>> म्हापसा पोलिसांची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई; संशयितांना 6 दिवसांची पोलीस कोठडी; 1 संशयित इस्पितळात
करासवाडा-म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी काल तिघा संशयितांना अटक केली. निगेल फोन्सेका (41), आलेक्स फर्नांडिस (51) आणि लॉरेन्स मेंडिस (40) अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व संशयित म्हापशातील रहिवासी असून, त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित लॉरेन्स मेंडिस याची तब्येत बिघडल्याने त्याला इस्पितळात दाखल केले आहे.
करासवाडा-म्हापसा येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार सोमवारी उत्तररात्री घडला होता. त्यानंतर सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला होता आणि या घटनेमुळे म्हापशाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवप्रेमी व हिंदू संघटनांनी या घटनेविषयी तीव्र निषेध व संताप व्यक्त करत शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. तसेच सोमवारी संध्याकाळी लगेचच शिवप्रेमींनी त्याच ठिकाणी शिवरायांच्या नव्या पुतळ्याची पुनर्स्थापना केली होती.
या प्रकरणी पोलीस महानिरीक्षक डॉ. जसपाल सिंग यांच्या सूचनेनुसार उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक तयार केले होते. त्यात पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, म्हापसा पोलीस निरीक्षक सीताकांत नायक, उपनिरीक्षक विराज कोरगावकर, उपनिरीक्षक बाबलो परब, महिला पोलीस उपनिरीक्षक रिचा भोसले, हवालदार सुशांत चोपडेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड, राजेश कानोलकर यांचा समावेश होता. या पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात फिरून वेगवेगळ्या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आणि त्यांची छाननी आणि बारकाईने अभ्यास केला.
तसेच तपासासाठी अन्य तांत्रिक मदतही घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये निगेल फोन्सेका याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता आणखी दोघांचा या कृत्यात सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी लगेचच कारवाई करत आलेक्स फर्नांडिस व लॉरेन्स मेंडिस यांनाही ताब्यात घेतले. संशयितांविरुद्ध भादंसंच्या कलम 295-अ, 153-अ, 427 आर/डब्ल्यू 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर काल त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, त्यांनी करासवाडा आणि आकय परिसरात आपल्या गुंडगिरीने गेली अनेक वर्षे दहशत निर्माण केली होती.
पोलीस कोठडीत रवानगी
या प्रकरणातील तिघाही संशयितांना काल म्हापसा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.
लॉरेन्स मेंडिसची प्रकृती खालावली
या प्रकरणातील एक संशयित लॉरेन्स मेंडिस याला अटक केल्यानंतर अचानक त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला म्हापशातील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.