शिवसेनेने महाराष्ट्र सरकारात सामील व्हावे, अशी इच्छा प्रकट करून, लवकरच त्यासंबंधी बोलणी सुरू केली जातील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. येथे विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. ‘२५ वर्षांचे आमचे नातेबंध आहेत, सेसेने सरकारात यावे अशी लोकांचीही इच्छा आहे, त्यादृष्टीने आम्ही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बातचितही केली आहे’, असे फडणवीस म्हणाले. शिवसेनेशी बोलणी करण्याकरिता भाजपने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना नियुक्त केले आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. भाजपने पुढाकार घेतला आहे, आता शिवसेनेनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या सरकारात सामील होण्यासंबंधी निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले.