शिक्षण व नाट्यकला क्षेत्रातील कर्मयोगीभिकू हरी पै आंगले

0
14
  • अनिल पै

ज्येष्ठ नाट्यकर्मी भिकू पै आंगले यांनी शिक्षण व कला अशा दोन्ही ठिकाणी आपल्या दर्जेदार कामगिरीचा ठसा उमटविला. या दोन्ही क्षेत्रांत ते अखेरपर्यंत कार्यप्रवण राहिले. येत्या 12 नोव्हेंबर रोजी त्यांची जन्मशताब्दी. त्यानिमित्त ही स्मृतिसुमनांजली…

जीवनमूल्यांवरची गाढ श्रद्धा, कर्तव्य-कर्माबद्दल निस्सीम भक्ती, विद्यार्थ्यांबद्दल आंतरिक ओढ, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, ध्येय गाठण्यासाठी सकारात्मक धडपड, सर्वांना आनंद देत स्वत: आनंद घेण्याची वृत्ती, एक कुशल अध्यापक, रसिकप्रिय नाट्यकलावंत, कोणत्याही कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती, निर्णयाचा पक्केपणा, तत्त्वांचा कणखरपणा, अंत:करणाचा हळुवारपणा, धुंद करणारी कलासक्ती, आईवडिलांप्रमाणे आपल्या गुरूंबद्दल नितांत आदर, सहकाऱ्यांवरील दृढ विश्वास, केलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारी तळमळ व परिश्रम, खोलवर रूजलेली ईश्वरनिष्ठा, समाधानी वृत्ती, गोमंतक व गोमंतकीयांबद्दल असलेले प्रेम, या साऱ्या लोभस गुणांचे दर्शन भिकू पै आंगले यांच्यामध्ये दिसून येते. ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वाङ्मयीन व सांस्कृतिक घटकांचे डोळस साक्षीदार होते. आशावादी दृष्टिकोन व स्वागतशील वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे खळखळता उत्साह! निराशा, मरगळ अशा गोष्टींना दिलेले जबरदस्त आव्हान! एखाद्या बैठकीत भिकूबाब दिसले की सर्वांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या जात. ते काय बोलतील, कसे बोलतील, कोणता पवित्रा घेतील याची उत्सुकता सर्वांच्या मनात असे.

तरुणांना लाजवेल अशी काम करण्याची मनाची झेप. प्रकृतीने साथ दिली नसली तरी मनाचा खंबीरपण, चिकाटी, जिद्द पाहून कोणालाही हेवा वाटावा. स्वत:च्या हिमतीवर, इच्छाशक्तीच्या बळावर नवीन काही करून दाखविण्याची जिज्ञासा. मग तो शिक्षकीपेशा असो वा नाटकातील अभिनय वा दिग्दर्शन असो, लेखन वा इतर कोणत्याही पेशात जीवनभर त्यांनी स्वत:ला झोकून दिले. असे शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ नाट्यकर्मी भिकू हरी पै आंगले यांचे 2018 साली दु:खद निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 93 वर्षे होते. आता 12 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांची जन्मशताब्दी आहे.

ते हाडाचे शिक्षक आणि शिस्तप्रिय प्रशासक होते, तसेच विद्यार्थी व शिक्षकप्रिय मुख्याध्यापकही होते. मध्यम उंची, तोच रुबाबदार सूट-टाय, भव्य कपाळ, तेजस्वी मुद्रा व ताठ कण्याने चालणारे स्वाभिमानी पुरुष होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शिक्षण व नाट्यकलेला वाहून घेतले. ते शिस्तप्रिय व स्पष्टवक्ते, कुठेही अन्याय दिसला तर आप्तइष्ट हे नाते विसरून कडव्या शब्दांत प्रतिकार करण्याचा स्वभाव. कष्टाची तमा न बाळगता निस्पृहपणे सर्वस्व झोकून काम करण्याची त्यांची वृत्ती उतारवयातही चालू होती. अखेरच्या पाच वर्षांत शरीर व प्रकृती योग्य साथ देत नव्हती, पण मनाने ते खंबीर होते. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोव्यातील आपले घरदार, आप्तेष्ट इत्यादींचा त्याग करून अनेकांनी महाराष्ट्रात प्रयाण केले. त्यांपैकी बहुतेकांनी संगीत व नाट्यक्षेत्रात अद्वितीय कामगिरी करून आपल्या जन्मभूमीचे नाव गाजविले व कलाक्षेत्रात गोमंतकीय व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. शिक्षणक्षेत्र व कलाक्षेत्र अशा दोन्ही ठिकाणी दर्जेदार कामगिरी करून दाखविणारे कमी. पण दोन्ही क्षेत्रांत कामगिरी व कर्तृत्व दाखविलेल्या भिकूबाब यांचा क्रमांक वरचा आहे.

