न्यू महाराष्ट्र सदनमध्ये शिवसेना खासदार राजन विचारे हे रमझानचा उपवास ठेवलेल्या मुस्लिम कर्मचार्याच्या तोंडात सक्तीने चपाती कोंबत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काल संसदेत एकच गदारोळ माजला. या प्रकाराने धार्मिक भावना दुखावल्या असल्याचे सांगत संबंधित खासदारांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.
महाराष्ट्र सरकारचे गेस्ट हाऊस असलेल्या न्यू महाराष्ट्र सदनातील जेवणाच्या दर्जाबाबत हे खासदार नाराज होते. त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नाही ते पाहून खासदार थेट कँटीनमध्ये घुसले व तेथे व्यवस्थापक असलेल्या अर्शद झुबेर याच्याशी वाद सुरू केला व रागाच्या भरात त्याच्या तोंडात चपाती कोंबली. रोजाचा उपवास करणार्या या कर्मचार्याने खासदारास तसे न करण्याची विनवणी केली. चित्रफीत प्रसारीत झाल्यानंतर सुरुवातीला या प्रकाराचा इन्कार करणार्या खासदार विचारे यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली व आपणास त्याचे नाव माहित नव्हते असे सांगितले. दरम्यान, कर्चचार्याच्या माहितीनुसार त्याने नावाची पट्टी लावली होती.
दरम्यान, या प्रकाराचा निषेध म्हणून सदनात कॅन्टीनची जबाबदारी पाहणार्या भारतीय रेल्वेचे केटरर्स ‘आयआरसीटीसी’ने कँटीन बंद करण्याचा निर्णय घेतला व कर्मचारी दुखावला गेल्याची तक्रार महाराष्ट्र निवासी आयुक्तांकडे केली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत या प्रकाराचा तीव्र पडसाद उमटले. लोकसभेत निषेध म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, डावे, पीडीपी आणि मुस्लिम लीग सदस्यांनी सभात्याग केला. दोन्ही सभागृहांचे कामकाज या मुद्द्यावरून काही वेळासाठी स्थगित करावे लागले. शिवसेना खासदारांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी या मुद्याला धार्मिक रंग देऊन मोठे केले जात असल्याचे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना हिंदुत्व मानते मात्र इतर धर्मांच्या विरोधात ती नाही, असे ते म्हणाले.