शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे.
मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई हे उपस्थित होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेने युती केली असली, तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती हल्ले केले. देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या देशात प्रचंड वैचारिक प्रदूषण सुरू आहे. हे वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे सर्वांनाच पुन्हा मोकळा श्वास घेता येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आरएसएस आणि नरेंद्र मोदी देशात जातीवादी राजकारण करत आहेत. 2002 च्या गुजतरा दंगलीवरील एक बीबीसीची डॉक्युमेंट्रीही नरेंद्र मोदींना आता सहन होत नाही. या माहितीपटावर बंदी घातली जात आहे. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. मात्र, मोदींचे नेतृत्वही एक दिवस संपुष्टात येईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.