– सौ. पौर्णिमा केरकर
(भाग-४)
प्राचीन भारताच्या इतिहासात शिल्पकलेने अत्युच्च टप्पा गाठला होता. आपला गौरवमयी वारसा समजून घेऊन त्याचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे एकूण अनास्थाच दिसून येते. आपल्या पूर्वजांच्या कलाकौशल्याची प्रचिती देणारा हा वारसा अगदीच कवडीमोल ठरला आहे का? अशी खंत मनाला असा ऐतिहासिक वारसा अनुभवताना सातत्याने वाटत राहते.
आपल्या देशाने कधीकाळी शिल्पकलेच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली होती. त्याच्या काही मोजक्याच खाणाखुणा वेगवेगळ्या भागांत अनुभवयास मिळतात. दक्षिण भारतात कानडी भाषा आणि संस्कृतीसाठी ख्यात असलेल्या कर्नाटकात इथल्या राज्यकर्त्यांनी प्रशासनाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या आराध्य दैवतांच्या संदर्भातली आत्मीयता, श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी त्यांच्या जीवन आणि कार्याचे महत्त्वपूर्ण प्रसंग मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या कर्नाटकातील कणकुंबी येथे उगम पावणारी मलप्रभा कुडलसंगम येथे कृष्णेशी एकरूप होऊन शेवटी बंगालच्या उपसागरात विलीन होते. कृष्णेची उपनदी असलेली मलप्रभा कधीकाळी इथल्या गौरवमयी इतिहास आणि संस्कृतीच्या मूर्त रूपाला कारणीभूत ठरली होती. याच मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती काही मोजक्याच ठिकाणी मिळते. अशा स्थळांत कर्नाटकाच्या बागलकोट जिल्ह्यातील ‘ऐहोळे’ गावाचा समावेश करावा लागेल.
‘ऐहोळे’ आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहे. इतिहास संशोधक, अभ्यासक एक वेगळा दृष्टिकोन घेऊन जेव्हा या स्थळाला भेटी देतात, तेव्हा काहीसा उपेक्षित गणला गेलेला हा गाव शिल्पकलेचा उत्तुंग आविष्कार मिरविणारा आहे हे प्रत्यक्षात अनुभवताना अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत. बदामी येथील गुंफा, जागतिक वारसा स्थळांत ज्याचा समावेश केला गेलेला आहे त्या ‘पट्टडकल’ येथील शिल्पकलेचा वैभवशाली इतिहास अनुभवत जेव्हा ‘ऐहोळे’च्या दिशेने प्रवास सुरू होतो तेव्हा सभोवतालची अस्वच्छता पाहून ‘ऐहोळे’ला जाणेच नकोसे वाटते. परंतु एका उत्तुंग ऐतिहासिक, सांस्कृतिक संचिताच्या एवढ्या निकट पोहोचून जर ती मंदिरे बघितली नाहीत तर तो करंटेपणाच ठरावा! म्हणूनच या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत आमची गाडी ऐहोळेला पोहोचली. दुपारची वेळ, त्यामुळे अवतीभोवतीचा परिसर जरा सुनासुनाच भासत होता. मातीच्या अरुंद रस्त्यावर ठिकठिकाणी अस्वच्छ पाणी साचल्यामुळे परिसराला एकूणच बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. ही मानवनिर्मित गलिच्छता होती. त्यामुळे एवढे श्रीमंत सांस्कृतिक संचित मिरविणारी ही भूमी दारिद्य्र आणि अज्ञान यातच गुरफटलेली दिसली. अवतीभोवतीचा हा अमोल ठेवा त्यांच्या उपजीविकेचे साधन बनला नाही. त्यादृष्टीने सरकारदरबारी प्रयत्नही झाले नाहीत. आपल्या गावाला मंदिररूपी हे अनुपम लावण्य लाभलेले आहे याची जाणीवही येथील जनमानसाला आहे की नाही, शंका वाटते.
असे असले तरी ही मंदिरे सौंदर्यसक्त, अभ्यासू मनाला सतत खुणावणारी, संशोधनाला चालना देणारीच आहेत. त्यामुळेच तेथे नतमस्तक व्हावेसे वाटते.