या कर्मयोग्याचा जन्म 12 नोव्हेंबर 1924 साली बोरी येथे झाला. मराठी व पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणानंतर पुढचे शिक्षण मुंबईत झाले. अनेक नोकऱ्या चालून आलेल्या असताना शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भिकूबाबांनी 1946 पासून मुंबई, देवळाली, नाशिक अशा ठिकाणी विद्यादानाचे कार्य केले. पस्तीस वर्षे शिक्षकी पेशात निरंतर काम केल्यानंतर ओझर- नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. एल. हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते प्राचार्य बनले. 1981 मध्ये निवृत्त झाल्यानंतर ते गोव्यात परतले. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक खळखळता उत्साह होता! ते नेहमी होमवर्क करूनच शाळेत वा सभासंमेलनाला जात. विषय थोडा स्फोटक असला तर भिकूबाब आपली तोफ डागायचेच. पण मनाचे मोकळे, अगदी निर्मळ… झगडा, संघर्ष हा फक्त तत्त्वासाठी. इतरांशी कसलेच वैर नाही. प्रसंग निभावून नेला की मैत्री पूर्वीसारखी. माझे आणि त्यांचे कोकणी व मराठीवरून भांडण व्हायचे. बराच वेळ भांडल्यानंतर ते संपवून आम्ही चहा प्यायला हॉटेलात जायचो व मनमोकळे विनोद करायचो. मी त्यांचा नेहमी चाहता. शिक्षण व कलाक्षेत्राशी आमचे जुळत असे.

गोव्यात परतल्यावर ते मडगाव येथील विद्या विकास मंडळाच्या कार्यकारी चिटणीसपदावर रुजू झाले व त्यांनी सात वर्षे ही जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी गोमंत विद्यानिकेतनच्या कला विभागात त्यांनी काम केले. अनेक नाटके दिग्दर्शित केली. तेथे संस्थाचालकांशी मतभेद झाल्यामुळे पायउतार झाले. वै. भिकू पै आंगले व वै. बाबू नायक हे बालपणीचे मित्र. गोव्याचे ज्येष्ठ व माजी उद्योगमंत्री वै. बाबू नायक मठग्रामस्थ हिंदू संस्थेचे अध्यक्ष होते व या संस्थेचे श्री दामोदर विद्यालय (पूर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक) ते चालवीत असत. या शिक्षणसंस्थेचे काम पाहण्यासाठी बाबू नायक यांनी भिकूबाबना गळ घातली. तत्काळ स्वखुशीने ते तयार झाले आणि शैक्षणिक सल्लागार या नात्याने त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत या शिक्षणसंस्थेसाठी तनमनाने कार्य केले.

