गोवा शालेय शिक्षण दुरुस्ती विधेयकाच्याबाबतीत काहीच्या मनात गोंधळ निर्माण झाल्याने सदर विधेयक चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आले आहे. या समितीवर मुख्यमंत्री पर्रीकर, नीलेश काब्राल, डॉ. प्रमोद सावंत, किरण कांदोळकर, राजन नाईक, लवू मामलेदार, दिगंबर कामत व माविन गुदिन्हो यांचा समावेश केला आहे.
मेरशी परिसरातील कचरा प्रकल्प केंद्रे हलवणार : साल्ढाणा
पणजी बसस्थानक ते मेरशी जंक्शन या दरम्यान दुर्गंधी पसरली आहे ती पणजी महापालिकेने या परिसरात कचर्यापासून खत बनवण्यासाठीची केंद्रे सुरु केल्यामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम खातेही रुआ-द-औरे खाडीत सांडपाणी सोडत असते. त्यामुळेही या दुर्गंधीत आणखी भर पडते अशी माहिती काल पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांनी विधानसभेत दिली. शून्य तासाला अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. आता लवकरच महापालिका आपली ही केंद्रे हिरा पेट्रोलपंपाजवळ हलवणार असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्गंधी पसरू नये म्हणून ही कचर्यापासून खत बनवण्याची केंद्रे झाकून ठेवण्याची सूचनाही केली आहे. त्याची अंमलबजावणी केल्यानंतर दुर्गंधी पसरणे बंद होणार असल्याचे साल्ढाणा यानी यावेळी स्पष्ट केले.
प्रा. खिचडी व अयंगार यांना श्रद्धांजली
विनोदी साहित्यिक प्रा. निरंजन खिचडी व योगगुरु बी. के. अयंगार यांना काल गोवा विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. खिचडी व अयंगार यांचे निधन झाल्याने आमदार विष्णू वाघ यांनी विधानसभेत शोक प्रस्ताव मांडला होता. यावेळी दोन मिनिटे शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.