शिरोडा मतदारसंघातून लढणार : दीपक ढवळीकर

0
63

प्रियोळ मतदारसंघात जर अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव ठेवण्यात आला तर आपण शिरोडा मतदारसंघातून मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याचे कारखाने आणि बाष्पक मंत्री दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दाबोळी हा मगोचा मतदारसंघ असून भाजपबरोबर युती झाली तर दाबोळी मतदारसंघ हा मगोलाच मिळायला हवा, असे ते म्हणाले.

दुहेरी नागरिकत्वाच्या प्रश्‍नावर बोलताना ते म्हणाले की, गोमंतकीयांनी भारतीय राजघटनेचा आदर करायला हवा. देशात कुणालाही दुहेरी नागरिकत्व मिळता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
विमान उड्डाण अभ्यासक्रम
गोव्यातील आय्‌टीआय् केंद्रात विमान उड्डाण अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळालेली असून २०१७ सालापासून हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आठवी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जर त्यानंतर दोन वर्षांचा आय्‌टीआय् अभ्यासक्रम पूर्ण केला तर त्यांचे शिक्षण हे दहावी उत्तीर्ण एवढे असल्याचे प्रमाणपत्र देण्यास गोवा शालांत मंडळाने मान्यता दिली आहे. तसेच दहावीनंतर ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांना बारावी एवढे असल्याचे प्रमाणपत्र देण्याची तयारी मंडळाने दाखवली असून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.