शिथिल निर्बंधांमुळे गोव्यावर कोरोनाचे सावट

0
144

>> येणार्‍या प्रवाशांसाठी तीन पर्याय : तपासणीनंतर प्रवेशासाठी सरकारी यंत्रणा सज्ज : मुख्यमंत्री

राज्यात विमान, रेल्वे, रस्ता आदी मार्गाने येणार्‍या प्रवाशांना आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र, सशुल्क कोविड चाचणीनंतर होम क्वारंटाईऩ किंवा वैयक्तिक घोषणापत्रासह १४ दिवस होम क्वारंटाईनची सक्ती असे तीन पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहेत. राज्यात विविध मार्गातून सुमारे ४ हजार प्रवासी सोमवारी दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रवाशांची योग्य तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झालेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, आरोग्य सचिव नीला मोहनन व इतर अधिकारी उपस्थित होते.

निगेटिव्ह प्रमाणपत्रवाल्यांना क्वॉरंटाईन सक्ती नाही
कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांना क्वारंटाईनची सक्ती केली जाणार नाही. सदर प्रमाणपत्र ४८ तासांपूर्वी घेतलेले असले पाहिजे. राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची २ हजार रुपये शुल्क घेऊन कोविड चाचणी केली जाणार आहे. कोविड चाचणीसाठी लाळेचा नमुना घेतल्यानंतर प्रवाशाला मार्गदर्शक सूचना देऊन होम क्वारंटाईऩ होण्याची सूचना केली जाणार आहे. त्याच्या निवासाचा पत्ता, संपर्क क्रमांक नोंदवून घेतला जाणार आहे.

कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव आल्यास त्याला त्वरित ताब्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. होम क्वारंटाईनच्या वेळी घरातील व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या सर्वांना सरकारी क्वारंटाईनखाली आणले जाणार आहे. तर, कोविड चाचणीला नकार देणार्‍याला १४ दिवस होम क्वारंटाईनबाबत मार्गदर्शक सूचना दिली जाणार आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. घरावर होम क्वारंटाईनचा स्टिकर लावला जाणार आहे. त्याने सूचनांचे उल्लंघन केल्यास त्याला सशुल्क क्वारंटाईनमध्ये आणले जाणार आहे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या हालचालीवर आरोग्य खात्याचा अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित पंचायत किंवा पालिकेच्या नगरसेवकाकडून देखरेख ठेवली जाणार आहे, होम क्वारंटाईन केलेला व्यक्ती नियमाचे पालन करीत नसल्यास त्याला सशुल्क सरकारी क्वारंटाईनमध्ये आणले जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यात प्रवेश करणार्‍याची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. मुंबईसारख्या भागातून येणार्‍या प्रवाशांच्या कोविड चाचणीवर जास्त भर दिला जाणार आहे. राज्यातील हॉटेल पूर्णपणे बंद आहेत. काही जणांकडून कोरोना पर्यटनाबाबत केला जाणारा आरोप निरर्थक आहेत. राज्यात येणार्‍यांची या ठिकाणी निवासाची सोय उपलब्ध आहेत. काही जणांची दुसरी घरे या ठिकाणी आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.

गोव्यातील परिस्थिती चांगली
राज्यांत कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रयत्न केला जात आहे. देशातील इतर राज्याच्या तुलनेत गोव्यातील परिस्थिती चांगली आहे. इतर राज्यांकडून प्रवाशांची तपासणी केली जात नाही असा दावा सावंत यांनी केला.

देशात विमान, रेल्वे सेवा सुरू असल्याने गोवा सरकार सेवा बंद करू शकत नाही. तरीही सुरुवातीच्या टप्प्यात विमानांची वाहतूक कमी असणार असून राज्यात दिवशी १३ विमाने येऊ शकतात, असेही सावंत यांनी सांगितले. दरम्यान, कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राच्या पर्यायाचा समावेश केल्याने आरोग्य मंत्री राणे यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य मंत्री राणे यांनी हा पर्याय सुचविला होता.