>> फर्मागुडी येथे राज्यस्तरीय शिवजयंती महोत्सव
पोर्तुगिजांनी फक्त गोव्यातील सासष्टी, तिसवाडी व बार्देश तालुक्यात राजवट करून लोकांना धर्मांतर करण्यास भाग पाडले होते. उर्वरित तालुक्यातसुद्धा धर्मांतर करण्याचा पोर्तुगीजांचा प्रयत्न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे फसला व येथील जनतेला संरक्षण मिळाले. छत्रपतींच्या स्वराज्याचे स्वप्न विद्यमान भाजप सरकार अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच छत्रपतींचा खरा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडल्यास छत्रपतीचे स्वप्न सार्थक ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
फर्मागुडी येथे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. त्यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, आयुक्त तथा सचिव रमेश वर्मा व वेलिंग – प्रियोळ पंचायतीचे सरपंच दिक्षा सतरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वराज्य, आदर्श राज्य, बळकट सैन्य, गुप्तचर यंत्रणा व अन्य मार्गदर्शनाचे पालन विद्यमान सरकार करीत आहे. छत्रपतीची प्रेरणा भावी पिढीने घेताना गोव्यातील शिवकालीन इतिहास जाणून घेऊन त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा. छत्रपतींचा खरा इतिहास मुलांना दाखविण्यासाठी पालकांनी तसेच शिक्षकांचे योगदान महत्वाचे ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी स्वराज्यासाठी अनेकांनी त्याग केला. त्याला छत्रपती शिवाजी राजे व संभाजी राजे यांनी दिलेले योगदान भविष्यात सुद्धा कोणीच विसरू शकणार नाही. छत्रपतीच्या गुणाची प्रेरणा घेऊन भावी पिढीने देशासाठी कार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून खंबीर नेतृत्व देशाला दिले होते. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपतींचे गुण आत्मसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असल्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
संचालक दीपक बांदेकर यांनी स्वागत तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वेळगेकर यांनी केले.
‘छावा’ चित्रपट उद्यापासून करमुक्त
छावा चित्रपट आज गुरुवारपासून करमुक्त करण्यात येत असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल डिचोलीत केली. डिचोलीत शासकीय पातळीवर शिवजयंती उत्सवात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी छावा चित्रपट सर्वांना पाहता यावा यासाठी तो करमुक्त करण्याची विनंती केली होती.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी छावा चित्रपट करमुक्त केला असून तो सर्वांनी पहावा असे आवाहन केले.