शिक्षक हा केव्हाच निवृत्त होत नसतो. शेवटच्या श्वासापर्यंत ज्याचे शैक्षणिक क्षेत्रात कार्य चालू असते तोच खरा शिक्षक. भिकूबाब त्यातले एक. महाराष्ट्र व गोव्यात त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. 1986 पासून अखेरच्या श्वासापर्यंत या संस्थेसाठी कार्य केले. सतत ज्ञाननिष्ठ, प्रयोगशील राहिले. विद्यार्थ्यांबद्दल आंतरिक ओढ. कोवळ्या वयातील मुलांच्या मनाची त्यांनी मशागत केली, त्यांच्यात सुसंस्काराचे बीज रोवले आणि सृजनशीलतेचे कोंब रुजवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक पैलू उठून दिसावा असे उपक्रम त्यांनी सुरू केले. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रूजावी व व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा हे तत्त्व मनात बाळगून ते काम करीत राहिले. मुंबई व नाशिक येथे असतानाही त्यांनी गोव्याशी कायम संपर्क ठेवलेला.

संस्थेचे माजी अध्यक्ष वै. बाबू नायक यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेस मार्गदर्शन करण्यास सांगितले तेव्हा भिकूबाबनी एक अट घातली. ‘आपण एकही पैसा मानधन घेणार नाही. आपल्या अनुभवाचा उपयोग तनमनाने करीन. ही तयारी असेल तर काम करतो.’ बाबू नायकांनी ती अट मान्य केली व दुसऱ्याच दिवशी ते रुजू झाले.
या संस्थेच्या विद्यालयात मजूर, कामगार व झोपडपट्टीतून मुले येतात. त्यांच्यात त्यांनी शिक्षणाबद्दल प्रेम निर्माण केले. शिक्षकांनाही त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करण्यास सांगून विविध प्रयोगांद्वारे शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. अध्यापक वर्गाला अध्ययनशीलता व अध्यापन कलेचे मार्गदर्शन केले. मुलांच्या व्यक्तिगत विकासाबरोबर गुणवत्ता वाढीसाठी भिकूबाबांनी जे परिश्रम घेतले, ते विद्यार्थ्यांबद्दलच्या आंतरिक ओढीतून. काही वर्षांतच भिकूबाबांच्या शैक्षणिक कौशल्याचे फलित दिसून आले. आज ही शिक्षणसंस्था गोव्यातील एक नामांकित संस्था बनली आहे. बारावीच्या परीक्षेत गोव्यात पहिल्या दहा क्रमांकात चार-पाच विद्यार्थी असतात. या विद्यालयात प्रवेशासाठी पालकांची आज या शिक्षण संस्थेकडे धाव असते.

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये शिस्त असावी यावर त्यांची करडी नजर. चुका आढळल्या किंवा कामचुकारपणा केल्यास आपला बडगा दाखविण्यात मागेपुढे केले नाही. चांगले काम केल्याबद्दल त्यांनी त्यांची पाठही थोपटली. शिक्षणसंस्थेतील व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी व पालक हे एक कुटुंब असल्याचे सांगून, कुटुंबात जसे वावरतो तितक्याच आपुलकीने वागण्याचा प्रेमळ सल्ला ते नेहमी देत. शिक्षकांनी नेहमी अध्ययनशील असले पाहिजे असे त्यांचे म्हणणे.
भिकूबाबांची नाट्यक्षेत्रातील कामगिरी फार मोठी. महाराष्ट्र व गोव्यात व्यावसायिक नाटकांत त्यांनी अभिनय केले, नाटकांचे दिग्दर्शन केले व नाट्यलेखनही केले. त्यांच्या ‘दंश’ या पहिल्या नाटकाचा प्रयोग गोवा कला अकादमीत झाला. मराठी रंगभूमीला त्यांचे फार मोठे योगदान आहे. कुसुमाग्रज, प्रा. वसंत कानिटकर, पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, मंगेश पाडगावकर, गोपाळकृष्ण भोबे, दीनानाथ दलाल, डॉ. काशिनाथ घाणेकर व मास्टर दत्ताराम या दिग्गजांची मंदियाळी त्यांना लाभली. धी हिंदू असोसिएशन संस्थेतर्फे अनेक नाटके, नट व दिग्दर्शक म्हणून रंगभूमीवर आणून गोवा व महाराष्ट्रात त्यांनी प्रयोग केले. ते मास्टर दत्ताराम यांना आपले गुरू मानीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘मस्त्यगंधा’, ‘लेकुरे उदंड जाहली’ अशा अनेक नाटकांशी त्यांचा संबंध होता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध नट ते आपले गुरू असल्याचे अभिमानाने सांगतात.

