>> भाचे सुनेने केले कृत्य, १२ तासांच्या आत संशयित ताब्यात
रविवारी रात्री मार्ना- शिवोलीत मार्था लोबो (६४) व व्हेरा लोबो (६२) या दोन सख्ख्या बहिणींची त्यांच्या भाचेसुनेने सहकारी मित्राच्या साहाय्याने राहात्या घरात कोयत्याचे घाव घालून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाचे सूत्रधार असलेल्या रोव्हिना लोबो (२९) तसेच सहआरोपी शुभन राजाबली (२८) या संशयितांना बारा तासांच्या आत हणजूण पोलिसांनी अटक केली. सध्या त्यांची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोभीत शर्मा यांनी सांगितले. याप्रकरणात मार्था यांचा जागीच मृत्यू झाला तर व्हेरा लोबो यांना इस्पितळात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगर्जवाडा-मार्ना शिवोलीत राहाणार्या मार्था लोबो तसेच व्हेरा लोबो या सख्ख्या बहिणी अविवाहित होत्या. आपल्यामागे घर तसेच संपत्तीचा वारस म्हणून त्यांनी आपल्या भावाचा सहा वर्षांचा मुलगा ज्युलियो लोबो याला ठरवले होते. ज्युलियोचे संगोपन करण्याबरोबरच त्याला शिक्षण देण्याचेही कार्य या दोन्ही बहिणींनी केले. ज्युलियोचा विवाह रोव्हिना हिच्यासोबत दहा वर्षांपूर्वी झाला. ज्युलियो व रोव्हिनो हे मार्था व व्हेरा यांच्यासोबतच एका घरात रहात होते. मात्र रोव्हिनाचे मार्था व व्हेरासोबत खटके उडत.
त्यामुळे मार्था व व्हेरा यांची हत्या करण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे रोव्हिना हिने रविवारी हावेरी कर्नाटक येथील शुभन राजाबली (२८) सध्या राहाणारा आसगांव-बार्देश, याला तीस हजारांची सुपारी दिली.
रविवारी दुपारी शोभन याला रोव्हिनाने आपल घरी बोलावून त्याला घरामागे बांधकाम सुरू असलेल्या एका खोलीत ठेवले. ज्युलियो हे रात्री दहा- साडेदहाच्या सुमारास घराबाहेर गेले असता रोव्हिना हिने शुभनच्या मदतीने मार्था व व्हेरा यांच्यावर ती झोपलेली असताना कोयत्याचे वार केले. यात मार्थाचे जागीच निधन झाले तर व्हेरा यांचे इस्पितळात नेताना निधन झाले.
हणजूणचे पोलीस निरीक्षक सुरज गावस तसेच त्यांच्या पथकाने बारा तासांच्या आत संशयित खुनी रोव्हिना व शुभन राजाबली यांना आसगांव येथील शोभनच्या खोलीवर ताब्यात घेतले.