>> शिक्षण संचालकांना शिष्टमंडळाकडून निवेदन सादर; जूनपासून वर्ग घेतले, तरी तास भरणार
राज्य सरकारच्या एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी शिक्षण नियम दुरुस्ती मसुद्याला विरोध करणारे निवेदन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना काल सादर करण्यात आले.
सीसिल रॉड्रीगीस यांच्या नेतृत्वाखालील पालकांच्या एका शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसाठी एप्रिलमध्ये वर्ग सुरू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. जूनमध्ये वर्ग सुरू केल्यास 1265 तास भरतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे वर्षाला शिकविण्याचे 1200 तास पूर्ण होणे आवश्यक आहे. जूनमध्ये वर्ग सुरू झाले, तरी 220 दिवस मिळतात. दिवसाला पावणेसहा तास विद्यालय चालले तरी 1265 तास शिकविण्यास मिळतात, असा दावा पालकांनी निवेदनात केला आहे.
विद्यार्थ्यांचा विचार न करता व पालकांना विश्वासात न घेता एनईपीच्या कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यासाठी नियम दुरुस्तीचा मसुदा गडबडीत जारी करण्यात आला. त्यामुळे या मसुद्यात त्रुटी आहेत. तसेच सूचनांसाठी केवळ पाच दिवसांचा वेळ देण्यात आला. पाच दिवसांपैकी तीन दिवस सुट्टी होती, तरीही मसुद्याला विरोध करण्यासाठी पालकांकडून हरकती सादर करण्यात आल्या आहेत, असे सीसिल रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निर्णयामुळे ज्या पालकांची मुले वेगवेगळ्या इयत्तेत शिकतात, त्या पालकांची बरीच गैरसोय होणार आहे. 2024-25 वर्षात नववीचे वर्ग जूनमध्येच सुरू झाले, तरीही शिक्षणाचे तास पूर्ण झाले. तसेच यापूर्वी वाढत्या तापमानामुळे दहावी व बारावीची अंतिम परीक्षा शालान्त मंडळाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता, असे सेबी मास्कारेन्हस यांनी सांगितले. सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलमध्ये उष्णतेच्या प्रमाणात आणखी वाढ होणार आहे. बऱ्याच विद्यालयामध्ये पाण्याचा तुटवडा असतो. पंख्यांचीही योग्य सुविधा नाही. त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याची भीती टोनी कार्दोज यांनी व्यक्त केली.