शिक्षण माध्यम विधेयक आज विधानसभेत

0
111

अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण माध्यमासंबंधीचे विधेयक शिक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे आज विधानसभेत मांडणार आहेत. त्यासाठीचा कायदा सरकारने तयार केलेला असून त्यासंबंधीचे विधेयक आज गोवा विधानसभेत मांडण्यात येणार आहे.
केवळ अल्पसंख्याकांच्याच इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान देण्याची तरतूद या विधेयकात असल्याचे पर्रीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहे. मात्र, या इंग्रजी शाळांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके लागू करावी लागतील, अशी अट या विधेयकात असेल. कोकणी अथवा मराठी व इंग्रजी अशी ही द्विभाषिक पाठ्यपुस्तके असतील. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या मुलांना आपण काय शिकतो त्याचे नीट आकलन व्हावे यासाठी ही द्विभाषीक पुस्तकांची तरतूद करण्यात आली असल्याचे पर्रीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
पूर्व प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांना देवनागरीतून बाराखडी शिकवावी लागेल अशीही अट या विधेयकात आहे, असेही पर्रीकर यांनी स्पष्ट केलेले आहे. या मुख्य तरतुदींशिवाय अन्य छोट्या मोठ्या बर्‍याच तरतुदी आज विधानसभेत मांडण्यात येणार्‍या शिक्षण माध्यमासंबंधीच्या विधेयकात असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.