येथील राज्यकर्त्यांनी ऐहोळेला एकापेक्षा एक कशी सुबक आणि सुंदर मंदिरे उभारली, याची कल्पना इथल्या वास्तूंना अनुभवल्यानंतरच येते. कर्नाटकात मौर्य, सातवाहन, कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकुट, कल्याणी चालुक्य, होयसळ, विजयनगर अशा राजघराण्यांनी आपली सत्ता चालवली. ‘बदामी चालुक्य’ हे राजघराणे कला व संस्कृतीचे भोक्ते होते. शिवोपासक असलेल्या चालुक्याने शैव पंथातील दैवतपरिवाराला आपलेसे करून त्यांची एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उभारली. त्यात ऐहोळेची कथा तर तिच्या वेगळेपणामुळे ठळकपणाने लक्षात राहते. सातव्या शतकात ऐहोळे हे चालुक्य राज्यकर्त्यांनी वास्तुकलेचे सर्वोत्तम केंद्र बनवले. आज भारताच्या गौरवमयी इतिहासातील हे लखलखते पर्व एकाकी, उपेक्षित असल्यासारखेच वाटते. सरकार आणि स्थानिक जनतेच्या अनास्थेमुळेच ऐहोळेचे वैभव संकटात असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
बेळगावहून बागलकोट जिल्ह्यात प्रवेश करताच मलप्रभेच्या काठी वसलेला ऐहोळे गाव दृष्टीस पडतो. तिथे जाण्यासाठीचे रस्ते ओबडधोबड, खराब असले आणि सर्वत्र कन्नड भाषेतील फलक असले, उबग आणणारे वातावरण अवतीभोवती दिसले तरी एकापेक्षा एक असलेल्या मंदिरांचे सौंदर्य अनुभवताना आपण काही क्षण वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी सौहार्दाचे संबंध जेव्हा लोप पावतात तेव्हा त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जाण्याची तयारीही ठेवावी लागते. मलप्रभेच्या काठी जी नितांतसुंदर गौरवमयी संस्कृती उदयास आली त्याची प्रचिती ऐहोळेतून जाणवते. कमी पावसाच्या परिसरात ऐहोळेचा समावेश होत असल्याने आज येथील लोकांना जगण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागत आहे. बिनभरवशाची शेती, यामुळे दारिद्य्राच्या, अज्ञानाच्या अंधःकारात होरपळणार्या येथल्या भूमिपुत्रांना ऐहोळेच्या अनमोल वारश्याची किंमत कळलेलीच नाही. अज्ञानामुळे त्यांनी वास्तुकलेच्या समृद्धीकडे चक्क कानाडोळाच केलेला आहे.
‘ऐहोळे’ हे ग्रामनाम ‘अय्या वोळे’शी संबंधित असल्याचे मानले जाते. कोणे एके काळी या भूमीत ज्ञानी-विद्वानांची वसती होती. त्यामुळे हे गाव आर्यकुळाच्या लौकिकास प्राप्त झाले होते. ऐहोळे एकेकाळी जंगलसमृद्ध होते. वृक्षवल्लींनी नटलेले हे गाव जमदग्नीपुत्र परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रीय करण्याची प्रतिज्ञा करून आपला रक्तलांछित परशू मलप्रभेच्या पात्रात धुतला तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. जनमानसाला सुशील, सत्शील करण्याचा हेतू त्यामागे दिसत होता. ज्ञानी, विद्वान लोकांना इथे राजाश्रय लाभल्याने ‘ऐहोळे’ गाव एका काळात सभोवतालच्या परिसरातील लोकांच्या लौकिकास पात्र ठरले होते.
राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्या कारकिर्दीत ऐहोळेचा उल्लेख आढळतो. मलप्रभा नदीच्या किनारी वसलेल्या या गावाला अस्थिविसर्जन होत असल्याने तीर्थक्षेत्राचे स्थान प्राप्त झालेले आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने ऐहोळेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व ओळखून भारतीय पुरातत्त्व संरक्षण संस्थेमार्फत संवर्धन आणि संरक्षण व्हावे म्हणून निर्णय घेतला. एकशे तेवीस लहानमोठी मंदिरे ऐहोळेला असून प्रत्येकाची वास्तुकला प्रेक्षणीय अशीच आहे. शेकडो मंदिरांच्या वास्तुकलेने श्रीमंत असलेले ऐहोळे कर्नाटकाच्या वास्तुकलेच्या इतिहासाचे तेजस्वी पान आहे असे ही मंदिरे पाहताना सतत जाणवत राहते.
