>> खाण कंपन्यांनी पाणी बिले न भरल्याने ग्रामस्थ संतप्त
शिरगावातील सुमारे ३७१ घरांच्या पाण्याच्या बिलांचा सुमारे २० लाख रुपयांचा भरणा तीन खाण कंपन्यांनी न भरल्याने पाणीपुरवठा खात्याने नळजोडणी तोडण्याच्या नोटिसा बजावल्या. त्यामुळे काल सोमवारी ग्रामस्थांनी पैरा येथील खनिज वाहतूक अडवली. त्यानंतर डिचोली पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी शिष्टमंडळाची उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या समवेत बैठक घेऊन यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकार्यांनी कोणत्याही परिस्थितीत नळजोडणी तोडणार नसल्याची हमी दिली.
शिरगावातील सुमारे ३७१ घरांची पाण्याची बिले खाण कंपन्या भरत होत्या. मात्र मार्च २०१८ पासून आजपर्यंत एकही बिल भरले नसल्याने पाणीपुरवठा खात्याने नळजोडणी तोडण्याच्या नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी काल सकाळी ११ वा. पैरा इथे खाण मालाची वाहतूक रोखली. यावेळी सरपंच सदानंद गावकर, विश्वंभर गावकर यांच्यासह सुमारे २५० नागरिक होते.
या नंतर पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी आंदोलकांची समजूत घातली. त्यानंतर त्यांनी उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्याकडे शिष्टमंडळला पाठवले.
बैठकीत सरपंच गावकर व इतरांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी उपजिल्हाधिकार्यांनी चर्चा करून सरकारी अधिकारी वर्गाला कसलीच कारवाई करू नये असे आदेश दिले.