भिकूबाबांच्या मणक्यांवर सातपेक्षा जास्त वेळा शस्त्रक्रिया झाल्या तरीही ते मनाने खचले नाहीत. शारीरिक व्याधींना मुरड घालून तितक्याच उत्साहाने काम करीत राहिले. मास्टर दत्तराम नाट्यमहोत्सवात मडगाव सम्राट क्लबतर्फे स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी अनेक नाटके सादर केली. शेवटपर्यंत श्री रामनाथ देवस्थानात होणाऱ्या महाशिवरात्र्योत्सवाच्या नाटकांत दिग्दर्शन करताना मी पाहिले आहे. आज त्यांचे दोन्ही नातू नाटकात अभिनय करून तो वारसा पुढे चालवत आहेत. मुंबईत शिक्षण घेत असताना नाट्यकलेचा जडलेला छंद भिकूबाबांनी तब्बल सात दशके मोठ्या निष्ठेने, व्रतस्थ भावनेने जोपासला. मुंबईत असताना खास मडगावला येऊन गोमंत विद्यानिकेतन संस्थेतर्फे सादर करण्यात येणाऱ्या नाटकाचे दिग्दर्शन ते करीत. मडगावच्या महिला मंडळाची ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘भटाला दिली ओसरी’, ‘सुंदर मी होणार’ ही नाटके गोवा कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेत सादर केली. तिन्ही वेळा दिग्दर्शनाला पहिले पारितोषिक मिळाली.
गोमंतकातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वांपैकी असलेल्या भिकूबाबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना आदरांजली.

साहित्य पुरस्कार

  • त्यांनी लिहिलेल्या ‘स्पर्श होता परिसाचा’ या शैक्षणिक काव्यनिवेदनपर पुस्तकाला मराठी अकादमीचा पुरस्कार मिळाला. भाऊसाहेब बांदोडकरांच्या जीवनपर ‘दयानंद’ हे चरित्र त्यांनी लिहिले. ‘मराठी रंगभूमी व गोमंतकाची देण’ हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला, तसेच कला व संस्कृती खात्याने ‘कला गौरव’ पुरस्काराने त्यांना गौरविले.
  • शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबईचा ‘महाराष्ट्र गुणीजन रत्न गौरव पुरस्कार- 2007, तसेच गोवा कला व संस्कृती खात्याचे पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांनी गोवा कला अकादमीने आयोजित केलेली ग्रामीण नाट्य शिबिरे घेतली. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत नाटके सादर करून अभिनय व दिग्दर्शनसाठीची पारितोषिके पटकावली. पाचवेळा राज्य नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केलेे. पेडणे येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, 12 व्या प्रागतिक मराठी साहित्य संमेलनाचे (पणजी) अध्यक्ष, 22 वे अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन (मडगाव)- कार्याध्यक्ष, विज्ञान परिषद संमेलनाचे कार्याध्यक्षपदी, जानेवारी 2004 मध्ये पणजी येथे भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बिनविरोध निवडून आले.

साहित्यसंपदा
दंश (नाटक), स्पर्श होता परिसाचा (शैक्षणिक आत्मनिवेदन), दयानंद (चरित्र), शैक्षणिक सप्तस्वर, वळून बघतां मागे, रंगधन, गोमंतकीय रंगकर्मीची शब्दचित्रे, अमृतधारा (लेखसंग्रह), मराठीचे ऋण, ए टिचर (आत्मचिरित्र) इंग्रजीमधून, मराठी रंगभूमी आणि गोमंतकाची देण, भग्नहृदयी (एकांकिका) अशी एकूण एक इंग्रजी व दहा मराठी पुस्तके लिहिली.