शिक्षण खात्यात सरकारी नोकरी देण्याच्या आमिषाने नवेवाडे येथील एका महिलेची 4.3 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर याला वास्को पोलिसांनी काल संध्याकाळी अटक केली. तर दुसरा संशयित सूरज नाईक फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही वास्को येथील रहिवासी आहेत.
नवेवाडे वास्को येथील साक्षी सुदर्शन केरकर (39) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित गोविंद मांजरेकर आणि सूरज नाईक (दोघेही रा. वास्को) यांनी साक्षी केरकर यांना शिक्षण खात्यात ‘मल्टी टास्क’ची नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेतले. नोकरी मिळाली नाही आणि पैसेही परत न मिळाल्याने साक्षी यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.
वास्को पोलिसांकडून सांगितले की, याप्रकरणी शनिवारी (दि. 9) रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. नवेवाडेतील साक्षी केरकर यांच्याकडून गोविंद आणि सूरज या दोघांनी साक्षीला 1 मार्च ते 31 मे 2023 या काळात शिक्षण विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये घेतले होते. पैसे देऊन सुद्धा नोकरी न मिळाल्याने साक्षी यांनी तक्रार केली असून वास्को पोलिसांनी गोविंद आणि सूरज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून काल (रविवारी) सायंकाळी संशयित गोविंद मांजरेकर (42, रा. वास्को) याला अटक केली. तर संशयित सूरज नाईक याचा शोध सुरू असल्याचे वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस अधिक तपास करीत आहेत.
एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
राज्यात सरकारी नोकरी घोटाळ प्रकरण चांगलेच गाजत असून दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. अनेक नावे सुद्धा समोर येत असून सरकारी खात्यातील अनेकजण यात सहभागी असल्याची शक्यता असून विरोधकांनी यात काही राजकीय नेत्यांचाही सहभागी असल्याचा आरोप केला आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण आणखीन खोलात जात असून काल वास्को येथे शिक्षण खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 4 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली, तर दुसरा संशयित फरार असून शोध सुरू आहे.
तपासाचा वेग मंदावला
राज्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरण समोर आले आणि सर्वसामान्य गोमंतकीयांची झोपच उडाली. सरकारी नोकरीसाठी आतापर्यंत 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम दलालांनी घेतली असल्याचे समोर आले आहे. यापेक्षाही मोठा आकडा असण्याची शक्यता असून एक एक प्रकरण आता पुढे येत आहे. या प्रकरणात दीपश्री सावंत आणि पूजा नाईक यांना अटक केली आहे. तर या प्रकरणातील एका संशयिताने आत्महत्या केली आहे. काल वास्को येथून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तपास करून दोषींवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले असले तरी तपासाची गती मंदावताना दिसत आहे.