>> विरोधी पक्षनेते कामत ः पोलीस तक्रारीचा इशारा
सरकारी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना चालू महिन्यांचे वेतन मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रश्नावरून शिक्षण संचालक वंदना राव यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांना ‘माझ्या केबिनमधून चालते व्हा’ (गेट आऊट) असे सांगणार्या वंदना राव यांनी विनाविलंब कॉंग्रेस पदाधिकार्यांची माफी मागावी, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. अपशब्द वापरल्याबद्दल वंदना राव यांच्याविरुद्ध पर्वरी पोलीस स्थानकात एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
उत्तर गोव्यात शिकवणार्या सरकारी प्राथमिक शिक्षकांना वेतन देण्यास विलंब झाल्याच्या प्रश्नावरून शिक्षण संचालक वंदना राव यांना जाब विचारण्यासाठी महिला कॉंग्रेस तसेच एनएसयूआयचे व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे काही पदाधिकारी प्रतिमा कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली वंदना राव यांच्या केबिनमध्ये गेले होते. यावेळी राव या पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सोडून ‘गेट आऊट फ्रॉम माय केबिन’असे म्हणून त्यांचा अपमान केल्याचे कामत म्हणाले. जनतेचे प्रश्न घेऊन सरकारी कार्यालयात जाणार्यांचा अशा रितीने अपमान करण्याचा कुठल्याही सरकारी अधिकार्याला अधिकार नसल्याचे कामत म्हणाले. वंदना राव यांचा कोणताही अपमान केलेला नसताना किंवा त्यांच्या विषयी वाईट उद्गार काढलेले नसताना त्यांनी कॉंग्रेस पदाधिकार्यांचा अपमान केला. त्यामुळे त्यांनी विनाविलंब या पदाधिकार्यांची माफी मागावी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही कामत यांनी पत्रकार परिषदेतून केली.
जनतेसाठीचे प्रश्न घेऊन सरकारी अधिकार्यांकडे जाण्याचा कुणालाही अधिकार आहे. सरकारी कर्मचारी व अधिकार्यांनी नियम समजून घेण्याची गरज असल्याचे कामत म्हणाले.