>> संजय राऊत : भाजपशी चर्चा मुख्यमंत्रिपदाबाबतच
महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा कायम असतानाच काल शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी शिवसेनेला १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून त्या जोरावर शिवसेना सरकार स्थापन करण्यास सक्षम असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपकडे केवळ मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच चर्चा करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘आम्हाला १७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. ही संख्या १७५ वरही जाऊ शकते’, असा दावाही राऊत यांनी केला. ही विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप यांनी महायुती करुन लढविली असली तरी निकालानंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला आहे.
दरम्यान, राऊत यांनी यावेळी माहिती दिली की, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे औरंगाबादमधील झालेल्या अवेळच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तेथे काल गेले आहेत. सामनामधून राऊत यांनी भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करुन दाखवावी असे आव्हानही दिले आहे. तसे केल्यास या शतकातील सर्वात मोठा पराभव ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस
हातमिळवणी शक्य
सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेविषयी तर्कवितर्क सुरू असून शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच या सरकारला कॉंग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील काही कॉंग्रेस नेत्यांचे मत भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा असे असल्याची चर्चाही आहे.
२८८ सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेवर १०५ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ तर कॉंग्रेसचे ४४ आमदार आहेत.