ऐहोळे गावात प्रवेश करताच असंख्य वैविध्यपूर्ण मंदिरे आपल्या स्वागतासाठी सज्ज असतात. शेकडो लहानमोठी वास्तुकलेची ही शिल्पे अनुभवताना त्यांना साकारणार्या हातांची कलात्मकता किती असामान्य होती याची जाणीव होते. इथल्या वास्तुकलेचे देखणेपण नजरेत भरते, परंतु इतिहास आणि संस्कृतीचे हे संचित म्हणावे तसे जोपासले न गेल्यामुळे अनेक मंदिरांची पडझड झालेली दिसून येते. गावातील मंडळी काही मंदिरांचा वापर अज्ञान, दारिद्य्रामुळे का असेना, स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी करतात. त्यामुळे तेथील पावित्र्य जतन केले जात नाही हे कळते. ‘जिथे गाव, तिथे मंदिर’ ही आपल्याकडची रचना. त्यामुळे गावात भक्तिसौंदर्य, श्रद्धा टिकून राहते. गावातील एकोपा वाढीस लागतो. परंतु या गावात एवढे विलोभनीय सौंदर्य असूनही त्याला उदासीनतेची, निराशेची किनार दिसते. काही महत्त्वपूर्ण मंदिरांचा विचार करताना इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टिकोनातून त्यांची प्रगल्भ श्रीमंती अधोरेखित होते. या दृष्टीने ‘दुर्ग देवालय’ इतर मंदिरांपेक्षा सरस आणि सौंदर्यपूर्ण असल्याचे पटते. आतील भागात जसे सुंदर कोरीवकाम केलेले आहे, तसेच बाहेरील भागात. दरवाजावरती नरसिंह, महिषासुरमर्दिनी, वराह, विष्णू, शिव आणि अर्धनारीश्वर यांच्या खूप लावण्यमयी शिल्पकृती पाहणार्याला मुग्ध करून टाकतात. सभामंडपाचे वेगळेपण त्याच्या रचनेतून- बाहेरील वारा आतमध्ये खेळता राहावा, प्रकाश पुरेपूर पडावा म्हणून सर्वत्र असलेल्या खिडक्यांमुळे- कळून चुकते. कुटीर मंदिरातील दरवाजाच्या चौकटीवरील गजलक्ष्मीची मूर्ती लक्षवेधक आहे. या मंदिराप्रमाणेच सूर्यनारायण, गौडर, बडिगेर, अम्बिगा, चक्र, विरूपाक्ष गौरी, बौद्ध चैत्यालय, मल्लिकार्जुन, लाडखान यांसारखी आणखीही कित्येक मंदिरे आपला आगळावेगळा आविष्कार घडवीत उभी आहेत. या मंदिरांना राजाश्रय लाभल्याने त्यांचे नेटकेपण जपलेले दिसते. प्रत्येक मंदिराची रचना, वास्तुकला एकापेक्षा वेगळी, सरस तेवढीच अभ्यासकांना, इतिहास संशोधकांना प्रेरणा देणारी आहे. गुंफासदृश्य असलेले लाडखान मंदिर अतिशय भरभक्कम अशा खांबांवरती स्थित आहे. छताकडील भाग काहीसा चपटा, द्वारमंडप चौकाकार बारा स्तंभांनी तयार केलेला. एका बाजूला गंगा तर दुसर्या बाजूला यमुना, आणि जी जागा रिकामी राहते तिथे शृंगारचित्रांची रचना मोहक अदाकारीची साक्ष देते. गरुड, विष्णू यांची कोरलेली चित्रे पाहताना स्तंभित व्हायला होते.
ऐहोळेची ही मंदिरे पाहण्यासाठी एक-दोन तासांचा अवधी पुरेसा नाही. त्यासाठी संपूर्ण एक दिवस खर्च करावा लागतो. अभ्यासकाच्या, संशोधकाच्या नजरेतून बघण्यासाठी तर हा दिवसही अपुराच पडेल. असे असले तरी बदामी पट्टडकलचा कलात्मक आविष्कार अनुभवता ऐहोळे काहीसा उपेक्षित गणला गेलेला गाव आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणे बरोबर नाही. एकेकाळी श्रीमंत असलेला हा गाव व्यापारी लोकांनी मोठ्या प्रमाणात गजबजलेला असायचा. या व्यापारी लोकांमुळे इथे मंदिरसंस्कृती निर्माण झाली, रुजली. दक्षिण भारताच्या मंदिर शिल्पाच्या इतिहासात ऐहोळेने अमरत्व प्राप्त केलेले आहे. भारतीय शिल्पकलेचा ‘पाळणा’ ठरावी अशी एकापेक्षा एक सरस मंदिरे अनुभवण्यासाठी ऐहोळेचा प्रवास करायलाच हवा.
सोलापूर- हुबळी बेंगलोर महामार्गावर ऐहोळे स्थित आहे. बदामी पट्टडकलपासून हे स्थान अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे अगदी न चुकता ऐहोळेच्या या ऐतिहासिक खजिन्याचे डोळेभरून दर्शन घ्यायलाच हवे. मंदिरात प्रवेश करण्याची, मंदिराला अनुभवण्याची सर्वसामान्यांची मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. पंरतु शिल्पकलेचा उत्तुंग आविष्कार घडविणार्या अशा वास्तूंचे दर्शन घेणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आज मानवनिर्मित चुकांमुळे, अनास्थेमुळे जरी ऐहोळे उपेक्षित राहिले असले तरी एकेकाळी ही भूमी विद्वान पंडितांची होती हे नाकारता येत नाही. अडवश्वर नावाच्या महान संताने याच गावात तपश्चर्या करून लोकांचे दुःख, दारिद्य्र निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते. याची साक्ष रामलिंगेश्वर देवस्थानाजवळ असलेली गुहा देते. याच गुहेला या महान संताचा पदस्पर्श झाला होता. इतिहास-संस्कृती, पांडित्य-संतत्व यांनी पुनीत झालेल्या या भूमीला शापमुक्त करण्याची गरज आहे. शिल्पकलेचे भव्यत्व-दिव्यत्व जसे ऐहोळेला अनुभवता आले तसेच येथील बजबजपुरी पाहून वेदनेचा ओरखडा मनावर उमटला. ही वेदना प्रवासभर उरात सलत राहिली.