिताचे मन संशोधनात रंगून गेले ते इथेच. वीरशैवांच्या पाच महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी ‘श्रीशैल’ हे महत्त्वाचे क्षेत्र. या क्षेत्रावर कित्येकांनी काव्यग्रंथ रचले. महानुभवपंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांनी बारा वर्षे इथेच राहाणे पसंत केले. त्यांना भेटलेली योगिनी मुक्ताबाई ही या परिसराचीच भेट होती. अमृतकुंड, घंटातीर्थ, मल्लिकाकुंड, कपालकुंड, सारंगतीर्थ, पापनाशन इ. तीर्थकुंडे या परिसरात आहेत. त्याशिवाय वीरशैवांचे अनेक मठसुद्धा आहे. मुख्य मंदिराच्या पूर्व द्वारातून एक रस्ता सरळ कृष्णेकडे जातो. ती पाताळगंगा म्हणून प्रचलित आहे. मल्लिका आणि अर्जुनाच्या फुलांची माळा घालून शिवलिंगाची पूजा केल्याने हा ‘मल्लिकार्जुन’ पावतो असे लोकमानस मानीत आलेले आहे. काही का असेना, श्रीशैल पर्वत, नल्लमलैय जंगल, नागार्जुनसागर- वाघांसाठीचे राखीव जंगल, कृष्णेचा धरणपरिसर हे सारे अनुभवताना मन ताजेतवाने होते. या जंगलातून जाणारा रस्ता आधुनिक प्रगत जीवनजाणिवांची खूण म्हणून समोर येत असला तरी रस्त्याच्या आजूबाजूने असलेली चेंचूंची घरेसुद्धा लक्ष वेधून घेत होती.