>> राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि राणे पितापुत्रांमध्ये वाद; दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर दगडफेक
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर बुधवारी या किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते काल राजकोट किल्ल्यावर आले होते. त्यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता. नेमक्या त्याचवेळी तिथे खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. नारायण राणे समर्थकांनी ठाकरे गटाला आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आणि त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आणि याचे पर्यवसन जोरदार राड्यात झाले. यानंतर एकमेकांवर दगडफेक, बाटल्या आणि लाकडे फेकण्याचेही प्रकार घडले. त्यात महिला पोलीस आणि काही कार्यकर्तेही जखमी झाले.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर काल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिवपुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून मालवणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
सुरुवातील नारायण राणे हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हस्तांदोलन करुन किल्ल्यात गेले; मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. आम्ही स्थानिक लोक आहोत, म्हणून इकडे आलो आहोत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असताना हे बाहेरचे लोक इकडे कशाला आले? त्यांना आधी बाहेर काढा, अशी मागणी करत नारायण राणे प्रचंड आक्रमक झाले.
राणे समर्थकांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत हे किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यावेळी वैभव नाईक यांनी 15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन दिला नाही, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही आतमध्ये घुसू, असे म्हटले. यावर राणे समर्थक आणखीन संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
हा संपूर्ण राडा सुरू असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसह किल्ल्याच्या आतमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा होता त्याठिकाणी शांतपणे बसून होते. ते इतर नेत्यांशी गप्पाही मारत होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी राणे समर्थकांना जशास तसे प्रत्युत्तर दिले. विनायक राऊत, राजन साळवी, अंबादास दानवे हे ठाकरेंचे कट्टर शिलेदारही शेवटपर्यंत आदित्य ठाकरेंसोबत उभे राहिले. शरद पवार गटाचे जयंत पाटीलही यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. वाद वाढल्यानंतर जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्याशी बोलून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला.
याच दरम्यान दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच किल्ल्याचे चिरे उखडून फेकण्याचा प्रकारही घडला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव किल्ल्यावर असल्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात असताना त्यांना आवरण्यासाठी पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांना शांत केले. त्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते काहीसे शांत झाले. साधारणतः तासभर ठिय्या मांडल्यानंतर पोलीस संरक्षणात छत्रपती शिवरायांच्या घोषणा देत आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याबाहेर पडले.
आदित्य ठाकरेंकडून नाव न घेता
राणे पितापुत्रांवर बोचरी टीका
काही बालबुद्धीवाले नेते इकडे आले होते, उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे. त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे काही आणल्या नाहीत, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. त्यांच्या या विधानामुळे राणे समर्थक आणखीनच चवताळले. यानंतर त्यांनी राजकोट किल्ल्यातून आदित्य ठाकरे यांना बाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
घरात घुसून एकेकाला मारुन
टाकेन : खासदार नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुढे पोलिसांना असहकार्य असेल, तर त्यांना पुढे येऊ दे. त्यांना आमच्या अंगावर यायला परवानगी द्या. त्यानंतर मी बघतो. घरात घुसून एकेकाला मारुन टाकेन, अशी धमकी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिली.